
One Person, Multiple Votes: Maharashtra to Karnataka : काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून भारतीय निवडणूक आयोगावर सातत्याने मतदान चोरीचा आरोप केला जात आहे. त्याबाबत त्यांनी गुरूवारी काही महत्वाचे पुरावेच दिले आहेत. एकाच व्यक्तीचे महाराष्ट्रासह कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील मतदारयादीतही नाव असल्याचे समोर आले आहे. तसेच 70 ते 80 जण एकाच खोलीत राहत असल्याचा पत्ताही मतदारयादीत असल्याचे पुरावे राहुल यांनी दाखवले.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्याकडे मतदान चोरीचे ठोस पुरावे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. त्यांनी त्यासाठी कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांमधील घोळाची माहिती दिली. या मतदारयाद्यात त्यांनी यावेळी दाखवल्या.
लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा मतदारसंघात 1 लाख 250 मतांची चोरी झाल्याचा दावा राहुल यांनी केला. पाचप्रकारे ही चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. मतदारयादीत 11 हजार 965 डुप्लिकेट मतदार आढळले. तर 40 हजार 9 मतदारांच्या नावासमोरील पत्ते चुकीचे किंवा बनावट होते. एकाच पत्त्यावर तब्बल 10 हजार 452 मतदार आढळून आल्याचा मोठा दावाही त्यांनी केला. तर नवमतदारांच्या नोंदणीसाठीच्या फॉर्म 6 चा गैरवापर झाल्याचे 33 हजार 692 प्रकार घडल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे.
काँग्रेसच्या टीमने काही पत्त्यांवर जाऊन मतदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण संबंधित पत्यांवर मतदार आढळून आले नाहीत, असे राहुल यांनी सांगितले. एकाच घरात 70 ते 80 मतदारांची नोंद झाली होती. त्या घरांचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले. हे केवळ एकाच मतदारसंघातील असून अशा अनेक मतदारसंघात से प्रकार घडल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
श्रीवास्तव नावाच्या एका मतदाराचे कर्नाटकसह महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही मतदान असल्याचा पुरावा राहुल यांनी दाखविला. असे अनेक मतदार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाकडून आम्हाला मतदारयाद्यांचा डिजिटल डेटा देण्यात आला नाही. त्यामुळे एकाच विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्यांची तपासणी करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. 40 ते 50 जणांची टीम अव्याहतपणे मतदारयाद्यांची तपासणी करत असल्याची माहिती राहुल यांनी दिली.
महाराष्ट्रातील निवडणुकीतही घोळ झाल्याचा आरोप राहुल यांनी पुन्हा केला. निवडणूक आयोगाकडे पक्षाने मशीन रिडेबल डाटा मागितला होता. सायंकाळी साडेपाचनंतर महाराष्ट्रात झालेल्या मतदानाबाबत प्रश्न होता. कारण प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर गर्दी नव्हती. सायंकाळी साडे पाचनंतर मतदारांच्या लांब रांगा नव्हत्या. याच कारणांमुळे आयोग भाजपसोबत असल्याचे जाणवले, असे राहुल गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्रासारख्या राज्यांत मोठ्या प्रमाणात मतदार वाढले, पण ते कसे वाढले, कुठून आले, यंत्रणेही कसे काम केले, याचे पुरावे असल्याचेही राहुल म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.