काँग्रेसच्या न्याय यात्रेचे नेतृत्व करणारे राहुल गांधी यांनी मंगळवारीच पाच गोष्टींवर फोकस करत सर्वांना न्याय देण्याची घोषणा केली. या पाच पैकी एक ‘महिलांना न्याय’ हा विषय काँग्रेसने निश्चित केला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्तारुढ तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गेल्या निवडणूकीत काँग्रेसचे झालेले पानिपत डोळ्यासमोर ठेवत काँग्रेसला दोन - तीन जागा देण्याची तयारी दाखविली. त्याला काँग्रेसचा नकार होता. म्हणून गेल्या ऑनलाईन बैठकीत ममता बॅनर्जी यांनी टाटा बाय बाय केला होता.
आज (ता. 24) थेट पश्चिम बंगालमधील सर्वच जागा लढण्याचे संकेत देत ममता बॅनर्जी यांना एक महिला म्हणून काँग्रेस न्याय देऊ शकली नाही, हे सिध्द केले. इंडिया आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या ममता बॅनर्जी यांना महिला म्हणून काँग्रेस ‘न्याय’ देऊ शकली नाही. तर देशातील इतर महिलांना काँग्रेस कसा न्याय देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इंडिया आघाडीत उत्तर प्रदेशाचे समाजवादी पार्टीचे नेते आणि महाराष्ट्रातून शिवसेना (उबाठा) देखील जागा वाटपाच्या चर्चेतून नाराज आहे.
स्वबळाच्या नादात इंडिया आघाडीचे जहाज बुडण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीपुर्वीच व्यक्त केली जात आहे. यात काँग्रेस नेत्यांचा आडमुठेपणा समोर येत असल्याची माहिती उघड होत आहे. काँग्रेस नेत्यांनाच इंडिया आघाडी होऊ नये, असे वाटत असल्याचे चित्र असून त्यामुळेच जागा वाटपाचे घोंगडे अनेक महिन्यांपासून भिजत ठेवले गेले आहे. त्यावर निवडणुका तोंडावर असताना निर्णय होऊ शकला नाही. यातच इंडिया आघाडीचे अपयश अधोरेखित होते. त्याचा निश्चितच राजकीय फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
ममता बॅनर्जी यांनी लोकसभेच्या जागांवर केलेला दावा स्थानिक काँग्रेसने फेटाळल्यानंतर ममता बॅनर्जी यांची नाराजी वाढली होती. इंडिया आघाडीत एकजुट ठेवण्यासाठी राज्यस्तरीय छोट्या पक्षांना नाराज करु नये, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना वाटत असले तरी काँग्रेसच्या काही नेत्यांना इंडिया आघाडीचे अस्तित्व त्यांच्यासाठी धोक्याचे असल्याचे सतत वाटत राहते. पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे त्यांचा पश्चिम बंगाल मधील सर्वच लोकसभा जागांवर दावा आहे.
असा दावा करताना तृणमुल काँग्रेसने इतर राजकीय पक्षांना जागा देण्यासाठी नकार देत सर्वाधिक जागांवर लढण्याचा निर्धार केला. अशा परिस्थितीत स्थानिक काँग्रेस नेते नाराज आहे. काँग्रेसला केवळ दोन ते तीन जागा पश्चिम बंगालमध्ये सोडण्याची तयारी तृणमुल काँग्रेसने दाखविली होती. याचा मोठा राजकीय फटका काँग्रेसला बसण्याची भिती होती. भविष्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मनमानी वाढण्याची भिती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.
पश्चिम बंगाल मध्ये 2014 च्या लोकसभा निवडणूकीत 42 पैकी 34 जागांवर तृणमुल काँग्रेस विजयी झाली होती. पण, त्यानंतर 2019 मध्ये तृणमुल काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला. त्यामुळे तृणमुल काँग्रेस या धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. 2019 मध्ये तृणमुल काँग्रेसला केवळ 22 जागांवर समाधान मानावे लागले. येथे भाजपने 18 जागांवर विजय मिळविल्याने तृणमुल काँग्रेसच्या पायाखालची माती सरकरली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
2019 मध्ये काँग्रेस केवळ 2 जागांवर पश्चिम बंगालमध्ये विजयी झाली होती. त्यामुळे काँग्रेसला दोन ते तीन जागा तृणमुल सोडण्यास तयार होती. अशा वेळी काँग्रेसच्या अधिक जागांचा दावा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी डोकेदूखी ठरला आणि त्यांनी ‘एकला चालो रे….’ चा नारा आज दिला. ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळे इंडिया आघाडीच्या मतांचे विभाजन निश्चित होणार असून त्याचा फटका इंडिया आघाडीला तुर्तास पश्चिम बंगाल मध्ये होताना दिसत आहे.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातदेखील अद्याप इंडिया आघाडीची ठामपणे स्थानिक राजकीय पक्षासोबत आघाडी झाली नसल्याने त्याचा फटका निवडणूकीत बसण्याची शक्यता वाढली आहे. त्याचा निश्चितच फायदा हा लोकसभेत भाजपला होईल. त्यामुळे देशभरात 28 पक्षांनी एकत्र येत स्थापन झालेल्या इंडिया आघाडीतून मोठे घटकपक्ष बाहेर निघून गेल्यास इंडिया आघाडीचे जहाज पाण्यात बुडण्याची शक्यता अधिक असेल.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.