"कळव्यातील जनतेला माझा संदेश.... 'निष्ठा माझी शक्ती" या तीनच शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला प्रत्युत्तर दिले. संपूर्ण मुंब्रा-कळवा मतदारसंघात आव्हाड यांनी या 3 शब्दांचे बॅनर्स लावले आहेत. बॅनरच्या एका बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला आव्हाडांचे छायाचित्र आहे. याशिवाय निष्ठा जनतेशी, निष्ठा मतदारांशी, निष्ठा पक्षाशी, निष्ठा नेत्याशी..!! निष्ठेत तडजोड नाही..! डॉ. जितेंद्र आव्हाड! असा त्या बॅनरवर उल्लेख केला आहे.
पण केवळ निष्ठाच आणि भावनिक साद आव्हाड यांना त्यांचा बालेकिल्ला परत मिळवून देणार का? शिंदे यांनी उद्ध्वस्त केलेला गड पुन्हा जिंकणं आव्हाड यांच्यासाठी कितपत अवघड आहे? जवळपास सर्व नगरसेवक सोडून गेलेले असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ आली असताना पुन्हा बांधणी करण्याचे आव्हान आव्हाड यांच्यासमोर आहे. हे आव्हान त्यांना पेलवणार का?
दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्यामुळे ठाणे जिल्ह्यावर मागच्या अनेक वर्षांपासून भगवा फडकत आहे. मध्यंतरी गणेश नाईक राष्ट्रवादीत असताना एकदा जिल्ह्यात घड्याळाचा गजर झाला होता. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सेनेने जोरदार कमबॅक केले. पण उत्तरेत जितेंद्र आव्हाड यांनी आपले वर्चस्व तयार केले आणि कायम राखले देखील.
त्यामागे कारणेही तशीच होती. इथे आगरी-कोळी आणि मुस्लिम मतदारवर्ग मोठा आहे. या वर्गाने आतापर्यंत कायमच आव्हाड यांना साथ दिली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भगवं वारं वाहत असलं तरीही 2009 पासून इथे आव्हाड यांचचं प्राबल्य आहे. ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवकही कळबा आणि मुंब्रा भागातूनच निवडून येतात.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे 2014, 2019 आणि 2024 असे सलग तीनवेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. आव्हाड यांचा मुंब्रा-कळवा हा विधानसभा मतदारसंघ शिंदे यांच्या मतदारसंघाचा भाग आहे. पण 2014 पासून एकाही निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना कळवा-मुंब्रातून आघाडी मिळवता आलेली नाही.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत तर श्रीकांत शिंदे नवख्या वैशाली दरेकर यांच्या समोर तब्बल 65 हजारांनी पिछाडीवर पडले. शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीचे पानीपत झाले, पण आव्हाड 95 हजार मतांनी विजयी झाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात होत आहेत.
2017 साली झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेने 67 जागा जिंकत महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. पण कळव्यात अपेक्षित यश मिळाले नव्हते. कळव्यातील प्रभाग क्रमांक 23 चे पूर्ण पॅनेल राष्ट्रवादीने जिंकले होते. उर्वरित दोन पॅनेलमध्ये शिवसेनेचे 3 नगरसेवक निवडून आले. आव्हाडांच्या रणनीतीपुढे कळवा, मुंब्रा शिंदे यांना जिंकता आला नव्हता.
आजघडीला शिवसेनेची ठाणे शहरात चांगली ताकद आहे. पण नौपाडा आणि घोडबंदर पट्ट्यात भाजपने आपले पाय घट्ट रोवले आहेत. भाजपच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी आणि आव्हाड यांचे या भागातील वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या रडारवर मुंब्रा-कळवा मतदारसंघ आहे. त्यातूनच शिंदे यांनी आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावून उद्ध्वस्त केला आहे.
कळवा विभागातील जवळपास सर्व माजी नगरसेवकांनी शिवसेना किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यात आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यापासून माजी नगरसेविका मनाली पाटील, मनिषा साळवी, ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील अशा जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.
मिलिंद पाटील हे तर आव्हाड यांचे उजवे हात अशी ओळख होती. तेच आव्हाड यांच्या निवडणुकीचे बॅक ऑफिस बॉय होते. आव्हाड यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आव्हाडांच्या प्रमुख शिलेदारांना शिवसेनेने पक्षात सामावून घेतल्यानंतर आव्हाड काही तरी बोलतील, अशी शक्यता होती, पण त्यांनी याबद्दल एकही चकार शब्द काढला नाही. उलट भला मोठा बॅनर कळवा नाक्यावर लावून कळवावासीयांना निष्ठेचा संदेश दिला आहे.
पण आव्हाड यांच्या अत्यंत जवळचे नगरसेवकच सोडून गेल्याने त्यांच्यापुढे हा बालेकिल्ला कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे. लोकप्रतिनिधींनी साथ सोडली तर मतदारही त्यांच्या मागे जातात हे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आले होते. अशात दहा वर्षांपैकी ते केवळ अडीच वर्षे सत्तेत होते. त्यातही कोरोनाचे संकट होते. त्यामुळे कामाला फारसा वाव मिळाला नाही.
यामुळे आव्हाड यांच्याकडे मतदारसंघातील जनतेला आकर्षित करण्यासाठी, दाखवण्यासाठी, त्याचा गाजावाज करण्यासाठीचे काम नाही. त्यातच अनुभवी प्रतिनिधीच सोबत नाहीत. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आव्हाड यांनी जादू न दाखवल्यास त्यांच्या हातून हा बालेकिल्ला जाऊ शकतो असे चित्र आहे. यावर आव्हाड आता दुसरी कोणती रणनीती तयार करतात का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.