
Sangli : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे योगदान मोठे आहे. हे कोणीच नाकारत नाही. पण भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर मात्र शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना असल्याची टीका करताना दिसले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात जोरदार टीका झाली होती. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच कानटोचल्यानंतर पडळकर शांत झाले होते. पण आता पुन्हा एकदा पडळकर यांनी आपला मोर्चा शरद पवार यांच्या जवळचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना टार्गेट केलं आहे. गेल्या काही दिवसापासून ते त्यांच्यावर बेछूट आरोप करत खालच्या पातळीवर टीका करताना दिसत आहेत.
गेल्या काही दिवसापासून पडळकर यांनी माणगंगा कारखान्यावरून जयंत पाटलांवर आरोप आणि दावे केले होते. पडळकर यांनी, 'जिल्ह्यात कर्ज थकीत ठेवून कारखाना विक्रीला काढायचा आणि परत स्वतः घ्यायचं काम जयंत पाटील करत असल्याचा आरोप केला होता. तर त्यांचा इस्लामपूर पॅटर्न दहा वर्षानंतर आता पुन्हा सुरू झाल्याचा दावा देखील पडळकर यांनी केला होता. तर दहा वर्षापूर्वी जयंत पाटलांनी सर्वोदय कारखाना अशाच पद्धतीने घेतला. महाकाली बंद पाडला, आटपाडी कारखाना विकत घेण्याचे षडयंत्र रचल्याचा दावा पडळकर यांनी केला होता.
तसेच जयंत पाटील कायम करेक्ट कार्यक्रम करण्यात वस्ताद असून ते आतापर्यंत आपला विरोधच करत आले आहेत. जयंत पाटील कपटी आणि नीच असून मला विधानपरिषद मिळू नये यासाठी कारस्थान रचल्याचा दावा केला होता. तर या त्यांच्या कामात राष्ट्रवादीच्या आमदारांचा सहभाग होता. त्यांनी खोटी माहिती देताना आपला अर्ज बाद करा, अशी मागणी केली होती. तर या मागणी मागे जयंत पाटलांचा हात होता असाही दावा केला होता.
पण पडळकरांना जयंत पाटील का गुस्सा क्यों आता है? असा प्रश्न आता अनेकांच्या मनात येत असून याला कोणतेच राजकीय कारण दिसतच नसून फक्त भाजपचा मोहरा पडळकर असल्याचे दिसत आहे. भाजपला सध्या धनगर- मराठा विषय संपवायचा नसून हा वाद भिजत ठेवायचा आहे. यासाठीच्या अजेंड्यासाठी भाजपला पडळकर हवे आहेत. मग शरद पवार असो किंवा आता जयंत पाटील यांच्यावर टीका करत असले तरी. त्या आरोपात तथ्य नसले तरीही.
शरद पवार हे राज्याचेच नव्हे तर देशातील महत्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर थेट टीका केली की टीआरपी मिळून जाते. तर जयंत पाटील हे सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील केंद्र बिंदू असून सध्या राज्याच्या राजकाणाच्या सारीपाटावरील महत्वाचे नेते आहेत. यामुळे यांच्यावर टीका केली तर टीआरपी मिळण्याबरोबरच त्यांच्या विरोधकांना जवळ करता येईल असेच काहीसे पडळकर यांना वाटतं असावं.
सध्या सांगलीमध्ये पडळकर यांना टीका करण्यासाठी कोणता नेताच उरलेला नाही. ते सहजा सहजी काँग्रेसच्या नेत्यांवर तुटून पडत नाहीत आणि त्यांनी टीका केलीच तर काँग्रेसवाले यांना गांभिर्याने घेताना दिसत नाहीत. तर विश्वजीत कदम हे राजकीयदृष्ट्या स्ट्राँग असल्याने पडळकर त्यांच्या वाटेला जाताना दिसत नाहीत.
पण जयंतरावांचे जिल्ह्यात असलेले प्राबल्य आणि विरोधकांशीही असलेले राजकारणापलिकडचे संबंध हाच मुद्दा पडळकर यांना खटकणारा आहे. तर जिल्ह्यात सध्या सर्वच महत्वाचे नेते भाजपवासी झाल्याने त्यांना प्रमुख विरोधकाची स्पेस निर्माण करायची आहे. आणि विरोधक आहे एकमेव जयंत पाटील. यामुळेच सध्या पडळकर यांच्याकडून माणगंगा कारखान्याच्या मुद्द्यावरून जयंतरावांवर टीका करताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.