Danve Vs Kale Sarkarnama
विश्लेषण

Danve Vs Kale: जालन्यात हवा काळेंची, पण बाजी दाजींची ?

Jalna Lok Sabha Constituency 2024: महाविकास आघाडीने माजी आमदार डॉ. कल्याण काळे हा जुना चेहरा मैदानात उतरवला. उशीरा उमेदवारी जाहीर करूनही काळे यांच्या उमेदवारीने मतदारांना 2009 मध्ये झालेल्या अटीतटीची आठवण करून दिली.

Jagdish Pansare

Jalna News: मराठवाड्यातील हायहोल्टेज लढतीपैकी एक असलेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघात मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत आपला खासदार निवडला आहे. भाजपने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सहाव्यांदा उमेदवारी जाहीर करत त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे गुऱ्हाळ लांबत गेल्याने दानवेंच्या प्रचाराची पहिली फेरी पुर्ण होऊन दुसरी सुरू झाली तरी जालन्याचा उमेदवार ठरला नव्हता.

त्यामुळे दानवे यांनी पहिल्यापासूनच प्रचारात आघाडी घेतली होती. त्यानंतर महाविकास आघाडीने माजी आमदार डॉ. कल्याण काळे (Raosaheb Danve Vs Kalyan Kale) हा जुना चेहरा मैदानात उतरवला. उशीरा उमेदवारी जाहीर करूनही काळे यांच्या उमेदवारीने मतदारांना 2009 मध्ये झालेल्या अटीतटीची आठवण करून दिली. याचा खरतरं काळे यांना फायदाच झाला. कारण 2009 नंतर झालेल्या सगळ्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा दारून पराभव केला होता.

2024 मध्ये जेव्हा कल्याण काळे (Dr. Kalyan Kale) यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा जालना, मराठवाडाच नाही तर संपुर्ण राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उडालेला होता. पाच टर्म सलग खासदार, दोनवेळा मंत्री राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधातील मतदारांना आकर्षित करण्याची हीच योग्य संधी असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेरले आणि लोकसभा लढवण्याचा अनुभव असलेल्या काळे यांना मैदानात उतरवले. प्रचारातही काळे यांनी दानवेंवर टीका करत चांगलीच हवा निर्माण केली.

राज्यस्तरावरील काँग्रेसच्या नेत्यांनी दानवेंच्या बालेकिल्ल्यात धडक देत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. पंचवीस वर्ष एकाच पक्षाचा खासदार, केंद्रात दोन वेळा मंत्री राहिलेल्या दानवेंच्या जालना मतदारसंघात लोकांना प्यायला पाणी का मिळत नाही? यासह घराणेशाहीच्या मुद्यावरून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख या नेत्यांना दानवेंना घेरण्याचा प्रयत्न केला. पण दानवे यांनी हे सगळे हल्ले मतदानाचा दिवस उजाडण्याआधीच परतवून लावल्याचे दिसून आले.

गेल्या लोकसभा निवडणुकीत उन्हाचा फटका बसल्यामुळे प्रचाराला बाहेर न पडू शकलेले दानवे तब्बल 3 लाख 32 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते. अर्थात तेव्हा शिवसेना-भाजप युती होती. आताही भाजपसोबत अर्धी शिवसेना आहे, पण माजी मंत्री अर्जुन खोतकर हे शेवटच्या टप्प्यात सक्रीय झाल्याने त्याचा किती फटका दानवेंना बसतो हे त्यांच्या मताधिक्याचा आकडा समोर आल्यानंतर स्पष्ट होईल.

मराठा आरक्षणाचा फटका कोणाला?

जालना मतदारसंघ गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे,तो या भागातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे. मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली तीन हजार लोकसंख्येच्या गावातून सुरू झालेले मराठा आरक्षण आंदोलन राज्यभरात पसरले. त्यामुळे जालना या सगळ्यामध्ये केंद्रबिंदू होता. मनोज जरांगे यांची रेकाॅर्डब्रेक सभा याच जालन्यात झाली, त्यानंतर ओबीसींनी एल्गार मेळाव्याची सभा इथूनच सुरू केली होती. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबेसी या संघर्षाचा बराच प्रभाव जालना मतदारसंघावर होता.

मराठा आंदोलन, गावंबदीचे पोस्टर या घटनेच्या वेळी रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमध्ये बॅनर फाडल्याच्या गैरसमजातून दानवे यांना लक्ष्य करण्यात आले होते. अगदी जरांगे यांनी तेव्हा दानवे यांना इशारा दिला होता. पण त्यानंतर दानवे यांच्या विरोधात वातवरण शमले होते. जरांगे यांच्याकडून जालना लोकसभा मतदारसंघात अमूक भूमिका समाजाने घ्यावे, असे सांगण्यात आले नव्हते.

तरी रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून फटका बसेल अशी चर्चा आहे. जर तो बसला तर त्याचा फायदा कल्याण काळेंना होईल, असा अर्थ लावला गेला. पण काळे यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील मंगेश साबळे या मराठा आंदोलनात सक्रीय असलेल्या तरुणाने अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि काही प्रमाणात हे गणित बदलले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात स्वतःची कार पेटवून देणे असो, की मग मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुंबईत जाऊन महागडी कार फोडने असो, या दोन घटनांमुळे फुलंब्री तालुक्यातील एका छोट्या गावचे सरपंच असलेले मंगेश साबळे राज्य पातळीवर झळकले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अपक्ष उमेदवार म्हणून मतदारसंघात साबळे यांनी घेतलेल्या प्रचार सभा, काढलेल्या पदयात्रांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात ते किती प्रभावी ठरतात यापेक्षा काळे यांच्या फुलंब्री मध्ये ते काळेंना किती नुकसान पोहचवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काळे आणि दानवे हो दोघेही मराठा उमेदवार आहेत. त्यामुळे मराठा मतांचे विभाजन होणार हे निश्चितच आहे. पण भाजपला जोडला गेलेला ओबीसी समाज या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

जालना लोकसभा मतदारंसघातील सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर बदनापूर, फुलंब्री, भोकरदन या मतदारसंघात भाजपचे अनुक्रमे नारायण कुचे, हरिभाऊ बागडे, संतोष दानवे हे आमदार प्रतिनिधित्व करतात. तर पैठण, सिल्लोड मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे आमदार आहेत. जालन्यात काँग्रेसचे कल्याण काळे वगळता संपुर्ण मतदारसंघावर युतीची पकड आहे. त्यामुळे दानवे यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. काळे यांनी जालना मतदारसंघात हवा निर्माण केली असली तरी बाजी दाजीच (रावसाहेब दानवे मतदारंसघात दाजी नावाने प्रसिद्ध आहेत) मारणार असेच सध्याचे चित्र आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT