मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेले – 17 वर्षांनंतरही काम पूर्ण झालेले नाही, खड्डे आणि निकृष्ट दर्जामुळे प्रवासी त्रस्त.
गणेशोत्सव काळात प्रवाशांची मोठी कोंडी – कोकणवासीयांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत असून सोशल मीडियावर तीव्र नाराजी.
परिणाम आणि अपेक्षा – उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसला असून चौपदरीकरणामुळे रोजगार, व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा होती.
अमित गवळे, पाली (रायगड)
गणरायाच्या आगमनाला काही तास उरले आहे .राज्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. विशेषत: कोकणवासीय हजारो गणेशभक्त आपल्या गावी निघाले आहेत. कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची चाळण झाल्याने प्रवाशी त्रस्त झाले आहेत. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत एकूण 471 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. 17 वर्षे उलटूनही या महामार्गाचे काम आजतागायत पूर्ण झालेले नाही.
यंदा पुन्हा गणरायाच्या आगमनात खड्डे व खराब रस्त्याचे विघ्न कोकणकर व प्रवाशांवर आहे. त्यामुळे सोशल मीडियावर असंख्य नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक कोकणवासी आणि सेलिब्रेटिंनी या महामार्गाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर अभिनेते वैभव मांगले यांनी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी कोकणात येणाऱ्या कोकणवासीयांना सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहनही केलं आहे. “गेली 17 वर्षं आपण रस्ता चांगला होण्याची जी वाट पाहतोय; तो आता होण्याच्या मार्गावर आहे… मी आजच देवरुखला आलो. माणगांवच्या आसपासचा, चिपळूण, संगमेश्वर येथील रस्ता अजून होणे बाकी आहे," असे मांगले यांनी म्हटलं आहे.
अनेक युट्युबर व प्रवासी काहीजण रोजचे या रस्त्याचे अपडेट फेसबुक व इंस्टाग्रामवर देत आहेत. तर काहीजण ड्रोनच्या माध्यमातून रस्त्याच्या दुरावस्थेचे चित्रण करत आहेत. तर पेण तालुक्यातील कासु येथील चैतन्य पाटील हा तरुण या रस्त्याच्या पाहणीसाठी स्वखर्चाने चालत निघाला आहे.
महाविकास आघाडी सरकारने काही केले नाही, मात्र महायुती सरकार तरी या मार्गासाठी काहीतरी करेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र त्यावर देखील पाणी फिरले आहे. याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही. मंत्री, आमदार व खासदार दौरे करतात आणि फक्त रस्ता लवकर करतो हे आश्वासन देऊन जातात.
जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करा… यशस्वी होण्याचा मार्ग अत्यंत खडतर असतो असं म्हणतात… हाच तो खडतर मार्ग मुंबई गोवा महामार्ग
एक तर त्या 'मुंबई-गोवा' महामार्गाचा 'राष्ट्रीय' हा दर्जा काढून टाकून पायवाट म्हणून जाहिर करा नाहीतर कोकणातल्या माणसांना 'जनावरं' म्हणून घोषित करा.
टीप-असा रस्ता जनावरांच्या पण नशिबी नको.
मला संधी वाताचा त्रास होता. माझी सर्व हाडे आखडून गेली होती. त्याचा खूप त्रास होत होता, बऱ्याचश्या डाॅक्टरांना दाखवुन पण काहीच फायदा झाला नाही. मग मी मुंबई गोवा महामार्गाने माणगाव ते पनवेल प्रवास केला. आता मला खूप छान वाटतंय. अखडलेली सर्व हाडे मोकळी झाली आहेत. होय मी लाभार्थी, हे माझं सरकार…
कोणत्याही प्रकारच्या क्रेन किंवा अवजड साहित्य उचलण्याची कोणतीही साधन उपलब्ध नसताना इजिप्त मध्ये वाळवंटात केवळ 20 - 25 वर्षात गिझा सारखे पिरॅमिड उभे राहिले..
पण सगळ असतानाही #MumbaiGoaHighway गेल्या 18 वर्षात पूर्ण झालेला नाही..
याच श्रेय फक्त @gadkari.nitin जी यांचच..
#mumbaigoahighway #कोकण #kokan #kokanee #kokan_ek_safar
गिझा पिरॅमिड आणि मम्मी वैगरे structures फालतू गोष्टी आहेत:
खड्डा विरहित, भ्रष्टाचार आणि टोल मुक्त मुंबई- गोवा महामार्ग बनवून दाखवणे अतिशय कठीण कार्य आहे !
जसे गावाबाहेर गुरे चरायला सामायिक माळरान आणि मुक्त कुरण असते तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात, गेल्या २५ वर्षात सर्व पक्षीय राजकारण्यांसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व रस्ते व जन उपयोगी सुविधा सोयी हे मुबलक चरायचं कुरण म्हणून ठेवलेलं आहे ! !
आणि हे सगळं माहीत असूनही कोकणी माणूस गेल्या 25 वर्ष त्याचं- त्याचं नेत्यांना वारंवार निवडून देतं आहे
17 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. अतिशय महत्वाचा असा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या महामार्गाची ही दयनीय अवस्था झाली आहे.
प्रत्येक पावसाळ्यात तर या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. अपूर्ण व निकृष्ठ दर्जाचे काम, खड्डे, पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ यामुळे प्रवाशी व स्थानिक पुरते हैराण झाले आहेत.
वाहतूक कोंडी सततची आहे. वारंवार या रस्त्याची डागडुजी करण्यात येते मात्र पुन्हा जैसे थे! परिस्थिती. महामार्गाच्या दुरवस्थेचा विपरीत परिणाम येथील उद्योग क्षेत्र व पर्यटन व्यवसायावर झाला असून ते डबघाईला आले आहेत.
खड्डे आणि खराब रस्त्यामुळे शेकडो जणांचे जीव गेले आहेत. असंख्य जण जखमी झाले आहेत. एकूणच स्थानिक, प्रवासी आणि चाकरमानी या दुरवस्थेमूळे पुरते वैतागले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात या महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या कोकणकरांच्या त्रासाला सीमाच नसते.
पळस्पे ते इंदापूर या अवघ्या 84 किमीच्या या पहिल्या टप्प्याचे काम आजतागायत पूर्ण झालेलं नाही. तर इंदापूर ते कशेडी (77 किमी) हा चौपदरीकरणाचा पुढील टप्पा आहे. या टप्प्यात देखील अनेक विघ्न आहेत. हे दोन्ही टप्पे रायगड जिल्ह्यातून जातात.
कोकणवासीयांना आणि प्रामुख्याने रायगडकरांना या महामार्गाचे चौपदरीकरण होणार म्हणून खूप आनंद झाला होता. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे येथील पर्यटन व्यवसायाला नवी उभारी येईल.
शिक्षण आणि नोकरी धंद्यासाठी मुंबई व इतर शहरांमध्ये दळणवळण करणे सोयीचे व सुलभ होईल. नवीन कारखाने आणि उद्योग व व्यवसाय विकसित होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
भात, नारळ, सुपारी, काजू, फणस तसेच प्रक्रिया केलेला शेती व फळमाल बाजारात नेणे सोप्पे होईल. आणि एकूणच जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता निर्माण होईल. लोकांचे दरडोई उत्पन्न वाढेल आणि शैक्षणिक स्तर उंचावून राहणीमान देखील सुधारेल.
Q1. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण किती वर्षांपासून सुरू आहे?
👉 गेली 17 वर्षे हा प्रकल्प रखडलेला आहे.
Q2. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
👉 खड्डे, वाहतूक कोंडी, अपघात, उद्योग व पर्यटनावर विपरीत परिणाम.
Q3. गणेशोत्सव काळात कोकणवासीयांची मुख्य तक्रार काय आहे?
👉 खड्डेमय रस्ते व प्रवासातील असुरक्षितता.
Q4. चौपदरीकरण पूर्ण झाल्यास स्थानिकांना काय फायदे होतील?
👉 पर्यटनाला चालना, उद्योगधंदे व रोजगाराच्या संधी, शेतीमाल वाहतुकीची सोय, आर्थिक सुबत्ता.
(Edited by: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.