थोडक्यात महत्वाचे :
1. राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांमधील घोळांवर प्रकाश टाकत निवडणूक आयोग व भाजप यांच्यावर संगनमताचा आरोप केला, पण त्यांचे पुरावे केवळ विसंगती दाखवणारे होते, संगनमत सिद्ध करणारे नव्हते.
2. आयोग SIR प्रक्रियेद्वारे मतदारयाद्यांतील दुबार नोंदणी, चुकीची माहिती आणि बोगस नावे वगळण्याचे काम करत असून बिहारमध्ये ६५ लाख नावे तात्पुरत्या यादीतून वगळली आहेत.
3. बिहारमध्ये SIR ला विरोध करणारे राहुल व त्यांचे सहयोगी पक्ष देशभरात ही प्रक्रिया राबवायला मदत करतील का, यावर प्रश्नचिन्ह आहे.
Rahul Gandhi Points Out Major Voter List Errors : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरूवारी भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला. जवळपास एक तासांच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी मतदारयाद्यांमधील घोळावर प्रकाशझोत टाकला. एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये मतदान, एकाच राज्यांत विविध मतदारसंघात नोंदणी, एकाच पत्त्यावर 70-80 मतदार, बोगस नावांसह पत्ते असे अनेक मुद्दे त्यांनी पुराव्यानिशी दिले. निवडणुकांमध्ये घोळ होत असल्याचे दाखविण्याचा त्यांचा हेतू होता. पण त्यांनी आयोगाच्या हाती आयतं कोलीतही दिलं आहे.
राहुल गांधींनी कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या घोळाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी त्यांनी महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांची पडताळणी केल्यानंतर आढळून आलेल्या विसंगतींचे पुरावे दिले. पण त्यांनी दिलेले पुरावे हे मतदारयाद्यांमधील त्रुटी आहेत की ते घोळ जाणीवपूर्वक करण्यात आले आहेत, याचे पुरावे मात्र देता आले नाही. निवडणूक आयोग आणि भाजप मिळून मतांची चोरी करत असल्याचा आरोप ते करत आहेत. पण केवळ मतदारयाद्यांमधील त्रुटी दाखवून हे आरोप सिध्द कसे करणार, या प्रश्नच आहे.
मतदारयाद्यांमधील घोळ जगासमोर आणत राहुल यांनी उलट निवडणूक आयोगाच्या बिहारमधील भूमिका कशी योग्य आहे, हेच सांगितले आहे. बिहारमध्ये आयोगाकडून विधानसभा निवडणुकीआधी मतदारयाद्यांची पुनर्पडताळणी केली जात आहे. त्याला राहुल यांच्यासह त्यांच्यासोबतच मित्रपक्ष जोरदार विरोध करत आहेत. ही मतांची चोरी असल्याचे, मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आदी आरोप आयोगावर केले जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आयोगाने हाती घेतलेले हे काम बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
आयोगाने मतदारयाद्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी SIR ची प्रक्रिया राबविली जात असल्याचे स्पष्ट केले. मतदारयाद्यांमध्ये दुबार नोंदणी असू नये, पत्ते, नावे, फोटो बरोबर असावेत, बोगस मतदारनोंदणी असलेली नावे वगळली जावीत, मृत्यू झालेल्या मतदारांची नावे वगळली जावीत, यासाठी ही पुनर्पडताळणी केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार तब्बल ६५ लाख मतदारांची नावे तात्पुरत्या मतदारयाद्यांमधून वगळली आहे. त्यावरून विरोधकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली आहे.
राहुल गांधी कर्नाटकात अनेकांची दोन ठिकाणी नोंदणी असल्याचा दावा करत असताना बिहारमध्ये त्यांचे मित्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही दोन मतदार ओळखपत्र असल्याचे समोर आले आहे. आयोगाने त्यांच्याकडे याबाबत माहिती मागितली होती. आता नेमकं हे कसं घडलं, हे लवकरच समोर येईल. पण यानिमित्ताने मतदारयाद्यांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
आयोग SIR च्या निमित्ताने हेच दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल यांनी पत्रकार परिषदेतून सादर केलेले पुरावे हे मतदारयाद्यांमधील घोळ दाखवत आहेत. त्यामळे आता आयोगाला आता केवळ बिहारच नव्हे तर देशभरात SIR ची प्रक्रिया सुरू करण्यासाठी निमित्त मिळाले आहेत. मतदारयाद्यांमधील हे घोळ नक्कीच दूर व्हायला हवेत. त्यासाठी राजकीय पक्षांनीही निवडणूक आयोगाला मदतच करायला हवी. एकीकडे SIR ला विरोध असताना बिहारमध्ये एकाही राजकीय पक्षाकडन अद्याप तात्पुरत्या मतदार याद्यांवर हरकत नोंदविण्यात आलेली नाही. आयोगाकडून याबाबत रोजी माहिती दिली जात आहे, आवाहनही केले जात आहे.
मतदारयाद्यांमधील घोळावर बोलणाऱ्या राहुल यांच्या पक्षानेही हरकत घेतलेली नाही. त्यामुळे हा विरोध केवळ राजकीय हेतूने होत आहे का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. बिहारमध्ये विरोध करत असलेले राहुल गांधी देशभरात ही प्रक्रिया राबवायला मदत करणार का, हाही प्रश्नच आहे. कारण पुढील काही महिन्यांमध्ये बिहारसह तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या मोठ्या राज्यांतही विधानसभा निवडणूक होणार आहे. या राज्यांतील मतदारयाद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी विरोधक आयोगाकडे SIR चा आग्रह धरतील का, हे पाहावे लागेल.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: राहुल गांधींनी काय आरोप केला?
A: त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजप मतांची चोरीसाठी एकत्र काम करत असल्याचा आरोप केला.
Q2: SIR प्रक्रिया म्हणजे काय?
A: ही मतदारयाद्यांची पुनर्पडताळणी प्रक्रिया असून त्यात चुकीची, दुबार किंवा बोगस नावे वगळली जातात.
Q3: बिहारमध्ये किती नावे तात्पुरत्या यादीतून वगळली गेली?
A: तब्बल ६५ लाख नावे वगळली गेली.
Q4: विरोधकांनी सुप्रीम कोर्टात का धाव घेतली?
A: त्यांना वाटते SIR प्रक्रिया मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.