Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama
विश्लेषण

सोमय्यांनी दिवाळीआधीच अचानक का पेटवली फटाक्यांची वात?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिवाळीनंतर राजकीय फटाके फोडणार असल्याचे सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारमधील तीन मंत्री व जावयाचे सहा घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी रविवारी दिला होता. पण त्यांनी सोमवारी अचानक पत्रकार परिषद घेत फटाक्यांची वात पेटवली. यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर आरोप केले.

मागील काही महिन्यांपासून सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे. मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी व शिवसेनेतील 11 नेत्यांची नावेही जाहीर केली आहेत. त्यांनी काही नेत्यांच्या तक्रारी प्राप्तीकर विभाग, केंद्रीय अर्थ मंत्रालय, ईडीकडे केल्या आहेत. त्यानुसार चौकशीही सुरू झाली.

दिवाळीनंतर आघाडी सरकारमधील तीन मंत्री व जावयाचे एकूण सहा घोटाळे बाहेर काढणार असल्याचे ट्विट सोमय्या यांनी रविवारी केले होते. पण त्यांनी सोमवारी सकाळी अचानक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांची प्राप्तीकर विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीची माहिती दिली. तसेच त्यांनी पवारांच्या कुटुंबीयांवरही अनेक गंभीर आरोप केले.

यावेळी दिवाळीआधीच फटाका का फोडला, असं विचारले असता सोमय्या म्हणाले, मी दिवाळीनंतर फटाके फोडणार होतो. पण नवाब मलिक यांनी समीर वानकेडे यांच्यासह त्यांच्या परिवार आरोप केले आहेत. त्यांनी अमृता फडणवीस यांचा चार वर्षांपूर्वीचा फोटो टाकला. त्यामुळे आज पहिला फटका फोडला, असं सोमय्या यांनी सांगितले. दिवाळीनंतर आणखी फटाके फोडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून (Cruise Drug Case) आता राज्यातील राजकारण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून दररोज नवनवे आरोप केले जात आहे. रविवारी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व नीरज गुंडे (Niraj Gunde) यांच्या संबंधांविषयी आरोप केले होते. आता थेट एका ड्रग्ज पेडलरशी त्यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे.

फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज रॅकेटला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला असून याची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मलिक यांनी सोमवारी सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये असलेली व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. जयदीप राणा (Jaydeep Rana) असं या व्यक्तीचे नाव आहे. निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकांनीही हा फोटो ट्विट केला आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक कऱण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT