Karuna Munde Controversy: राज्याच्या राजकारणात गुरुवारची एक घटना मोठ्या उलथापालथींची ठरण्याची शक्यता आहे. गेल्या 50-55 दिवसांपासून राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. मस्साजोग (ता. केज. जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या, परभणी येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू या घटना त्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आक्रमक झालेल्या मुंडे यांच्यासाठी आता गुरुवार धक्कादायक ठरला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर 'मकोका' लावण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे कृषिमंत्री होते. त्या कालावधीत त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांनिशी केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे आक्रमक झाले होते. त्यांनी दमानिया यांच्यावर पलटवार केला होता. गुरुवारी मात्र मुंडे यांना धक्का बसला तो करुणा मुंडे यांच्यामुळे. करुणा मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत, धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार केला, हे न्यायालयाने मान्य केले आहे.
करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी, असे आदेश न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहेत. करुणा मुंडे यांनी त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केलेला आहे. आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण झाले, असा आरोपही करुणा मुंडे करत आहेत आणि या दोन्ही प्रकरणांचा पाठपुरावा करणार, असे त्या सांगत आहेत. दोषी असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आधीच्या प्रकरणांत धनंजय मुंडे यांच्याबाबत घेतली आहे. आता गुरुवारच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर पक्ष काय करणार, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
धनंजय मुंडे यांची सुटका नाही, त्यांना राजीनामा द्यावा लागणार, अशी शक्यता ताज्या घडामोडीमुळे निर्माण झाली आहे. संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात मुंडे यांच्या निकटवर्तीयांना अटक करण्यात आली आहे. त्या प्रकरणात मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांसह मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने केली जात आहे. दोषी सिद्ध झाल्याशिवाय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. मंत्री धनंजय मुंडे हे कौटुबिंक हिंसाचारात दोषी आढळले आहेत.
आता पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, मात्र त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारवर तसूभरही परिणाम झाला नाही. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा देत मुंडे निर्दोष असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात राजकीय, सामाजिक गुंतागुंत निर्माण झाली. भगवानगडाचा पाठिंबा मिळताच धनंजय मुंडे यांची देहबोली बदलली. त्यामुळे कृषी घोटाळ्याचाही त्यांच्यावर परिणाम होत नसल्याचे दिसत होते.
खासदार सुप्रिया सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कृषी घोटाळा, पिकविमा घोटाळ्याचे प्रकरण संसदेत मांडले. पिकविम्यात घोटाळा करणारा कुणीही असला तरी त्याला सोडणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेत सांगितले. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यापाठोपाठ करुणा मुंडे प्रकरणात त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विरोधक नव्या जोमाने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणापासून पाठ सोडवून घेणे धनंजय मुंडे यांच्यासाठी अवघड दिसत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, कृषी, पिकविमा घोटाळ्यात मुंडे यांचा राजीनामा घेतला असता तर त्याचा फटका सरकारलाही बसला असता. त्यामुळे सरकारनेही स्वतःचे हात बांधून घेतले होते. करुणा मुंडे प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला तर सरकारला फार मोठा असा फटका बसण्याची तशी शक्यता वाटत नाही. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप न्यायालयाने मान्य केले आहेत. त्यामुळे मौका भी है दस्तूर भी है... असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.