Sarakrnama
विश्लेषण

Maharashtra Politics : बेजबाबदार लोकप्रतिनिधींनी काढले नैतिकतेचे धिंडवडे...

Irresponsibility : वाढदिवशी आक्षेपार्ह भाषा, पोलिसाला मारहाण, अपघातग्रस्तांना मदत न करता काढला पळ...

अय्यूब कादरी

Irresponsible Public representatives : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून थक्क करणाऱ्या, विचार करायला भाग पाडणाऱ्या घटना घडत आहेत. यापैकी बहुतांश घटना लोकांतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींशी संबंधित आहेत. एक घटना कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित आहे. समाजमनाला याबाबत काही वाटत असेल का, की हे आता होणारच म्हणून समाजमनही बधिर झाले असेल?

महाराष्ट्राच्या समोर पुरोागामी असे बिरुद लावले जाते, पण त्यात आता फारसे तथ्य उरले नाही, हे दर्शवणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. तशा त्या गेल्या चार-पाच दिवसांपासून पुन्हा घडत आहेत. एखाद्या मंत्र्याने किंवा लोकप्रतिनिधीने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव करणाऱ्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करावा का? याला कायद्याचा अडसर नसावा, मात्र नैतिकतेचा विचार केला तर त्याचे उत्तर ढोबळमानाने नाही असे येईल. पण याचा विचार कोण करतो? ना समाज, ना लोकप्रतिनिधी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

म्हणूनच अशा कार्यक्रमांना तरुणांची उपस्थिती हजारोंच्या घरात असते. राजकीय नेत्यांसाठी ही गर्दी सोयीची असते. त्यामुळे तेथे तत्त्व वगैरे बाबींना शून्य किंमत असते. विचार समाजाने करायचा आहे. कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी असा कार्यक्रम सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) आयोजिला होता. तेथे पुढे काय झाले, हे अख्ख्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे.

दुसरी घटना व्यवस्थेच्या कानशिलातच आवाज काढणारी ठरली आहे. भाजपचे पुण्यातील आमदार सुनील कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार(Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरही त्यांनी हात उगारला. आमदारांना काही आचारसंहिता असते का? कायदा सर्वांसाठी समान असतो, त्यात भेदभाव नसतो, हे आमदार सुनील कांबळे यांना माहीत नसेल का?

त्यांना हे जर माहीत असेल आणि तरीही ते कर्तव्यावरील पोलिस कर्मचाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांसमोर हात कसा उगारू शकतात? याचे उत्तर फार सोपे आहे. सत्तेतून आलेला हा अहंकार असतो. असा अहंकार आला की मग योग्य काय आणि वाईट काय यातला फरक कळत नाही. सत्ता आपल्या पाठीशी आहे, ती आपल्याला वाचवेल, या समाजातून असे प्रकार घडतात. येथेही जनतेने, समाजानेच विचार करायचा आहे.

तिसरी घटना तर मानवतेला काळिमा फासणारी आहे. आपल्या ताफ्यातील वाहनाला अन्य वाहने धडकून अपघात होतो, काही जण जखमी होतात आणि ज्यांचा ताफा आहे ते आमदार महोदय तेथे न थांबताच, जखमींना मदत न करताच निघून जातात... किती हा मनाचा निगरगट्टपणा? हे आहेत भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर. ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कमालीची तत्परता दाखवली होती. त्याचाही विसर आमदार भोंडेकर यांना पडला. आमदार भोंडेकर यांनी अपघातस्थळी थांबून जखमींवर उपचारांसाठी तत्परता दाखवली असती तर ज्या जखमीचा जीव गेला, कोण सांगावे कदाचित तो वाचूही शकला असता. लोकप्रतिनिधीच जर असा बेजाबदारपणा दाखवू लागले तर मग कसे होणार?

या घटना पाहता समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असे सरधोपट विधान करून आता काहीही साध्य होणार नाही. राज्याचे भविष्य, भावी पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल, भावी पिढीच्या सामाजिक जाणिवा समृद्ध असाव्यात, असे वाटत असेल तर आता हालचाल करायची वेळ आली आहे. समाज राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरूक झाला आहे, याची जाणीव सर्व राजकीय पक्षांना करून द्यावी लागते.

सामाजिक, प्रबोधनात्मक चळवळींना पुन्हा एकदा बळ द्यावे लागेल. सर्व संकेत धुडकावणाऱ्या लोकप्रतिनिधींना, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, मतपेटीतून धडा शिकवावा लागेल. मात्र प्रश्न असा आहे, आपण यासाठी तयार आहोत का?

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT