CJI Bhushan Gavai Expresses Displeasure : सरन्यायाधीशपदी नियुक्ती झालेले भूषण गवई यांनी बुधवारी (ता. १४) पदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन दिवसांतच म्हणजे शुक्रवारी सुप्रीम कोर्टातील महिला न्यायाधीश बेला त्रिवेदी सेवानिवृत्त झाल्या. नियमित सेवेनुसार त्या ९ जूनला सेवानिवृत्त होणार होत्या. कौटुंबिक कारणास्तव त्यांनी शुक्रवारीच काम थांबवले. मात्र, निवृत्तीनंतर त्यांना योग्य सन्मान न मिळाल्याने सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त केली.
निवृत्त न्यायाधीश बेला त्रिवेदी या गुजरात हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात पदोन्नती झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. विविध निकालातील भूमिकांमुळे त्या सातत्याने चर्चेत असायच्या. सुप्रीम कोर्टाने मागील वर्षी एससी, एसटी आरक्षणांतर्गत उपवर्गीकरण करण्यास मान्यता दिली. मात्र, या खंडपीठामध्ये समावेश असलेल्या त्रिवेदी यांनी त्यास असहमती दर्शविली आहे. सात न्यायाधीशांच्या खंडपीठातील त्या विरोध करणाऱ्या एकमेव न्यायाधीश होत्या.
न्यायालयाच्या या निकालानंतर देशात अनेक सामाजिक संघटना, राजकीय नेत्यांनी त्यास विरोध केला होता. बेला त्रिवेदी यांनी उपवर्गीकरण असंविधानिक असेल, असे आपल्या निकालात म्हटले होते. त्यामुळे त्यांचा हा निकाल ऐतिहासिक ठरला होता. त्याचप्रमाणे वकिलांविरोधा त्यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला.
सुप्रीम कोर्टाच्या परंपरेनुसार, एखादे न्यायाधीश सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजनाची जबाबदारी वकिलांच्या संघटनेवर असते. मात्र, या संघटनेकडून म्हणजेच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून बेला त्रिवेदी यांच्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले नाही. त्याची सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही दखल घेतली.
सरन्यायाधीश गवई यांनी असोसिएशनच्या या निर्णयावर शुक्रवारीच तीव्र नाराजी व्यक्त कली. असोसिएशनने अशी भूमिका घ्यायला नको होती, त्याचा मी निषेध करतो. मात्र, औपचारिक खंडपीठाच्या कामकाजात बार असोसिएशनचे अध्यक्ष कपिल सिब्बल आणि उपाध्यक्ष रचना श्रीवास्तव यांनी हजेरी लावल्याने त्यांचे कौतुक करतो. यावरूनच त्या किती चांगल्या न्यायाधीश आहेत, हे दिसते.
बार असोसिएशनशी संबंधित वकिलांच्या बनावट वकीलपत्राचा वापर करून सुप्रीम कोर्टात बनावट याचिका दाखल केल्याच्या प्रकरणात बेला त्रिवेदी यांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. कथित गैरवर्तनप्रकरणी त्यांनी काही वकिलांवर कारवाईचे आदेशही दिले होते. त्यांनी वकिलांची माफीही स्वीकारली नव्हती. त्यांनी बार असोसिएशनमधील पदाधिकाऱ्यांवरही उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच असोसिएशनकडून परंपरेनुसार त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला नाही, अशी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.