Shivajirao Naik Sarkarnama
विश्लेषण

48 हजार कार्यकर्ते पाठीशी असते तर शिवाजीराव नाईकांचा पराभव तरी झाला असता का?

Shivajirao Naik यांचा दोन एप्रिल रोजी राष्ट्रवादीत प्रवेश

अमोल जायभाये

सांगली : राजकीय नेते न पटणारा दावाही करण्यात पटाईत असतात. आता सांगली जिल्ह्यात (Sangli) माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. नाईक यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी बळकट होऊन भाजपचे संख्याबळ घटणार आहे. पण हे सांगताना नाईक यांच्या समर्थकांनी धडकी भरविणारा आकडा सांगितला आहे.

नाईक यांच्यासह त्यांच्या ४८ हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिल्याचे सांगत हे सर्वजण राष्ट्रवादीत जाणार असल्याची घोषणा शिराळा तालुका भाजप अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी केली.

नाईक यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुखदेव पाटील यांच्या म्हणण्यानुसार १४ सेल व १३ आघाड्याच्या सर्व पदाधिकारी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये ३३४ बूथ केंद्र, ८४ शक्ती बूथ केंद्राच्या सर्व पदाधिकारी व शिराळा तालुक्यातील २७ सरपंच २१९ ग्रामपंचायत सदस्य व वाळवा तालुक्यातील १७ सरपंच व १३७ ग्रामपंचायत सदस्य यांनी ही पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. पाटील यांच्या म्हणण्यानुसार या साऱ्यांची संख्या 48 हजार भरते.

भाजपची एवढी मोठी ताकद शिराळा मतदारसंघात असती तर नाईक यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव झाला असता का, असा प्रश्न उपस्थित होतो. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून जिंकलेले मानसिंगराव नाईक यांना 101,933 (44 टक्के) मते मिळाली. भाजपचे उमेदवार असलेले शिवाजीराव नाईक यांना 76,002 (33 टक्के) मते पडली. अपक्ष असलेले सम्राट महाडिक यांना 46,239 (20.17 टक्के) मते घेता आली. शिवाजीरावांकडे 48 हजार कार्यकर्ते असते तर तेच मोठ्या मताधिक्याने निवडून आले असते. त्यांच्या पराभवाला महाडिक यांची बंडखोरी मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सुखदेव पाटील यांनी थेट 48 हजार समर्थकांचा हा दावा केल्याने साहजिकच तो चर्चेचा विषय झाला आहे.

पवार यांच्या विविध प्रकल्पांचे उदघाटन

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुढी पाडव्याला (ता.२) रोजी शिराळायेथील शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ, पक्षप्रवेश व शेतकरी मेळावा हजारोंच्या उपस्थितीत व दिमाखदार पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बेँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.

ते म्हणाले, पवार यांच्या उपस्थितीत वारणा डावा प्रकल्पासाठी रु. ३०० कोटी रुपये, वाकुर्डे बु।। योजनेस ३०० कोटी रुपये व वारणा धरण गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी ५४ कोटी रुपये अशी एकूण ६५४ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पातून जलसंपदा विभागामार्फत केल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा नागरी सत्कार होणार आहे. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत भाजमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाबद्दल स्वागत समारंभ व यानिमित्ताने भव्य शेतकरी मेळावा होणार आहे.

ते म्हणाले, शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करत आहेत. त्यामुळे मतदार संघात पक्षाची ताकद आणखी वाढणार आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आदी निवडणूकांत फायदा होणार आहेत. नाईक यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा जिल्ह्यात पक्षाला होईल. या निमित्ताने होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास खासदार पवार शेतकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.``

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT