Sangli News : जयसिंग कुंभार
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापनदिन मेळाव्यात अनेकांनी विविध इच्छा व्यक्त केल्या. पण चर्चा झाली ती प्रदेशाध्यक्षप जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या इच्छेची त्यांनी थेट शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जयंतरावांच्या मनात नेमकं काय सुरूय असे तर्क लढवले जाऊ लागले. ते भाजपप्रवेशासाठी उतावळे झाल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. पण या चर्चा आजच नसून त्या अनेक वर्षांपासून होताना दिसत आहेत. पण अलीकडे माध्यमे टीआरपीसाठी जयंत पाटील यांच्यामागे हात धुऊन लागल्याचे दिसत आहे.
अलीकडे आधी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आणि नंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या पक्षासमवेत तडजोडीची शक्यता वर्तवली जाऊ शकेल, अशी विधान केली. त्यानंतर चर्चेचे मोहोळ उठले.
परवाच्या मेळाव्यात जयंत पाटील यांच्या विधानानंतर शरद पवार यांनी पुन्हा निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्यास सांगताना तूर्त या चर्चावर त्यांच्या बाजूने पडदा टाकला. सभास्थळी जयंत पाटील समर्थकांनी त्यांच्या पद सोडण्याच्या घोषणेला जोरदार विरोध केला, हेदेखील जयंत पाटील यांचे राजकारण म्हणून पाहिले गेले. मात्र खरेच ते काय करतील, याबद्दलचे तर्क थांबत नाहीत.
खरे तर जयंत पाटील यांची भाजपशी मैत्री मुंडे-महाजनांपासूनची आहे. त्यामुळे सांगलीतील भाजपची ओळखच मुळी ‘जेजेपी’ म्हणजे ‘जयंत जनता पार्टी’ अशी झाली होती. ही ओळख पुसण्यासाठी ‘राष्ट्रवादी’तून भाजपवासी झालेले संजय पाटील यांनी गत जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आता ‘नो जेजेपी, ओन्ली बीजेपी’ असा नारा दिला.
खुद्द जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील तत्कालीन जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हाच्या जनता पक्ष सरकारमध्ये जनसंघाचाही समावेश होता. त्यामुळे भाजपशी सोयरिक व भाजपमध्ये प्रवेश यातला कोणता पर्याय ते निवडतील, याभोवती नेहमी चर्चा होत राहते.
जयंत पाटील यांच्या भाजपशी असलेल्या या सलगीमुळेच सर्वांचा घोळ होत राहतो. मात्र अशीच सलगी शरद पवार यांचीही भाजपशी आहे. जयंत पाटील त्यांच्याच तालमीतील पठ्ठे. त्यांच्याकडूनच अनेक डाव शिकलेले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमवेत जायचे की नाही, याचा निर्णय कार्यकर्त्यांशी बोलून होईल, असं सुळे सांगत असल्या तरी हा निर्णय सर्वस्वी पवार हेच घेतील, याबद्दल कोणालाही शंका नाही.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होईल का ओघाने येणारा प्रश्न. एक निश्चित की आजघडीला दोन्ही पक्षांतील नेत्यांना त्याबाबत कोणतीच घाई नाही. मुळात पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’तील मोजकेच दहा आमदार आहेत. बहुतेकांची सत्तेशी इतकी सलगी आहे, की कामे अडण्याचा प्रश्नच नाही. सत्तेत जाऊन लाभ इतकाच की, मंत्रिपद मिळेल.
मात्र महायुतीची रेल्वेच सध्या हाऊसफुल्ल असल्याने ती संधी अवघड आहे. मग विलिनीकरणाची चर्चा का व्हावी? कार्यकर्त्यांची पांगापांग होऊ नये म्हणूनच. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही चर्चा अधिक जोम धरत आहे, इतकेच. काही दिवसांपूर्वीच दोन्ही पवारांची जयंत पाटील यांच्यासह पुण्यात साखर संघात बंद खोलीत दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर या चर्चा वाढल्या, हे इथे लक्षात घ्यायला हवे.
जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदांवरून आमदार रोहित पवार यांच्याशी झालेल्या खडाजंगीमुळे राष्ट्रवादीतील गटबाजीबद्दल चर्चा होत असते. मात्र आगामी निवडणुकांसाठी पुन्हा एकदा जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात फिरतील.
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील ‘इनकमिंग’मागचे अर्थ लावले तर इथे भाजपच वजा होताना दिसत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांत लढण्यासाठी गोळाबेरीज करण्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर असेल.
एक निश्चित की, त्यांनी अलीकडच्या काळात भाजपच्या जातीयवादी-धार्मिक राजकारणावर केलेले शरसंधान त्यांची आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारे आहे. अगदी परवाच्या मेळाव्यातही त्यांनी ‘तुकाराम विरुद्ध नथुराम’ अशी मांडणी केली. जयंतरावांनी नेहमीच लांब पल्ल्याचे राजकारण केले. सत्तेसमवेत दूर राहून कशी हातमिळवणी करायची; हे ते शरद पवार यांच्याकडून शिकले आहेतच.
त्याचवेळी पवारांप्रमाणे आपल्या अटीवर राजकारण करण्याची धमक त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय निर्णयाबाबत जे काही होईल, ते त्यांच्या अटीवरच होईल. मात्र वेळ आली नाही आणि सावजही टप्प्यात नाही, अशीच एकूण स्थिती आहे. सध्या घाई माध्यमांना झाली आहे, जयंतरावांना मात्र नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.