मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बॉम्ब टाकला. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना जयदीप राणा (Jaydeep Rana) या ड्रग्ज पेडलरशी त्यांचा संबंध होता. त्यांच्या आशीर्वादानेच ड्रग्ज खेळ सुरू होता, असा आरोप केला आहे. तर नीरज गुंडे (Neeraj Gunde) हा फडणवीसांचा 'वाझे' होता, त्याच्या घरातून फडणवीसांचे मायाजाल चालत होते, असा धक्कादायक आरोपही मलिकांनी केला आहे.
मलिक यांनी सोमवारी सकाळी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये असलेली व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. जयदीप राणा असं या व्यक्तीचे नाव आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक कऱण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मलिक यांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वसुलीचे काम नीरज गुंडे या व्यक्तीमार्फत होत होते, असा आरोपही केला आहे.
मलिक म्हणाले, फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडें याना पूर्णपणे सर्वत्र संचार होता. देवेंद्रजींचा मायाजाल त्याच्या घरातूनच चालत होता. सीबीआय, प्राप्तीकर, ईडी, एनसीबी या सर्वच कार्यालयात गुंडे हे देवेंद्रजींचा वाझे बनून सर्व कार्यालयात फिरत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांतही कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहे. मंत्रालयात सर्व विभागात त्यांचा संचार होता. मागील 14 वर्षांत वानखेडे यांच्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. एनसीबीमध्ये वानखेडे यांना आणण्यामागे फडणवीस हेच आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.
बॉलीवूडमधील निर्दोष लोकांना फसवले जावे, ड्रग्जचा खेळ खेळला जावा, यासाठी वानखेडे यांना आणण्यात आले. क्रूझवरील काशिफ खानला सोडले जाते, इतर आणकी काहींना सोडले जाते. देवेंद्रजीच्या इशाऱ्यावर हे सुरू आहे. प्रतिक गाबाला का सोडले. या शहरात तो काय करतो. या खेळात त्याची सर्वात मोठी भूमिका आहे. ड्रग्जच्या खेळाचा मास्टरमाईंड आहे. त्याच्याबाबत नंतर सांगणार असल्याचेही मलिक यांनी म्हटलं.
फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज रॅकेटला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला असून याची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राणा साबरमती तुरूंगात आहे. ड्रग्जच्या प्रकरणात त्याला अटक कऱण्यात आली. त्याचे संबंध फडणवीस यांच्याशीही आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नींनी नदीवर एक गाणं तयार केले होते. त्यात सोनू निगम व अमृता यांनी गाणं गायलं होतं. त्यात फडणवीस व तत्कालीन अर्थमंत्री मुनगंटीवार यांनीही अभिनय केला होता. त्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होता, असे मलिक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.