कोलकता : भाजपला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पक्षाचे 5 आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार आहेत. विशेष म्हणजे हे आमदार पक्षाचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडूनही बाहेर पडले आहेत. भाजपला नुकतीच सोडचिठ्ठी दिलेले माजी केंद्रीय मंत्र्यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. राज्य कार्यकारिणीत भाजपने डावलल्याने हे आमदार नाराज आहेत.
पश्चिम बंगालमधील (West Bengal) विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून भाजपला गळती लागली आहे. आता भाजपचे (BJP) आणखी 5 आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याचे समोर आले आहे. ते लवकरच भाजपला रामराम करुन तृणमूलमध्ये दाखल होणार आहेत. हे आमदार भाजपमध्ये नाराज असून, ते पक्षाच्या आमदारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडले होते. तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी या आमदारांचा लवकरच तृणमूलमध्ये प्रवेश होईल, असे गौप्यस्फोट केला आहे.
मुकुटमणी अधिकारी (राणाघाट दक्षिण), सुब्रत ठाकूर (गजघाट), अंबिका रॉय (कल्याणी), अशोक किर्तनिया (बोंगाव उत्तर) आणि असीम सरकार (हरीणघाट) या पाच आमदारांचा यात समावेश आहे. भाजप नेतृत्वावर नाराज होऊन त्यांनी पक्षाचा व्हॉट्सअॅप ग्रुप सोडला होता. त्यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात न आल्याने ते नाराज होते.
बाबुल सुप्रियो यांनी नुकताच भाजपला धक्का देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना डच्चू देण्यात आल्यानं ते नाराज होते. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी भाजपच्या तिकिटावर मिळालेली खासदारकीही सोडली आहे. सुप्रियो यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन राजीनामा दिला होता. त्यांनी भाजप सोडल्यानंतर महिनाभराने राजीनामा दिला होता.
सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश झाला होता. भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश करणारे ते पाचवे नेते ठरले होते. त्यांच्या आधी 4 भाजप आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुप्रियो यांच्याकडे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. यानंतर दोनच महिन्यांत त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करुन भाजपला धक्का दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.