Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

CM Eknath Shinde : आपल्याच खासदारांना उमेदवारी देऊ न शकणारे मुख्यमंत्री शिंदे 'रिंगमास्टर' कसे?

CM Shinde and Loksabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा उल्लेख रिंगमास्टर असा केला आहे. प्रत्यक्षात शिंदे हे आपल्याच विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊ शकले नाहीत, जाहीर केलेली उमेदवारीही त्यांना रद्द करावी लागली आहे.

अय्यूब कादरी

Loksabha Election 2024 : एकनाथ शिंदे हे 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडून भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात सतत कलगीतुरा सुरू असतो. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची, एकमेकांना टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाहीत. अनेक वर्षे एकाच पक्षसंघटनेत राहिलेले, सोबत वाढलेले नेते अशा प्रकारची टीका एकमेकांवर करतात तेव्हा राजकारण कोणत्या टोकाला गेले आहे, याची प्रचिती येते.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीतही विभागले गेले आहेत. दोन्ही बाजूंचे जागावाटप आणि उमेदवारीचा प्रश्व रखडला होता. महायुतीला काही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर करता आलेले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपला लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे जागा महायुतीत कोणत्याही पक्षाला सुटली तरी आम्ही सांगू तोच उमेदवार असला पाहिजे, असा भाजपचा आग्रह होता, तो आग्रह त्यांनी अनेक मतदारसंघांत पूर्ण करून घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि अजितदादा पवार यांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

एकनाथ शिंदे यांची कोंडी होत असल्यामुळे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि ठाकरे गटातील अन्य नेत्यांनी संधी मिळेल तेव्हा त्यांना डिवचण्याचे काम केले. भाजपच्या दबावामुळे शिंदे यांना त्यांच्या काही विद्यमान खासदारांनाही उमेदवारी देता आली नाही. शिंदे गटाने हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. भाजपच्या दबावापुढे शिंदेंना नमते घेत हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लगली आहे. पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवतींना यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

तर मूळ मुद्दा असा की, मुख्यमंत्री शिंदे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. मी रिंगमास्टर आहे, वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन सोमवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. वस्तुस्थिती अशी आहे, की आपल्या काही विद्यमान खासदारांनाही उमेदवारी देण्यात अपयशी ठरलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणत्या अर्थाने रिंगमास्टर आहेत? नाशिकच्या उमेदवारीचा तिढा शिंदे यांना अद्याप सोडवता आलेला नाही.

हेमंत गोडसे(Hemant Godse) नाशिकचे खासदार असून, ते आता शिंदे गटात आहेत. सर्वेक्षण विरोधात असल्याचे कारण पुढे करून भाजपने गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. याउलट, महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दबदबा आहे. सर्वाधिक 21 जागा ठाकरे गट लढवत आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी टोकाचा विरोध करूनही ठाकरे यांनी सांगलीची जागा सोडली नाही.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी या पाच वेळा विजयी झालेल्या आहेत. त्या सध्या शिंदे गटात आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री शिंदे उमेदवारी देऊ शकले नाहीत. उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड हे इच्छुक होते. प्रा. गायकवाड यांना उमेदवारी देणे तर दूरच राहिले, शिंदे यांना हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडवूनही घेता आलेला नाही. या सर्व प्रकारांमुळे मागे एके दिवशी मुख्यमंत्री शिंदे हे काही तास नॉटरिचेबल झाले होते. अशी परिस्थिती असताना मग शिंदे स्वतःला कोणत्या अर्थाने रिंगमास्टर म्हणवून घेत आहेत. ते मुख्यमंत्री असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच शब्द अंतिम असतो, हे काही आता लपून राहिलेले नाही.

अजितदादा पवार(Ajit Pawar) आणि त्यांचे आमदार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिंदेंच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली. त्यानंतर पालकमंत्रिपदांच्या निवडीतही अजितदादा पवार यांनी बाजी मारली. अजितदादा पवार सरकारमध्ये सामील झाल्यामुळे भरत गोगावले, संजय शिरसाट आदी शिंदे गटाच्या नेत्यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अद्याप तरी अधुरे राहिले आहे.

मध्यंतरी रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने शिंदे गटाची पुरती कोंडी झाली होती. आपल्याच खासदारांना उमेदवारी मिळवून देण्यात असमर्थ ठरलेले, विद्यमान खासदाराला स्वतःच जाहीर केलेली उमेदवारी भाजपच्या दबावामुळे रद्द करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या अर्थाने रिंगमास्टर आहेत, अशा प्रश्न आता राज्यातील जनतेला पडला असेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT