Amarinder Singh Sarkarnama
विश्लेषण

पंजाबमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या कॅप्टनची आता नवीन टीम

पंजाबच्या मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा आज केली. यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. पुढील वर्षी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे.

याबाबत कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले की, आमच्यासोबत अनेक काँग्रेस नेते आहेत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर या नेत्यांची नावे आम्ही जाहीर करू. पंजाबमधील सर्वच्या सर्व 117 जागा आमचा पक्ष लढवेल. आम्ही स्वबळावर लढणार की आघाडी करणार याचे उत्तर तुम्हाला आगामी काळात मिळेल. पक्षाच्या नावाची घोषणा लवकरच होईल. कारण आमचे वकील निवडणूक आयोगासोबत या संदर्भात चर्चा करीत आहेत.

भाजपसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, आमचा पक्ष जागावाटपाच्या संदर्भात प्रस्ताव आल्यास विचार करेल. परंतु, आम्ही भाजपसोबत जाणार आहोत, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. मी फक्त म्हटले होते की मी आणि माझा पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करीत आहोत. अद्याप आघाडी करण्याविषयी कोणतीही चर्चा राजकीय पक्षांशी झालेली नाही.

कॅप्टन यांच्या पक्षस्थापनेच्या हालचालींना पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी अकाली दलाचे विविध गटांना सोबत घेण्यासाठी पावले उचलली आहेत. असे असले तरी सर्वच राजकीय पक्ष याबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत. पुढील वर्षाच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे आतापासूनच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कॅप्टन यांच्याकडे भाजपनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे.

याबाबत बोलताना भाजपचे पंजाब प्रभारी दुष्यंत गौतम म्हणाले होते की, आम्ही अमरिंदरसिंग यांच्याशी आघाडी करण्यास तयार आहोत. आमचे दरवाजे आघाडीसाठी कायम खुले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र, आमचे संसदीय मंडळ घेईल. देशाभिमानी, देशाविषयी आणि राष्ट्रीय सुरक्षेविषयी काळजी असणाऱ्या गटांसोबत हात मिळवण्यासाठी भाजप सदैव तयार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT