Arvind Kejriwal, Mamata Banerjee, Rahul Gandhi Sarkarnama
विश्लेषण

India Alliance : ममतादीदींची स्क्रीप्ट, केजरीवालांनी लिहिला क्लायमॅक्स; काँग्रेसची थेट हकालपट्टी?

Mamata Banerjee Arvind Kejriwal Congress India Alliance controversy Opposition politics in India : इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांनीही ममता बॅनर्जी यांच्या सुरात सूर मिसळले आहेत.

Rajanand More

लोकसभेत काही प्रमाणात चांगली कामगिरी केलेल्या काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला होता. पण हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस बॅकफूटवर गेले आहे. दोन्ही राज्यांतील पक्षाच्या पराभवाने मित्रपक्षांचा पारा मात्र चांगलाच चढला आहे. ‘इंडिया आघाडी’मध्ये असून नसल्यासारख्या वागणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमो ममता बॅनर्जी यांनी आता आघाडीच्या भवितव्याची स्क्रीप्ट लिहिली असून त्यावर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांनी काम सुरू केले आहे.

काँग्रेसची सध्याची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे. आघाडीतील बहुतेक पक्षांतील नेत्यांच्या मनात काँग्रेसविषयी नाराजी आहे. ही नाराजी चव्हाट्यावर आणण्यासाठी ममतांनी पुढाकार घेतला. त्यांनी थेट इंडिया आघाडीची जबाबदारी आपल्याकडे देण्याबाबत मोठं भाष्य केले. खरेतर यामुळे काँग्रेसने आक्रमकपणे बोलायला हवे होते. पण कोणत्याही नेत्याने त्यावर परखड भाष्य केले नाही.

आघाडीतील इतर मित्रपक्षांनीही ममतांच्या सुरात सूर मिसळले आहेत. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, आप या प्रमुख पक्षांनी ममतांकडे नेतृत्व देण्यास हरकत नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यावर कडी म्हणजे गुरूवारी आपने थेट काँग्रेसला आघाडीतूनच बाहेर काढण्याचा इशारा देऊन टाकला आहे. हा इशारा वाटतो तितका सहज घेऊनही चालणार नाही. यामागे राजकारण दडले आहे.

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभेची निवडणूक आहे. लोकसभेत एकत्रित लढलेले आप आणि काँग्रेस यावेळी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे सध्या दोन्ही पक्षांतील नेत्यांमधून विस्तवही जात नाही. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी भर पत्रकार परिषदेत काँग्रेसला आघाडीतून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. त्यांचा रोख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांच्याकडे होता. माकन हे भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्यावर २४ तासांत कारवाई करावी, असा अल्टीमेटमही आतिशी यांनी दिला आहे.

काँग्रेसच्या काही उमेदवारांना भाजपकडून कोट्यवधी निधी मिळाल्याचा आरोपही आपने केला आहे. त्यामुळे माकन यांच्यावर कारवाई केली नाही तर काँग्रेस आघाडीतून काढून टाकण्याची मागणी केली जाईल, असे आपने जाहीर केले आहे. माकन हे केवळ एक नाव असले तरी आप नेतृत्वाचा रोष संपूर्ण काँग्रेसवरच आहे. ज्यापध्दतीने दिल्लीत काँग्रेसकडून आपची कोंडी केली जात आहे, केजरीवालांच्या मतदारसंघात आव्हान उभे केले जात आहे, गंभीर आरोप केले जात आहेत, त्यामुळे आपचे नेते चांगलेच दुखावले आहेत.

काँग्रेसला थेट इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याचा इशारा देत एकप्रकारे केजरीवालांनी ममतादीदींचा मार्ग सोपा केला आहे. फेब्रुवारी महिन्यात बिहारमध्येही विधानसभेची निवडणूक आहे. तिथे काँग्रेससोबत आरजेडी सोबत आहे. पण पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांनीही ममतांसाठी हिरवा कंदील दाखवल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. जागावाटपात काँग्रेसची दमछाक होणार, हे निश्चित मानले जात आहे. आघाडीत एकी ठेवणे, काँग्रेससाठी अपरिहार्य आहे.

अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या भरवशावरच काँग्रेसची भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे दिल्लीत आपला सळो की पळो करून सोडणाऱ्या स्थानिक नेत्यांना काँग्रेसचे नेतृत्व आवर घालणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून थेट केजरीवाल किंवा सरकारवर भाष्य केले जात नाही. त्यामुळे राज्यात एक आणि केंद्रात काँग्रेसची वेगळी भूमिका असल्याचे सध्याचे चित्र असून नेतेच चक्रव्युहात अडकले आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT