Ravindra Chavan Eknath Shinde sarkarnamRavindra Chavan Eknath Shindea
विश्लेषण

BJP vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे 'गाफील', भाजपने बालेकिल्ल्यात हातपाय पसरले! अशी फिरली कल्याण-डोंबिवलीतील निवडणूक!

Kalyan-Dombivli Municipal Politics : कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. येथील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ते भाजपला सोबत घेत पण शिवसेनेचा मोठा भाऊ होता.

शर्मिला वाळुंज

KDMC Politics : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुक युतीत लढण्याचे ठरल्यानंतर जास्त जागांसाठी अडून राहणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला लढणाऱ्या जागांच्या मानाने अपेक्षित यश गाठता आलेले नाही. तर भाजपाने मात्र येथे आपले हातपाय जोरात पसरल्याचे दिसून येते. शिवसेनेने ७० जागांवर तर भाजपाने ५६ जागांवर निवडणुक लढवली. यात शिवसेनेला ७० पैकी केवळ ५३ जागांवर विजय मिळाला तर भाजपाने ५६ पैकी ५० जागा निवडून आणल्या.

बिनविरोधची खेळी खेळत भाजपाने आपले पारडे आधीच जड केले. शिवसेना शिंदे गटाने मात्र ठाकरेंचे नामोनिशाण संपविण्याच्या नादात आपले नुकसान करुन घेतल्याचे बोलले जात आहे.

कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. येथील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कायम शिवसेनेने भाजपाचा हात धरला आहे. भाजपासोबत युती केली तरी मोठ्या भावाच्या भूमिकेत शिवसेना राहीली असून येथे शिवसेनेचाच महापौर आत्तापर्यंत झालेला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने ५३ जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपाला ४३ जागांवर विजय मिळाला होता.

शिवसेनेत फुट पडली आणि त्यासोबत कल्याण डोंबिवलीचे राजकारण देखील फिरले. कल्याण हा शिवसेनेचा गड असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कल्याण डोंबिवलीतून हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नगरसेवक त्यांच्या सोबत होते. मात्र नंतर साम, दाम दंड, भेद अशा सर्व बळाचा वापर करत शिंदे यांनी शिवसैनिकांना आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूने वळते करुन घेतले.

यामुळे शिंदे गटाची ताकद एकीकडे वाढली असताना लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराने शिंदे यांच्या सुपूत्राला घाम फोडला होता. भाजपा आणि मनसेचा सुरुवातीला शिंदे यांना झालेला विरोध आणि विधानसभेला दिपेश म्हात्रे आणि महेश गायकवाड यांची नाराजी शिंदे गटाला भोवली असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेत पडलेली फूट आणि शिंदे गटातील नाराजी नाट्य याचाच फायदा वारंवार भाजपाने करुन घेतल्याचे दिसून आले. लोकसभा, विधानसभा तसेच पालिका निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या का असेना भाजपाने शिंदे गटाला लक्ष केले. भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालिका निवडणुकी आधीच पक्षाचे स्थान मजबुत करण्यास सुरुवात केली. मनसे, ठाकरे गटातील मातब्बर शिलेदार यांच्याशी भेटी गाठी सुरु करुन त्यांना आपल्या बाजूने वळते करुन घेतले. तर शिवसेना शिंदे गट केवळ ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी धडपडत राहीली.

शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी ठाकरे गटाला फोडून सर्वतोपरी प्रयत्न करुन देखील त्यांना यंदाच्या निवडणुकीत हवे तसे यश मिळविता आले नाही. यंदाच्या निवडणुकीत तब्बल ४८ माजी नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. यामध्ये बहुतांश हे भाजपा आणि शिंदे यांचे आहेत.

मागील निवडणुकीत शिवसेनेचे ५३ नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये थोडा ही बदल यंदा झालेला दिसून येत नाही. तर भाजपाने मात्र ४३ जागांवरुन ५० जागांवर मजल मारली आहे. डोंबिवली आणि कल्याण पश्चिमेला शिंदे यांना जोरदार फटका बसला आहे.

कल्याणमधील मयूर पाटील, पूजा जोगदंड, संजय पाटील, वैजयंती घोलप, कस्तुरी देसाई , विद्याधर भोईर, वंदना गीध तर डोंबिवलीतील नितीन पाटील, रवीना पाटील, रवी पाटील, रुपाली म्हात्रे यांसारख्या दिग्गजांचा पराभवाचा फटका शिंदे गटाला बसला आहे. शिंदे गटातून नाराज होऊन गेलेले दिपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे यांचा फटका शिंदे यांना बसला आहे.

तर भाजपाचे विकास म्हात्रे यांना शिंदे यांनी फोडले असले तरी त्यांनी केवळ त्यांची व पत्नी कविता म्हात्रे यांची सीट शिंदे यांना मिळवून देण्यावरच केवळ फोकस केल्याचे दिसून आले.

ठाकरे गटाचे अस्तित्व कायम

लोकसभा - विधानसभेत पदरी पडलेले अपयश आणि त्यानंतर सुभाष भोईर, धनंजय बोडारे, दिपेश म्हात्रे यांसारख्या ठाकरेंच्या शिलेदारांनी धरलेली भाजपाची कास यामुळे कल्याण डोंबिवलीत ठाकरे गट शिल्लक रहातो की नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र ठाकरे गटाने फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेतल्याचे यंदाच्या निवडणुकीत दिसून आले आहे. उद्धव ठाकरे यांना केवळ काही जागांवर यश मिळेल

डोंबिवलीत भाजपाने एकहाती १३ नगरसेवक बिनविरोध निवडून आणले हे मिळून एकूण ५० जागा त्यांनी निवडून आणत आपली ताकद वाढवली आहे. डोंबिवली मध्ये सर्वाधिक जागा भाजपाने निवडून आणल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT