Kolhapur News: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितले. इतकेच नव्हे तर केंद्रात रेल्वेमंत्री होण्याचे स्वप्न असल्याचे स्पष्ट केलं. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एक प्रकारे खडा टाकला असला तरी महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार संजय मंडलिक यांची एक प्रकारे फिरकी घेऊन चाचपणी केली आहे. लोकसभा निवडणुकीला अजून अडीच वर्षे बाकी असले तरी आतापासूनच मंत्री मुश्रीफ यांनी केलेले विधान अनेक राजकीय पैलू उघडणारे आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या महायुतीचे आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे दोन शिवसेनेचे तीन, आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आहेत.
लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाटणीला आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांचा दावा कायम असणार आहे. तर प्रतिस्पर्धी म्हणून भाजपकडून ही भविष्यकाळात या जागेवर दावा करत असताना राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात.
जर मंत्री हसन मुश्रीफ हे महायुती म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात? तर ते कोणत्या पक्षाकडून कडून निवडणूक लढवणार हे देखील गौडबंगाल आहे. कारण महायुतीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये केवळ राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढवणे सोपे नाही. शिवाय हसन मुश्रीफ यांचे बॅकबोन असलेले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आता सोबत नाहीत. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी एकप्रकारे खडा टाकून राजकीय अंदाज पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना महायुती म्हणून अंतर्गत भाजपच्या नेत्यांकडूनच विरोध सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक. निवडणुकीच्या निमित्ताने महाडिक आणि मुश्रीफ यातील अंतर्गत संघर्ष चांगलाच टोकाचा बनत चालला आहे.
अशात गेल्या सहा महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनवेळा कागलमध्ये आले आहेत. वेळोवेळी मंत्री मुश्रीफ हे आपली ताकद दाखवताना दिसत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवत असताना लोकसभेचा संदर्भ पुढच्या राजकारणात दिला जाऊ शकतो का? हा देखील मुद्दा आहे.
तर शिवसेना या मतदारसंघावरील दावा कोणत्याही परिस्थितीत सोडू शकत नाही. त्यातच नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचा संघर्ष जिल्ह्याने पाहिला आहे.
जर मंत्री लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर कागल विधानसभा मतदारसंघांमधून राजकीय वारसदार म्हणून नवीद मुश्रीफ यांना रिंगणात आणू शकतात. मात्र तत्पूर्वी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न मंत्री हसन मुश्रीफ यांचा असेल.
जर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक लढवली तर चंदगड राधानगरी आणि कागलमधून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांमुळे जमेची बाजू असेल. पण मुश्रीफ कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार यावर बरेच अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.