Dharmarao Atram, Krushna Gajbae, Devram Holi  Sarkarnama
विश्लेषण

Gadchiroli Vidhan Sabha Election : गडचिरोलीतील भाजपच्या बालेकिल्ल्यावर विधानसभेला वर्चस्व कोणाचे ?

Sachin Waghmare

Gadchiroli News : विदर्भाचे शेवटचे टोक, नक्षल्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हा हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपने वर्चस्व प्राप्त केले असून आता हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. गडचिरोली जिल्हयात गडचिरोली, आरमोरी, अहेरी हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

राज्यातील अतिमागास जिल्हा, अधिकाऱ्यांना घाम फोडणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांपासून जिल्ह्यातील अनेक गावे आजही कोसो दूर आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. गडचिरोलीला 26 ऑगस्ट 1982 ला चंद्रपूरमधून विभक्त होत स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला होता.

गडचिरोली जिल्ह्यातील पक्षीय बालाबल :

गडचिरोली जिल्ह्यात सध्या तीन आमदार आहेत. त्यामधील आरमोरी, गडचिरोली येथील दोन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे (Bjp) आहेत तर एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Ncp) अजित पवार गटाचा आहे. या मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला म्हटले जाते. त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत काय घडले ?

गडचिरोली लोकसभा मतदारसंघात गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यातील अहेरी, गडचिरोली, आरमोरी, ब्रह्मपुरी, चिमूर व आमगाव या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे डॉ. नामदेव दासाराम किरसान हे 6 लाख 17 हजार 792 मते मिळाली.

त्यांनी भाजपचे अशोक माधवराव नेते यांचा जवळपास दीड लाख मताने पराभव केला होता. नेते यांना 4 लाख 76 हजार 096 मत मिळाली. 2014, 2019 मध्ये या मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपने अशोक नेते विजयी झाले होते.

गडचिरोली जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय आमदार

आरमोरी - कृष्णा गजबे (भाजप)

गडचिरोली - देवराम होळी (भाजप)

अहेरी - धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

2019 मधील लढतीमध्ये कोण बाजी मारली होती

अहेरी मतदारसंघ :

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम यांनी अंबरिशराव आत्राम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांना 60 हजार 13 तर अंबरिशराव आत्राम यांना 44 हजार 555 मते मिळाली होती.

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा याठिकाणी अजित पवार गटाकडून धर्मरावबाबा आत्राम निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत ही जागा कोणाच्या वाट्याला येणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

आरमोरी मतदारसंघ :

आरमोरी विधानसभा मतदारसंघात 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कृष्णा दामाजी गजबे यांनी काँग्रेसच्या आनंदराव गेडाम यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत कृष्णा दामाजी गजबे यांना 75 हजार 77 मते मिळाली होती. तर आनंदराव गेडाम यांना 53 हजार 410 मते मिळाली होती.

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीत भाजपचे कृष्णा दामाजी गजबे पुन्हा इच्छुक आहेत. त्यांच्याशिवाय महायुतीकडून या ठिकाणी अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत या जागेवरून काँग्रेस व शरद पवार गटात या जागेसाठी रस्सीखेच आहे.

गडचिरोली मतदारसंघ :

गडचिरोली मतदारसंघातून 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. देवराव होळी यांनी काँग्रेसच्या डॉ. चंदा कोदवते यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत देवराव होळी यांना 97 हजार 913 मते मिळाली. तर डॉ. चंदा कोदवते याना 62 हजार 572 मते मिळाली होती.

त्यामुळे या वेळेसच्या निवडणुकीत पुन्हा महायुतीकडून भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी ही इच्छुक आहेत. तर ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेस की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला येणार यावरून उमेदवार ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT