Sangli News : राज्यात गेल्या वेळी महायुतीचे सरकार आले होते. आताही राज्यात सत्तेत महायुतीच आली आहे. यादरम्यान राज्यातील प्रमुख नेते महायुतीत जातील अशी शंका व्यक्त केली जात होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे देखील नाव आघाडीवर होते. दरम्यान या चर्चा काही काळ शांत झाल्या होत्या. पण भाजप नेते नितीन गडकरी यांच्या इस्लामपूर दौऱ्यामुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले होते. यानंतर बातम्या आणि चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. मात्र गडकरी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यामुळे आता जयंत पाटील यांचा भाजप प्रवेश होणार नाही हे पक्कं झालं आहे. मात्र आता सांगलीसह राज्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयंत पाटील कधी अॅक्टिव्ह होणार असा सवाल करत आहेत.
जयंत पाटील तसे मुरब्बी राजकारणी असून ते आठव्यांदा पूर्वीच्या वाळवा व सध्याच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडूण आलेले आहेत. पण, सध्या भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे. जयंत पाटील सत्तेत असो किंवा नसो ते चांगलेच अॅक्टिव्ह असतात. मात्र, सध्या ते तितकेसे ॲक्टिव्ह दिसत नाहीत. याआधी लोकसभेनंतर ते दुप्पट वेगाने कामाला लागले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली पीछेहाट आणि स्वतःच्या मतदारसंघात त्यांचे घटलेले मताधिक्य यामुळे ते शांत झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत निवडून येताना जयंत पाटलांची चांगली दमछाक झाली. त्यांना विरोधकांपेक्षा मतदारसंघात स्वकीयांशी अधिक संघर्ष करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालेली फुट यामध्ये अनेक कारणे असले तरी मुख्य कारण जयंत पाटील यांचा आत्मसन्मान व स्वाभिमान आडवा आल्याचे बोलले जाते. अजित पवार यांच्याशी त्यांचे असणारे शीतयुद्धच राष्ट्रवादी फुटण्याला कारणीभूत असल्याचा दावा अनेकांनी केला होता. हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. शरद पवारांच्या जवळचे 40 पेक्षाअधिक आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले. मात्र जयंत पाटील आणि त्यांचे काही निष्ठावंत आमदार आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्याबरोबर आजही असून ते किल्ला लढवत आहेत.
दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची झालेली वाहतात पाहता स्वकीयांनीच जयंत पाटील यांना विरोध केलेला आहे. तर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी जयंत पाटलांच्या ऐवजी इतर कोणालाही प्रदेशाध्यक्ष करा, प्रदेशाध्यक्ष बदला, अशी मागणी लावून धरली होती. याबाबत शरद पवार यांच्या कानावरही मागणी घातली होती.
दरम्यानच्या काळात पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली असून ती झटकण्यात जयंत पाटील यांनी कोणताच पुढाकार घेतलेला नाही. गेल्या वेळी कार्यकर्त्यांमधील मरगळ जयंत पाटलांनी हल्लाबोल यात्रा, शिवस्वराज्य यात्रा काढून दूर केली होती. त्यांनी विरोधी पक्षात असूनही सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम केले होते. मात्र, विधानसभेत झालेल्या पराभवामुळे अद्याप जयंत पाटील यांच्यासह पक्षच सावरलेला नसल्याचे दिसत आहे.
नुकताच कासेगाव येथे डॉक्टर भारत पाटणकर यांनी एक कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन या सरकार विरुद्ध लढण्याचा इरादा केला. यावेळी जयंत पाटील देखील कार्यक्रमात होते. त्यांनी सध्याची स्थिती पाहता लढायचे की शरण जायचे? असा सवाल शरद पवार यांच्या समोरच केला.
यामुळे आता एकटे जयंतराव पाटीलच नाही तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची लढण्याची मानसिकताच कमी झाली की काय? असा सवाल आता जनता करताना दिसत आहे. तर आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या असून जयंत पाटील आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा, लढण्याची हिंमत कधी देणार? ते स्वतः चार्ज कधी होणार? ते पक्षातील कार्यकर्त्यांना 'हाउ इज द जोश' कधी म्हणणार? का याकडे इस्लामपूर मतदारसंघासह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.