BJP And Eknath Shinde : लोकहो, आता तुम्हीच सांगा, कोणाचा 'त्याग' मोठा, भाजपचा की शिंदे गटाचा?

Mahayuti Politics News : महायुतीत विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचे घोडे अडले आणि भाजप - शिंदे गटाला मुख्यमंत्रिपद आणि सत्तास्थापनेवरून आपल्या त्यागाची आठवण होऊ लागली आहे. कोणाचा त्याग मोठा, यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. तो त्याग नव्हता तर सत्तेसाठीची सोय होती, याचा दोन्ही पक्षांना विसर पडला आहे.
BJP And Eknath Shinde
BJP And Eknath Shinde
Published on
Updated on

Vidhan Sabha Election and BJP -Shivsena : भाजप आणि शिंदे गटात सध्या 'त्यागमूर्ती' बनण्याची धडपड सुरू आहे. आम्हीच त्याग केला, असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. तुमच्यासाठी भाजपने मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला, आता तुम्ही मतदारसंघांचा त्याग करा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे गटाला उद्देशून म्हटल्याचे सांगितले जात आहे. तर आम्ही त्याग केल्यामुळेच भाजप सत्तेत आला, अशा आशयाचे प्रत्युत्तर त्याला शिंदे गटाकडून दिले जात आहे.

जागावाटपावरून महायुतीतील पक्षांत वाद निर्माण झाला आहे. महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे वाद निर्माण होणे हे अनपेक्षित नाही. प्रत्येक पक्षाला जास्त जागा हव्या असतात. त्यावरून शिंदे गट आणि भाजपमधील त्यागमूर्ती बनण्याची धडपड, दावे - प्रतिदावे यामुळे या पक्षांनी सत्तेसाठी काय काय केले, याची उजळणी आपोआप होऊ लागली आहे. अर्थात, अमित शाह(Amit Shah) असे काही बोलले नाहीत, अशी सारवासारव मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केल्याचे समोर आले आहे.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, हा शिंदे यांचा त्याग म्हणावा लागेल. या त्यागापोटी त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले, हेही सत्यच आहे. शिंदेंनी त्याग केल्यामुळे भाजप सत्तेत आला, मात्र 105 आमदार असूनही देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. या त्यागामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला, हेही विसरता कामा नये.

..तर शिंदे गटाकडे काय पर्याय होता? -

शिंदे गट आणि भाजपने केलेला त्याग नैतिकतेला धरून होता का? या प्रश्नाला राजकारणात फारसे महत्व नसते. राजकारणात काहीही होऊ शकते, अशी धारणा बनली आहे किंवा आपल्या सोयीसाठी राजकीय पक्षांनी तशी भावना समाजात रुजवली आहे. शिवसेना(Shivsena) का फुटली, तपासयंत्रणांचा ससेमिरा लागला होता का, हा चर्चेचा वेगळा विषय असला तरी त्यागाचा प्रश्न आला की तो मुद्दा समोर येतोच. शिवसेना फुटली नसती तर भाजप सत्तेत आला नसता, हा शिंदे गटाच्या नेत्यांचा दवा खराच आहे. शिवसेना फुटूनही भाजपने त्याग केला नसता तर... शिंदे गटाने काय केले असते? मुख्यमंत्रिपद भाजपने स्वतःकडे ठेवले असते तर भाजपसोबत जाण्याशिवाय शिंदे गटाकडे काय पर्याय होता?

BJP And Eknath Shinde
BJP Strategy: लोकसभेची 'चूक' सुधारली? 'या' नेत्याच्या माध्यमातून भाजपचा ओबीसींना स्पष्ट संदेश

मुळात शिंदे गट आणि भाजपने ही झाकली मूठच ठेवायला हवी होती, कारण या मुद्द्यावरूनच लोकसभा निवडणुकीत त्यांची पीछेहाट झाली आहे. पक्षांची फोडोफोडी मतदारांना आवडलेली नव्हती. असे असतानाही या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा उकरून काढला आहे. दोन्ही पक्षांचा त्याग सत्तेसाठी होता, हे वेगळे सांगायची गरज नसावी. महाविकास आघाडीचा प्रयोग भाजपला(BJP) यशस्वी होऊ द्यायचा नव्हता. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकले असते तर देशाच्या राजकारणातून भाजपचा धाक, दबदबा आणि तपासयंत्रणांची दहशत लयाला गेली असती.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. त्यानंतर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना, 'मनावर दगड ठेवून आम्ही हा निर्णय स्वीकारला', असे विधान मंत्री चंद्रकांतदादा पाटील केले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी या निर्णयाला त्याग वगैरे अशी गोंडस उपमा देण्यात अर्थ नाही. दोन्ही पक्षांनी जे केले, ते एखाद्या वेळेस राजकारणासाठी चुकीचे ठरत नसेल, मात्र समाजाने त्याला स्वीकारलेले नाही, हे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.

राजकारणात स्वतःची सोय पाहिली जाते, त्यामुळे.. -

राज्यात 2019 मध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. महिनाभरानंतर शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाली. एकनाथ शिंदे यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरूच होत्या. त्यातूनच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत काम करणे शक्य नाही, माझा राजीनामा स्वीकारा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांना जाहीर सभेच्या व्यासपीठावरच केले होते. पुढे हेच शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले, उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री बनले. राजकारणात स्वतःची सोय पाहिली जाते. त्यामुळे त्याग केला, असे म्हणणे कोणत्याही पक्षाला शोभत नाही.

अधिक जागा मिळवण्यासाठी या दोन्ही पक्षांकडून आता त्यागाचे कार्ड खेळले जात आहे. भाजपला 160 जागा हव्या आहेत. शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीतील यशाच्या 'स्ट्राइक रेट'चा मुद्दा सुरुवातीपासूनच उपस्थित केला आहे. ते मुद्दा आणखी पुढे रेटत त्या आधारावर विधानसभेच्या 100 जागा हव्या आहेत, अशी मागणी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपद दिल्यामुळे शिंदे आपले ऐकतील, असे भाजपला वाटले असावे, मात्र सध्या तरी तसे दिसत नाही. त्यामुळे आमच्या त्यागामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले, आता जागांचा त्याग करा, असे शाह म्हणाले असतील. शिंदे यांनी कितीही कठोर भूमिका घेतली तरी त्यांना भाजपसमोर शेवटी नमते घ्यावेच लागेल, हेही स्पष्ट आहे.

BJP And Eknath Shinde
Mahayuti Politics : 'बंडोबां'चा 'थंडोबा' करण्यासाठी महामंडळ; व्हायरल यादीवर गोंधळ

असे असले तरी जनतेला काय वाटते.. -

आपण त्याग केला, असे शिंदे गट आणि भाजपलाही वाटणे साहजिक आहे. असे असले तरी जनतेला काय वाटते, याचा या दोन्ही पक्षांनी विचार करायला हवा. त्यांचा त्याग सत्तेसाठी होता, राजकीय डावपेचांचा एक भाग होता, हे लोकांना कळत नाही, या भ्रमातून या दोन्ही पक्षांनी बाहेर पडले पाहिजे. या पक्षांनी खरेच आपल्यासाठी त्याग केला आहे, असे मतदारांना वाटले असते लोकसभा निवडणुकीत त्यांची झोळी मतांनी भरून वाहिली असती. पण तसे झाले नाही.

भाजप पाच वर्षे विरोधात राहिला असता तर लोकसभेच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या, विधानसभा निवडणुकीतही बहुमत मिळाले असते, अशी भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे. शिवसेनेतून फुटून सत्तेत सहभागी झाले नसते किंवा मुख्यमंत्रिपद मिळाले नसते तर शिंदे गटाचे काय झाले असते? त्यामुळे त्यागाची भानगड दोन्ही पक्षांनी शक्य तितक्या लवकर बाजूला सारणे, हेच त्यांच्या हिताचे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com