India alliance Sarkarnama
विश्लेषण

India Alliance : संघर्ष अस्तित्वाचा अन् महाराष्ट्रात दिसणार इंडिया आघाडीची एकजूट

अय्यूब कादरी

Mumbai News: लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले. त्यापाठोपाठ हरियाणा विधानसभा निवडणुकीतही यश मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र भाजपची सत्ता कायम राहिली. हरियाणा विधानसभेची निवडणूक इंडिया आघाडी म्हणून लढवण्यात आली नाही. ही चूक आता सुधारली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी ही निवडणूक इंडिया आघाडी म्हणून लढणार, असे संकेत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या आजच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून मिळत आहेत.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि इंडिया आघाडीचे सूर बिघडल्याचे चित्र दिसायला लागले. काँग्रेसने या निवडणुकीत मित्रपक्षांना सोबत घेतले नाही. त्याचा फटका बसला. परिणामी, इंडिया आघाडीचे मनोबल खालावले. बिघडलेले ते सूर आता जुळत असलल्याचेही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या शपथविधीच्या सोहळ्यात दिसून आले. या सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती.

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही इंडिया आघाडीच्या अस्तित्वाची लढाईच ठरणार आहे. महाविकास आघाडीचा पराभव झाला तर इंडिया आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यातच हरियाणायाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या शपथविधी सोहळ्यात एनडीएच्या नेत्यांची एकजूट दिसून आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे नेते सावध झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा बालेकिल्ला काबीज करायचा, यासाठी जंगजंग पछाडणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. अखिलेश यादव यांचा दौरा त्याचेच संकेत आहेत.

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या समाजवादी पक्षाला किमान सहा जागा हव्या आहेत, अशी चर्चा आहे. काँग्रेस पक्ष आता छोट्या मित्रपक्षांची मागणी पूर्ण करण्याच्या मूडमध्ये आल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षाने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार, अशी खात्रीलायक माहिती आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही महाराष्ट्रात प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे. त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षालाही एखादी जागा दिली गेली तर आश्चर्य वाटू नये.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून निर्माण झालेला वाद आता मागे पडला आहे. महायुतीचा पराभव करून सत्ता मिळवायची असेल तर वाचाळपणा न करता डावपेचांवर लक्ष द्यायला हवे, याची जाणीवही काँग्रेस आणि शिवसेनेला झाल्याचे दिसत आहे. छोटे मित्रपक्ष नाराज राहू नयेत, याची काळजी घेतली जात आहे. त्यातूनच समाजावादी पक्ष, डावे पक्ष, बहुजन विकास आघाडीलाही काही जागा सोडण्यात येणार आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे देशभरातील दिग्गज नेते प्रचार करताना दिसतील, अशी शक्यता आहे. त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांचा समावेश असू शकतो. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते सावध झाले आहेत, याचे हे लक्षण मानावे लागेल. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय अंतिम झाल्यानंतर ही पुढीची रणनिती आखण्यात येणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 'करो या मरो' असा प्रसंग इंडिया आघाडीच्या समोर उभा ठाकलेला आहे. इंडिया आघाडी टिकवून ठेवायची असेल, बळ द्यायचे असेल तर या निवडणुकीत विजय मिळवणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे आघाडीतील सर्व पक्षांचे नेते झाडून कामाला लागण्याची शक्यता आहे.

हरियाणा निकालानंतरही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिग्गज नेत्यांचे इनकमिंग सुरूच आहे. आता शिवसेनेच्या ठाकरे गटातही इनकमिंग सुरू झाले आहे. इंडिया आघाडीसाठी हे चित्र आशादायी मानले जात आहे. त्याच्या बळावर इंडिया आघाडी आता महाराष्ट्रात एकजूट दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT