BJP vs Congress Haryana election : राज्यसभेच्या ३७ जागांची निवडणूक प्रक्रिया सोमवारी पार पडली. बिहार, ओडिशा आणि हरियाणा वगळता अन्य राज्यांमधील जागांवर बिनविरोध निवड झाली. तर या तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग आणि राजकीय डावपेच पाहायला मिळाले. यामध्ये साहजिकच भाजपने विरोधकांना चितपट करत बाजी मारली. केवळ हरियाणामध्ये एका मताने काँग्रेसची लाज राखली.
हरियाणामध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. पुरेसे संख्याबळ असूनही काँग्रेससाठी ही निवडणूक घाम काढणारी ठरली. मतमोजणीदरम्यान जणू हमरीतुमरीचे वातावरण होते. त्यामुळे मतमोजणीला विलंब झाल्याने मध्यरात्री एक वाजता निकाल जाहीर करण्यात आला.
भाजपकडून संजय भाटिया तर काँग्रेसकडून कर्मवारी बौध्द आणि अपक्ष म्हणून सतीश नांदल हे रिंगणात होते. नांदल यांना भाजपने पाठिंबा दिला होता. त्यामुळे निवडणुकीत रंगत आली होती. हरियाणा विधानसभेतील ९० आमदारांपैकी भाजपचे ४८ आणि काँग्रेसचे ३७ आमदार आहेत. तर दोन इनेलो पक्षाचे आणि तीन अपक्ष आहेत. एकूण ८८ आमदारांनी मतदान केले. त्यामुळे विजयासाठी ३० मतांचा कोटा होता.
मतदानादरम्यान भाजपचे अनिल विज आणि काँग्रेसेचे परमवीर सिंह व भरत बेनीवाल यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकूण पाच मते अवैध ठरविली. परिणामी एकूण मतदान ८३ झाले आणि विजयाचा कोटा २८ मतांवर आला. मतमोजणीमध्ये भाजपचे भाटिया यांना ३९ मते मिळाली. त्यामुळे पहिल्या फेरीतच ते विजयी झाले.
दुसऱ्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत कर्मवीर बौध्द यांना २८ मते मिळाली. काँग्रेसच्या ३७ आमदारांपैकी चार मते अवैध ठरली. तर उरलेल्या ३३ पैकी ५ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. भाजपने पाठिंबा दिलेल्या नांदल यांना १६ मते मिळाली होती. पण निर्धारित मतांचा कोटा भाटिया आणि बौध्द यांनी आधीच पूर्ण केल्याने या दोघांना पहिल्या फेरीनंतरच विजयी घोषित करण्यात आले.
तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर विजयासाठी एका उमेदवाराला २७.६६ मतांचा कोटा होता. नियमानुसार, मतांच्या मुल्याचा विचार केला तर भाटिया यांना २७६६.८८, बौध्द यांना २८०० आणि नांदल यांना २७३३.३३ मुल्य असलेली मते मिळाली होती. म्हणजेच बौध्द यांचा विजय ०.३३ मतांनी झाला आहे. इनेलोच्या दोन आमदारांनी नांदल यांना मतदान केले असते तर कदाचित काँग्रेसचा या निवडणुकीत पराभव झाला असतो. घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना हिमाचल प्रदेशात नेले होते. मतदानादिवशीच हे आमदार हरियाणामध्ये आले होते. पण त्यानंतर पाच आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने उमेदवार विजयी होऊनही काँग्रेसला धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.