Harshvardhan Patil News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडत इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची साथ देण्याचा मोठा निर्णय घेतला होता.विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याच्या फॉर्म्युल्यामुळे कट्टर राजकीय विरोधक आणि महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणेंनाच संधी मिळण्याची संकेत दिसताच हर्षवर्धन पाटलांनी आपली राजकीय कूस बदलली होती. त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली.
पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पूर्ण ताकद पणाला लावूनही महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडालाच शिवाय पाटलांनाही विजयाचा गुलाल काय उधळता आला नाही.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत गेलेले नेतेमंडळी पुन्हा एकदा महायुतीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. अशीच चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचाही समावेश आहे.
भाजपमध्ये गेल्यावर निवांत झोप लागते म्हणणार्या व महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणारे हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.पाटलांचा हा राष्ट्रवादी प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. त्यात इंदापूर मतदारसंघाचाही समावेश होता. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी इंदापूर तालुक्यात दोन सभा घेतल्या होत्या. मात्र,प्रवीण मानेंचं अपक्ष कार्ड चालल्यानं भरणेमामांनी विजयाची हॅट्ट्रिक केली.
आता हेच हर्षवर्धन पाटलांचं राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीत कुठेच अॅक्टिव्ह असल्याचं दिसून येत नाही. तसेच त्यांच्या लेकीनं दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटही घेतली होती. या भेटीचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. हर्षवर्धन पाटलांच्या पराभवाला काही महिने उलटत नाही, तोच लेकीनं थेट मुख्यमंत्री फडणवीसांसोबतचेच फोटो शेअर केल्यानं राजकीय वर्तुळासह सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यानंतरच हर्षवर्धन पाटील यांच्या पुन्हा एकदा भाजप प्रवेशासाठी पडद्यामागं जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा इंदापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीआधी राजकीय वारं ओळखून 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.पण राज्यात भाजपची प्रचंड मोठी लाट असतानाही त्यांना इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्तात्रय भरणेंकडून पराभव पत्करावा लागला.यानंतर भाजपने हर्षवर्धन पाटील यांचे पुनर्वसन करून राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद दिले.विशेष म्हणजे पाटलांच्या ताब्यातील दोन साखर कारखान्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 'एनसीडीसी'मधून मदतही केली होती.
हर्षवर्धन पाटील इंदापुरातून विधानसभा निवडणूक लढण्यास प्रचंड इच्छुक होते. पण इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचाच स्टँडिंग आमदार असल्यानं महायुतीत ही जागा अजित पवारांच्या पक्षाच्या दत्तामामा भरणे यांनाच सुटणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर विद्यमान हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता.
निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर दत्तात्रय भरणेंच्या विरोधात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना हर्षवर्धन पाटील यांच्या रुपानं तगडा उमेदवार मिळाला होता.त्यामुळे शरद पवारांनी पाटलांच्या विजयासाठी इंदापूर तालुक्यात दोन सभा घेतल्या होत्या.मात्र,जनतेनं भरणे यांनाच कौल दिल्यामुळे पाटलांना तिसर्यांदा पराभव स्विकारावा लागला.
हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ला ऐननिवडणुकीआधी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंना 1 लाख 14 हजार 960 मतं तर भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना 1 लाख 11 हजार 850 मतं पडली होती. यामुळे 3 हजार 110 मतांनी हर्षवर्धन पाटलांना इंदापुरात निसटता पराभव पत्करावा लागला होता.मात्र, या पराभवानंतर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत आल्यावरही विधान परिषदेवर त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं नाही. त्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी 'अभी नही तो कभी नही' म्हणत आरपारची लढाई पुकारली होती. म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा आदेश धुडकावत थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला होता.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय नेत्यांनी आपली राजकीय पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.तसेच महायुतीकडं प्रचंड बहुमत आणि आघाडीकडं विरोधी पक्षनेतेपदासाठीचा आकडाही नसल्यामुळे विरोधी नेत्यांनाही सत्ताधारी आता जवळचे वाटू लागले आहेत. तर महायुतीतील भाजप,एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतील पक्षांना धक्के देण्यासाठी अशा काठावरील नेत्यांना आपल्याकडे आणण्यासाठी गळ टाकून बसले आहेत.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.