Elephant Mahadevi moved to Gujarat — political tensions erupt in Hatkanangale.  sarkarnama
विश्लेषण

Mahadevi Hatkanangale Politics : 'महादेवी' गुजरातला गेली, नेत्यांच्या डोळ्यात राजकीय अश्रू! समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी केविलवाणी धडपड

Elephant Mahadevi Shifted to Gujarat : पाच वर्षांपूर्वी महादेवीसाठी न्यायालयीन लढाई सुरू झाली. मठ संस्थान आणि ग्रामस्थांकडून त्याची लढाई न्यायालयात सुरु होती. त्याला पाठबळ देण्याची जबाबदारी काही लोकप्रतिनिधींची होती.

Rahul Gadkar

Hatkanangale Politics : कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीला वनतारा प्राणी संग्रहालयात नेण्यात आले. गेल्या 35 वर्षांपासून गावात मनसोक्त फिरत असणारी महादेवी, अचानक घेऊन गेल्याने ग्रामस्थांच्या भावनेचा उद्रेक कल्लोळ उडाला. पंचक्रोशीतील सर्वांची लाडकी महादेवी सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर गुजरातकडे रवाना झाली.

पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भरल्या डोळ्यांनी महादेवीला निरोप दिला. महादेवीला नेण्यापूर्वी ग्रामस्थांचा लढा कामी आला नाही. तर मठ संस्थान न्यायालयीन लढाईत अपयशी ठरले. केवळ मठ संस्थान आणि ग्रामस्थांची लढाई असल्याने महादेवी साठी लढाई निष्फळ ठरली. कारण राजकीय इच्छाशक्ती कमी पडली. कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय इच्छाशक्ती असली, तर कोणतेही अशक्य काम अवघड नाही. आणि राजकीय इच्छाशक्ती नसली तरी सोपे काम ही अवघड होऊन बसते. याची अनेक उदाहरण आहेत.

त्याचाच प्रत्येक या महादेवी बाबत येताना दिसतोय. दोन दिवसांपूर्वी महादेवी गुजरातला गेली. पण आता समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींना राजकीय अश्रू गाळावे लागत आहेत. हत्ती गेल्यानंतर केवळ समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया आणि मठावर नेत्यांच्या भेटीची रीघ लागली हे वास्तव आहे.

पाच वर्षांपूर्वी महादेवी साठी न्यायालयीन लढाई सुरू झाली. मठ संस्थान आणि ग्रामस्थांकडून त्याची लढाई न्यायालयात सुरु होती. त्याला पाठबळ देण्याची जबाबदारी काही लोकप्रतिनिधींची होती. मात्र महादेवी बाबत नांदणी ग्रामस्थ आणि मठ संस्थान लढाई देण्यात अग्रेसर होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महादेवीला वनतारा नेण्यासाठी जोरात हालचाली सुरू झाल्या. मात्र पुन्हा एकदा ग्रामस्थ आणि मठ संस्थान कडून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आले. जवळपास तीन ते चार दिवसांचा अवधी प्रक्रियेत गेला. तरी देखील एकाही राजकीय नेत्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. महादेवी आणि ग्रामस्थ अशी एक भावना जोडली गेली आहे. त्यामुळे महादेवी हत्ती आपल्या गावातच असावी, ही भावना घेऊन लोक रस्त्यावर उतरले.

या मूक मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि सावकार मादनाईक यांची उपस्थिती होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जवळपास दीड लाख इतका समाज या मठाशी जोडलेला आहे. तर जवळपास चार विधानसभा मतदारसंघात या मठाबाबत भक्तीचा भाव आहे. मठाच्या अधिपत्याखाली जवळपास 743 गावे आहेत. त्यामुळे सहाजिकच माधुरी बाबत अनेकांचा जीव तुटत होता. पण वास्तविक उच्च न्यायालयाच्या निकालानंतर रस्त्यावरची लढाई आवश्यक होती. ग्रामस्थांनी ती सुरू देखील केली. राजकीय इच्छाशक्ती आणि काही लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने हा लढा केवळ दोन दिवसा पुरताच मर्यादित राहिला.

अखेर तो दिवस उजाडला आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. महादेवीला वनतारा संग्रहालयात पाठवण्याचा निर्णय झाला. सुप्रीम कोर्टाचा आदर राखत मठ संस्थान आणि ग्रामस्थांनी सन्मान पूर्वक तो शब्द पाळला. महादेवीची गावातून रॅली निघाली. शेवटचा निरोप महादेवीला देताना अख्ख गाव धायमोकलून रडले. जाता जाता ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक झाली. अखेर महादेवी गुजरातला गेली.

पण लोकांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. महादेवीला परत आणण्यासाठी लोकांनी जिओ बॉयकॉट केले. त्याची व्याप्ती वाढली. समाज माध्यमात महादेवीला घेऊन जात असताना महाराजांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्यामुळे महादेवीची व्याप्ती राज्यभर चर्चेत आहे. पण त्याचाच फायदा आता काही राजकीय नेत्यांनी उठवायचा का बेत केल्याचा दिसतो. 2018 साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वनविभागाला दिलेली पत्र खोडसाळ पनाने व्हायरल केले. त्यातही अनेकांनी राजकीय स्वार्थ पाहिला.

तर महादेवी हत्ती गुजरातला गेल्यानंतर त्याबाबतची न्यायालयीन लढण्याची भाषा खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे यांनी समाज माध्यमांवर केली. हीच भूमिका उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यावरून घेतली असती. तर या आंदोलनाची व्याप्ती आणखीन वाढली असती इतकीच अपेक्षा ग्रामस्थांना आहे. महादेवी गेल्यानंतर आता महाराजांची विचारपूस करण्यासाठी मठावर राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे. काही नेत्यांनी प्रत्यक्ष फोन वरून संपर्क साधला. त्यामुळे सहाजिकच अशा काही लोकप्रतिनिधींवर ग्रामस्थांनीच खाजगीत आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष लढाई वेळी आमच्या पाठीशी उभे राहिले असते तर, समाज माध्यमावर स्वतःच्या प्रतिक्रिया व्हायरल करण्याची वेळ आली नसती. केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी काही नेत्यांची स्टंटबाजी सुरू आहे. काही पुढार्‍यांची नेतेगिरी सुरू झाली. असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून हा समाज आपल्याकडे वळवण्यासाठी काही नेत्यांनी केविलवाणी धडपड सुरू केल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

सतेज पाटील, यड्रावकर शेट्टी आक्रमक

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांनी देखील यावर तीव्र संताप व्यक्त केला होता. वनताराला जर हत्तीच हवे असतील तर त्यांनी चंदगड आजारामधील टस्कर हत्ती घेऊन जावेत. लोक भावनेशी खेळू नये अशी भावना व्यक्त केली. त्यानंतर माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी त्यांनी सह्यांची मोहीम सुरू ठेवली आहे. तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो देखील असफल ठरला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील यासंदर्भात थेट अंबानी यांच्यावरच टीका केली होती.

एकी दाखवण्याची गरज होती

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांनी सत्तेचा फायदा घेत एकीची ताकद दाखवण्याची अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र महादेवीला घेऊन गेल्यानंतर ज्या लोक भावनेचा अनादर झाला. त्या लोकभावना परत मिळवण्यासाठी सत्तेतील आमदार खासदारांना एकत्र येऊन लढा द्यावा लागेल अशी भावना देखील ग्रामस्थांची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT