Congress Socialist Party Vision and Impact news  Sarkarnama
विश्लेषण

Socialist Movement India: तरुणांचे तीन लाडके नेते उंदरांचा सुळसुळाट असलेल्या इमारतीत गुप्तपणे भेटत...

Congress Socialist Party Vision and Impact:काँग्रेस समाजवादी पक्ष हा काँग्रेसच्या पोटातला पण काँग्रेसमधील प्रतिगामी मंडळींना न मानणारा गट होता. जयप्रकाशजींना त्या गटाचे सेक्रेटरी नेमण्यात आले. त्यांनी अखिल भारतीय दौरा करून देशात सर्वत्र लोकशाही समाजवादी गट स्थापन केले.

सरकारनामा ब्यूरो

कुमार सप्तर्षी

प्रथम लोकशाही समाजवादी विचारधारा भारतात कशी आली हे लक्षात घेतले पाहिजे. भारतातून अनेक लोक लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी जात. आपोआपच त्यांच्यावर इंग्लंडमधील लोकशाहीचे, समाजवादाचे संस्कार होत. त्यावेळी जर्मनीला उच्च शिक्षणासाठी जाण्याची पद्धत नव्हती. तरी डॉ. राम मनोहर लोहिया हे जर्मनीमध्ये डॉक्टरेट करण्यासाठी गेले होते.

हॅरॉल्ड रास्की, बर्ट्रांड रसेल, क्वेकर पंथीय, जॉर्ज बर्नार्ड शॉ, क्लेमन ॲटली, रस्कीन वगैरे विचारवंत इंग्लंडमध्ये सक्रिय होते. उच्च शिक्षणासाठी गेलेली अभिजनांची पिढी लोकशाही समाजवादाचे विचार घेऊन भारतात परत येत होती. पहिल्या महायुद्धानंतर रशियात साम्यवादी क्रांती झाली.

कार्ल मार्क्सच्या सिद्धांतानुसार प्रगत राष्ट्रांमध्ये क्रांतीचे अग्रदूत कामगार वर्ग असेल, असे भाकीत केले होते. त्यानुसार इंग्लंडमध्ये क्रांती व्हायला हवी होती. पण इंग्लंडसारख्या प्रगत देशामध्ये क्रांती न होता, ती झाली मागासलेल्या रशियामध्ये. तिथे एकपक्षीय हुकूमशाही स्थापित झाली. तिथे अनन्वित अत्याचार झाले.

जनतेची मुस्कटदाबी झाली. याची प्रतिक्रिया म्हणून इंग्लंडमध्ये लोकशाही समाजवादाचे वारे जोरदार वाहू लागले. हुकूमशाहीचा तिरस्कार होऊ लागला. रशियन विचारवंत टॉलस्टॉय यांचे साहित्य चोरून युरोपमध्ये आणले जायचे आणि त्याचे इंग्लिशमध्ये भाषांतर व्हायचे. ते मानवतावादी होते. त्यांच्या विचारांचाही परिणाम बरोबर होत होता. हे सारे विचार घेऊन सुशिक्षित अभिजनांची पिढी काँग्रेसमध्ये नेतृत्व करू लागली.

१९१५ मध्ये महात्मा गांधी यांचा भारतात प्रवेश झाला. काँग्रेसचे रूपांतर होऊ लागले. भिन्न भिन्न विचारसरणीचे लोक इंग्रजांविरुद्ध देश स्वतंत्र करण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी काँग्रेसच्या व्यासपीठावर एकत्र जमले होते. त्या काळात आर्य समाजाची चळवळ जोर धरत होती. शिक्षण क्षेत्रात त्यांचा बोलबाला होता. त्यांच्यामुळे काँग्रेसमध्ये हिंदू जनमताचा प्रवाह जोरदार होता.

निवडणुका लढवाव्यात की नाही...

गांधी स्वतः आणि जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस ही मंडळी समाजवादी व आधुनिक दृष्टिकोनाची होती. त्या सर्वांनी महात्मा गांधींचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यांना मानणारा मोठा तरुण वर्ग त्या काळात भारतात होता. ब्रिटिशांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू केल्या. तेव्हा काँग्रेसने त्या निवडणुका लढवाव्यात की नाही, असा मोठा वाद झाला. स्वातंत्र्यलढ्याचे सेनापती महात्मा गांधी यांच्या मनात संसदीय राजकारणाबदल अढी होती. पार्लमेंटचा अनुभव त्यांनी इंग्लंडमध्ये घेतलेला होता.

‘स्वतंत्र स्वराज्य पक्ष’

काँग्रेसमध्ये तिकीट मागण्यासाठी झुंबड उडत असे. पण हेच उमेदवार स्वातंत्र्य लढ्यात सत्याग्रह करून तुरूंगात जाण्याबाबत उदासीन असत. गांधींच्या धोरणात बदल करण्यासाठी जे निवडणूकवादी होते, त्यांनी काँग्रेसशी नाते कायम ठेवून ‘स्वतंत्र स्वराज्य पक्ष’ काढला. त्यापूर्वी बहिष्काराची, असहकाराची चळवळ होऊन गेली होती. जालियनवाला बाग या हत्याकांडानंतर गांधींचा ब्रिटिशांवरील विश्‍वास उडाला होता.

‘नाफेरवाद’

या पार्श्‍वभूमीवर गांधींची धोरणे बदलण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न सुरू केला. मोतीलाल नेहरू, हृदयनाथ कुंझरू, सरदार वल्लभभाई पटेलांचे बंधू विठ्ठलभाई पटेल वगैरे लोक ‘आम्ही निवडणुका लढवून प्रांतिक विधानसभांमधून इंग्रजांशी संघर्ष करू’ असा दावा करीत. त्यांना ‘फेरवादी’ असे म्हटले जायचे. याच्या विरोधात समाजवादी तरुण ‘नाफेरवाद’ म्हणून काँग्रेस अंतर्गत संघर्ष करू लागले. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पाठिंबा असे.

आचार्य नरेंद्र देव

पाटणा येथे काँग्रेसचे अधिवेशन होणार होते. गांधीजी तुरूंगात होते. या परिस्थितीत जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन, असफ अली वगैरे तरूणांनी पटण्याच्या अधिवेशनात गांधीजींची धोरणे बदलू पाहणाऱ्या, म्हणजे फेरवाल्यांना पराभूत करण्यासाठी अधिवेशनापूर्वी स्वतंत्र बैठक घेतली. एप्रिल १९३४ मध्ये या बैठकीत काँग्रेस सोशालिस्ट पार्टी स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्याचे अध्यक्ष झाले आचार्य नरेंद्र देव! आचार्य नरेंद्र प्रकांड पंडित होते. संस्कृत व पाली सारख्या प्राचीन भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ते मार्क्सवादी असले तरी लोकशाहीवादी होते.

कुरघोडी सुरू

काँग्रेस समाजवादी पक्ष हा काँग्रेसच्या पोटातला पण काँग्रेसमधील प्रतिगामी मंडळींना न मानणारा गट होता. जयप्रकाशजींना त्या गटाचे सेक्रेटरी नेमण्यात आले. त्यांनी अखिल भारतीय दौरा करून देशात सर्वत्र लोकशाही समाजवादी गट स्थापन केले. हा स्वतंत्र संघटन असलेला पक्ष नव्हता. काँग्रेसची धोरणे जहाल करणे आणि वसाहती अंतर्गत स्वराज्य मागण्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणे हे या गटाचे काम होते. १९३४ सालापासून १९४६ सालापर्यंत हा गट काँग्रेस पक्षाच्या पोटात राहिला. पण हे तरुण काँग्रेसमधील प्रतिगाम्यांच्या विरोधात धुवॉँधार प्रचार करतात. म्हणून कुरघोडी सुरू झाल्या. तथापि १९४२ मध्ये नऊ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक झाली.

काँग्रेस नेत्यांना पकडले...

देश नेतृत्वहीन झाला. त्यावेळी तरुणांचा हा समाजवादी गट पुढे आला. त्यांनी भूमिगत पद्धतीने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्यांचे काही नियम होते. ते रेल्वेचे रूळ उखडत, टेलिफोन केंद्रे, वायर नष्ट करीत पण; ते कधीही मनुष्यहानी करीत नसत. ते कोणाचे प्राण घेत नसत. ते प्रत्यक्ष बॉम्बस्फोट करण्यापूर्वी किंवा रेल्वे रुळावरून घसरण्यापूर्वी ब्रिटिशांना संदेश देत असत, ‘तुम्ही सर्व काँग्रेस नेत्यांना पकडले असले तरी आम्ही तरुण तुम्हाला प्रतिकार करणार. नेत्यांना पकडले म्हणून स्वातंत्र्याची चळवळ अंधारात गेलेली नाही.’

‘मूषक महाल’

या चळवळीत स्वतंत्र रेडिओ केंद्र सुरू झाले. उषा मेहता ते चालवीत. या भूमिगत चळवळीतून पुढे भविष्यात त्रिमूर्ती मानले गेलेले तरुणांचे तीन लाडके नेते जगासमोर आले. ते म्हणजे जयप्रकाश नारायण, डॉ. राम मनोहर लोहिया व अच्युतराव पटवर्धन! महाराष्ट्रात मुंबईच्या भेंडी बाजारात एका जुन्या इमारतीत ते गुप्तपणे भेटत. तो फार रोमांचकारी इतिहास आहे. त्यांच्या भूमिगत कार्यालयाचे नाव ‘मूषक महाल’ असे होते. बहुतेक त्या पडीक इमारतीत उंदरांचा सुळसुळाट असावा म्हणून त्या जागेचे हे नाव पडले असावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT