Kolhapur politics Sarkarnama
विश्लेषण

Satej Patil Gokul election : विधानसभा निवडणुकीपासून 'अजिंक्यतारा' होते सामसूम; आज बंटी पाटलांनी तीन निवडणुकांचा काढला वचपा...

Gokul election result 2026, Gokul Milk Union, Satej Patil : कोल्हापुरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचे पानिपत झाले होते. सर्व दहा मतदारसंघात महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला होता.

Rajanand More

Kolhapur politics : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने जोरदार मुसंडी मारत महायुतीला मोठा धक्का दिला आहे. मागील दोन वर्षांनंतर सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात आपली ताकद दाखवून देत मोठा विजय मिळविला आहे. या विजयानंतर विधानसभा निवडणुकीपासून सामसूम असलेल्या 'अजिंक्यतारा' या त्यांच्या कार्यालयात गुलालाची मनसोक्त उधळण झाली.

सतेज पाटील यांच्यासाठी गोकुळचा विजय यांचा राजकीय वरचष्मा कायम असल्याचे सिध्द करणारा ठरला आहे. खरंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत त्यांनी महायुतीला घाम फोडला होता. पण विजयाने हुलकावणी दिली होती. अखेर 'गोकुळ'च्या विजयाची माळ सतेज पाटील यांच्या गळ्यात पडली आहे. कोल्हापुरातील सर्व दहा आमदार, मंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अशी मोठी फौज असलेल्या महायुतीला बंटी पाटलांनी हादरा दिला आहे.

विधानसभेत पानिपत

कोल्हापुरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचे पानिपत झाले होते. सर्व दहा मतदारसंघात महायुतीने ऐतिहासिक विजय मिळविला. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात पक्षाला एकही जागा मिळवून देण्यात सतेज पाटील यांना अपयश आले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांचाही पराभव झाला होता. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण बलाढ्य महायुतीसमोर त्यांचा निभाव लागला नाही.

जिल्हा परिषद, महापालिकेत टफ फाईट

मिनी विधानसभा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही महायुतीविरुध्द सतेज पाटील अशी लढत झाली होती. यावेळी मात्र मतदारांनी पाटलांना ताकद दिली. पण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसमोर ती काहीशी तोकडी पडली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला २० तर काँग्रेसला १५ जागा मिळाल्या होत्या. तर महापालिका निवडणुकीतही सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ३५ जागा मिळवत महायुतीला घाम फोडला होता.

दोन्ही निवडणुकीत काँटे की टक्कर होती. दहा आमदार आणि सत्तेची ताकद महायुतीच्या पाठीशी असताना बंटी पाटलांनी एकहाती टफ फाईट दिली होती. सलग तीन निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर सतेज पाटील यांच्यासाठी गोकुळची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतेज पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीची मोट बांधली होती.

मागील काही महिन्यांत गोकुळची खिंड लढविणारे अनेक सहकारी बंटी पाटलांना सोडून गेले होते. मात्र, त्यांनी अन्य सहकाऱ्यांना हाताशी घेत काही महिन्यांपासूनच मोट बांधण्यास सुरूवात केली होती. निवडणुकीच्या निकालातून त्याचे फळ त्यांना मिळताना दिसत आहे. अनेक मातब्बर उमेदवारांचा पराभव करत समविचारी आघाडी गोकुळवर कब्जा केला आहे. ही निवडणूक महायुती विरुध्द एकटे सतेज पाटील अशीच होती. त्यात पाटलांनी बाजी मारत तीन निवडणुकांमधील पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा आता कोल्हापुरात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT