Girish Bapat Sarkarnama
विश्लेषण

Kasba By Election Result : गिरीश बापट सक्रीय राजकारणातून बाजूला होताच भाजपचा बुरूज ढासळला

गिरीश बापट यांनी या मतदारसंघातून प्रथम १९९१ मध्ये पोटनिवडणूक लढविली होती.

विजय दुधाळे

पुणे : भारतीय जनता पक्षाने (BJP) कसबा मतदारसंघ तब्बल २८ वर्षांनंतर गमावला. या पराभवामागे अनेक कारणे असली तरी गिरीश बापट (Girish Bapat) फॅक्टर अत्यंत महत्वाचा ठरला आहे. बापट यांचे राजकारणात सक्रीय नसणे भाजपसाठी मोठे हानीकारक ठरले आहे. कारण, बापटांच्या निवडणूक जिंकण्याच्या कौशल्यामुळेच कसबा हा भाजपचा बालेकिल्ला बनला होता. बापटांची मतदारसंघातील ‘क्रेझ’ पाहून भाजपने त्यांना पोटनिवडणुकीच्या (By Election) प्रचारात उतरविले. मात्र, तो प्रयत्नही हेमंत रासने यांचा पराभव रोखू शकला नाही. (Girish Bapat withdrew from politics due to illness, the BJP was defeated in Kasba)

कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशी दुरंगी लढत झाली. या दुरंगी लढतीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे रासने यांचा पराभव केला. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्याच घरात उमेदवारी देऊन सहानुभूती मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्या दृष्टीने टिळकांच्या घरातील नावांचीही चर्चा झाली. मात्र, काँग्रेसच्या आक्रमक खेळीमुळे भाजपनेही ओबीसी कार्ड खेळ रासनेंना मैदानात उतरविले. पण, ते कार्ड काय चालू शकले नाही. मुळात गिरीश बापट वजा करता कसब्यात भाजप किती, असा प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करत होते. मात्र, भाजपश्रेष्ठींचे त्याकडे किती लक्ष होते, हा विश्लेषणाचा विषय आहे.

गिरीश बापट यांनी या मतदारसंघातून प्रथम १९९१ मध्ये पोटनिवडणूक लढविली होती. अण्णा जोशी यांना खासदारकीची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे तत्कालीन नगरसेवक बापट यांना पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती. त्या पोटनिवडणुकीत बापटांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या १९९५ च्या निवडणुकीत बापटांनी त्या पराभवाचे उट्टे काढत दणदणीत विजय संपादन केला. त्याविजयानंतर बापटांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी १९९९, २००४, २००९, २०१४ अशा विधानसभेच्या सलग पाच निवडणुका जिंकत कसबा भाजपचा बालेकिल्ला बनविला.

बापट यांना २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिली. पुढील निवडणुकीत बापटांनी जोरदार फिल्डिंग लावत तिकिट खेचून आणले आणि पुण्यातून लोकसभेवर मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला. बापटांनंतर मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र, त्यांच्याही विजयात बापटांचा मोठा वाटा होता.

मुळात बापट हे सर्वपक्षीय कनेक्शन असणारे नेते हेाते. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याने वागणारे बापट हे इतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांशीही तेवढाच संपर्क ठेवून होते. सर्वपक्षीय कनेक्टव्हिटी त्यांच्या विजयात अनेकदा महत्वाची ठरली आहे. अगदी मुस्लिमबहुल भागातही बापटांना प्रमाणात मानणारे लोक होते. जनसंपर्क, मतदारसंघात सहज उपलब्ध होणे आणि विकासकामे या त्रिसूत्रीच्या जोरावर ते अवघड वाटणारी निवडणूकही सहज जिंकून यायचे. मात्र, हे कसब भाजपच्या इतर नेत्यांना त्यांच्याकडून शिकता आलेले नाही, हे या पोटनिवडणुकीत दिसून आले.

बापटांची मतदारसंघातील क्रेझ ओळखून भाजपने त्यांना प्रचारात मैदानात उतरविले. पण त्याची सकारात्मक चर्चा होण्याऐवजी नकारात्मक चर्चाच जास्त झाली. सोशल मीडियातून भाजप नेतृत्वाला ट्रोल करण्यात आले. कारण, नाकात नळ्या, ऑक्सिजन टाकी आणि बोलताना त्यांनाहोणारा त्रास, या अवस्थेत बापटांना प्रचारासाठी उतरविणे किती योग्य होते, हे भाजपला माहिती.

थोडक्यात, बापट यांनी मोठ्या कष्टाने बांधलेला कसबा मतदारसंघ तब्बल २८ वर्षांनंतर भाजपच्या ताब्यातून निसटला आहे. बापट यांना त्याचे दुःख मोठे असणार. कारण, त्यांनी सक्रीय राजकारणात असेपर्यंत कसब्यावरील पकड सैल होऊ दिली नव्हती. पण ते आजारपणामुळे बाजूला होताचा भाजपचा हा बुरुज ढासळला, हे मात्र खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT