Eknath Khadse, Girish Mahajan, Sarkarnama
विश्लेषण

Jalgaon Politics: खडसे-महाजनाचं राजकारण बुधवार पेठ ते अब्रुनुकसानीच्या दाव्यापर्यंत कसं पोहोचलं?

Eknath khadse Vs Girish Mahajan:एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादाची मुळं 1990 च्या दशकापासूनच पाहायला मिळतात, पण हा संघर्ष हळूहळू 2000 नंतर अधिक टोकाचा होत गेला. दोघेही जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आहेत.

Mangesh Mahale

Khadse vs Mahajan Controversy: एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार, भाजपमधील ज्येष्ठ नेते, सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे अन् भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय आणि वैयक्तिक भांडणं ही महाराष्ट्रातील राजकारणात दीर्घकाळापासून सुरु असलेला राजकीय संघर्षाची कहाणी आहे.

या दोघांमधील संबंध तणावपूर्ण का झाले, यामागे काही महत्त्वाचे राजकीय आणि वैयक्तिक कारणं आहेत, खडसे-महाजन यांचे राजकारण पुण्यातील बुधवार पेठेपर्यंत का पोहोचले, याबाबत जाणून घेऊया.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वादाची मुळं १९९० च्या दशकापासूनच पाहायला मिळतात, पण हा संघर्ष हळूहळू २००० नंतर अधिक टोकाचा होत गेला. दोघेही जळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आहेत.

खडसे हे एकेकाळी भाजपचे राज्यातील ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. पण भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराचे आरोप नाथाभाऊवर झाले, अन् पक्षात ते मागे पडले, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले गिरीश महाजन यांना पक्षात पुढे आणण्यात आल्याचे बोलले जाते.

भाजप पक्षश्रेष्ठी आपल्याला डावलत असल्याचा थेट आरोप करीत माझ्या विरोधात कट केला गेला, यामागे महाजन आहेत, असा आरोप खडसे यांनी केला. विशेषतः निवडणुकांच्या काळात किंवा पक्षांतर्गत पदांबाबत दोघांनीही एकमेकांवर वेळोवेळी थेट आरोप करीत वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. खडसे यांचे भाजपमधील स्थान राज्यात आणि विशेषता उत्तर महाराष्ट्रात पहिले होते,

पणमहाजन यांची वाढती लोकप्रियता आणि पक्षातली पकड ही खडसेंना अस्वस्थ करणारी ठरली. काही काळानंतर खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर महाजन हे त्यांच्या निशाण्यावर सतत राहिले. महाजन यांच्यावर टीका करण्याची आणि गंभीर आरोप करण्याची एकही संधी खडसेंनी सोडली नाही.

गिरीश महाजन हे गुजर पाटील समाजाचे तर एकनाथ खडसे हे लेवा पाटील समाजाचे आहे. या समाजाचे प्राबल्य दोन्ही नेत्यांच्या मागे आहे. दोन्ही नेत्यांचे प्रस्थ वेगवेगळ्या भागांमध्ये आहे. गिरीश महाजन हे जामनेर भागाचे नेते तर एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर, बोदवड, मलकापूर भागात आहे.

संघर्षाची पार्श्वभूमी

एकनाथ खडसे हे १९८० पासून भाजपमध्ये सक्रीय राहून सहावेळा आमदार आणि मंत्री झाले. त्यांच्या खांद्यावरूनच गिरीश महाजन यांचं राजकारण फुललं. पण शिष्यानेच गुरुचा पाय ओढल्याची भावना खडसेंच्या मनात खोलवर बसली. हेच त्यांच्या संघर्षाची सुरुवात ठरली.

1990 – 2000 : खडसे विरुद्ध महाजन

एकनाथ खडसे हे त्या काळात भाजपच्या महाराष्ट्रातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. ते पाच-सहा वेळा आमदार झाले होते, आणि त्यांनी मंत्रीपदेही सांभाळली होती. गिरीश महाजन हे या काळात भाजपमध्ये खडसेच्या तुलनेत नवखे होते. पण जळगावा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी चांगलाच दबदबा निर्माण केला. खडसेंच्या नेतृत्वाखाली महाजनांनी काम केले आहे. दोन्ही नेत्यामध्ये गटबाजीचं बीज याच ठिकाणी पेरलं गेलं.

2000 – 2010 : वाढता प्रभाव आणि अंतर्गत स्पर्धा

महाजन यांनी आपल्या राजकीय कार्यकौशल्याने जळगाव जिल्ह्यात स्वतःचा स्वतंत्र गट तयार केला. खडसे यांचं वर्चस्व असताना महाजनांनी स्वतःचा प्रभाव वाढवण्यास सुरूवात केली, विशेषतः जळगाव जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकांमध्ये खडसे विरुद्ध महाजन अशी अंतर्गत गटबाजी स्पष्टपणे दिसू लागली.

2014 – 2016 : टोकाचा संघर्ष

2014 ला भाजप सत्तेत आल्यानंतर, खडसे यांना मोठं स्थान मिळालं – ते महसूलमंत्री झाले. पण याच काळात त्यांच्यावर भोसरीतील जमीन गैरव्यवहाराचे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर आरोप झाले.त्यानंतर 2016 मध्ये खडसे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला. फडणवीस यांच्या 'आशीर्वादानं'महाजनांनी हा 'डाव'रचला आणि खडसेंना अडचणीत आणलं, असा आरोप खडसेंच्या समर्थकांनी केला. खडसेंच्या समर्थकांचा आरोप होता की महाजनांनीच डाव रचून त्यांना अडचणीत आणलं.

2002, 2007, 2012: स्थानिक स्वराज संस्था निवडणूक

जळगाव जिल्हा परिषद, पंचायत समितीतील निवडणुकीत वेगवेगळे आपले पॅनल उभे करुन महाजन आणि खडसे यांनी स्वतःचा गट मजबूत केला. यातून वाद होत गेला. अनेक वेळा भाजपच्या उमेदवारांबाबत अंतर्गत संघर्ष झाला, उमेदवारीवरून दोघांमध्ये मतभेद झाले. काही वेळा हे वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचले.

2014 विधानसभा निवडणूक

भाजप सत्तेत आल्यावर, खडसे हे महसूलमंत्री झाले, तर महाजन जलसंपदामंत्री झाले. दोघांनीही जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या विकासकामांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.महाजन यांचं पक्षांतर्गत वजन वाढत होतं, जे खडसेंना खटकत होतं. काही कार्यकर्त्यांना खडसे गटात स्थान न दिल्यामुळे असंतोष वाढला.

2019 तिकीट नाकारलं

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत खडसे यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं, त्यांच्या मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली. 'माझं तिकीट महाजनांमुळेच कट झालं, असा थेट आरोप खडसेंनी केला होता.

2020: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

खडसे भाजपसोडून NCP मध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी थेट महाजनांवर आरोप केले. 'महाजनांच्या कटकारस्थानामुळेच मला भाजप सोडावं लागलं,'असे खडसे म्हणाले होते. त्यावर "खडसेंचा राग वैयक्तिक आहे. त्यांनी पक्षाचा विचार न करता फक्त सूड उगवण्यासाठी पक्ष सोडला,' असे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले होते.

2023-2024: माध्यमांतील आरोप–प्रत्यारोप

खडसे-महाजन दोघांनीही अनेक वेळा प्रसार माध्यमांमधून एकमेकांवर निशाणा साधला आहे.

खडसे: "भाजपमध्ये आता काम करण्याची संधी नाही. काही लोक पक्षाला स्वतःची जहागीर समजतात."

महाजन: "खडसेंनी स्वतःच्या चुका स्वीकारल्या असत्या तर आजही पक्षात असते."

खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी,ईडीकडून (ED) अटक होणार असल्याच्या भीतीने खडसे यांना कोरोना झाल्याचा आरोप महाजन यांनी केला होता. नंतर महाजन यांना कोरोना संसर्ग होताच खडसे यांनी त्याचे उट्टे काढले होते. अटकेच्या भीतीने महाजन यांना कोरोना झाला, असा टोला खडसेंनी लगावला होता. त्यावर महाजन यांनी खडसे यांना ठाण्याच्या हॉस्पिटल मध्ये दाखवावे, अशी टीका केली.

यानंतर खडसे यांनी गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला लगावला. त्याला पुन्हा महाजन यांनीही प्रत्युत्तर दिले होते. खडसेंना ठाण्यातील रुग्णालयात पाठवा, असे महाजन म्हणाले होते.

काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत,असा दावा काही दिवसापूर्वी खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला होता. याप्रकरणी गिरीश महाजन यांनी कोर्टातच खेचलं आहे.

खडसेवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. जानेवारी 2022मध्ये गिरीश महाजन यांना बुधवार पेठेत दाखवावे, असा टोला खडसे यांनी लगावला होता. त्यावर सडक्या डोक्यातील विचार, असा टोला महाजन यांनी खडसे यांना लगावला होता.

त्यानंतर खडसेंनी बुधवार पेठेतील आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. पुण्याच्या बुधवार पेठेत दगडूशेठ गणपती मंदिर आहे. त्या ठिकाणी जाऊन महाजन यांनी दर्शन घ्यावे, असे मला सुचवायचे होते. परंतु, तुमच्या मनात असते तेच तुम्हाला दिसते. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' असेच ते आहे. माझा दृष्टिकोन चांगला आहे. गिरीश महाजन यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घावे त्यांना त्याचा लाभ होईल, असे ते म्हणाले होते.

उत्तर महाराष्ट्रात विशेषतः जळगाव जिल्ह्यात, गेल्या तीन दशकांपासून एक मोठा राजकीय संघर्ष सतत उभा आहे – तो म्हणजे खडसे आणि महाजन यांच्यातील वैयक्तिक आणि राजकीय संघर्षाचा.

हा वाद केवळ दोन नेत्यांमधील असला तरी त्याची व्याप्ती संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरली आहे. खडसे-महाजन संघर्ष ही एक सत्तेची, अहंकाराची आणि राजकीय सूडाची कहाणी आहे. एका बाजूला गुरुने शिष्याला मोठं केलं, पण शिष्य मोठा झाल्यावर गुरूच बाजूला पडला ही व्यथा आहे.

हे दुदैव ....

दुसरीकडे, नव्या नेतृत्वाने जुने वर्चस्व मोडून स्वतःचं स्थान निर्माण केलं – ही जिद्द. पण दोन्ही बाजूंनी व्यक्तिशः एकमेकांवर केलेल्या टीका, आरोप, आणि टीका या संघर्षाला वैयक्तिक शत्रुत्वाचं स्वरूप देतात. 2019 च्या निवडणुकीनंतर गिरीश महाजन यांचे जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व आहे, तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून खडसे हे त्यांच्यावर नेहमीच टीकेच बाण सोडत असतात. आजही, हे वैर पूर्णपणे मिटलेलं नाही.

जळगाव जिल्ह्याचं राजकारण यामधून अजून काही वर्षं सावरू शकणार नाही, असे चित्र आहे. हेवेदावे, वर्चस्व, महत्त्वाकांक्षा, आणि पक्षांतर्गत सत्ता-संघर्ष यामुळे हा वाद इतका खोल गेला आहे की, कधी काळी एकाच पक्षात असूनही हे दोघे नेते जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊ शकत नाहीत, हे दुदैव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT