नांदणी मठातील ‘महादेवी’ हत्तीणीभोवती धार्मिक परंपरा, प्राणी हक्क संस्था ‘पेटा’चे आरोप, न्यायालयीन लढाई आणि राजकीय कुरघोडी यांचा गुंता निर्माण झाला आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीला ‘वनतारा’ संस्थेत नेण्यात आले असून मठ व स्थानिक समाज तिची परतफेड करण्याची मागणी करत आहेत.
या प्रकरणाला राजकीय रंग मिळून राजू शेट्टींसारखे नेते पदयात्रा व आंदोलनात सक्रिय झाले आहेत तर सोशल मीडियावरही महादेवीसाठी मोठा जनसमर्थनाचा लाट उमटला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात जैन धर्मीयांची संख्या लक्षणीय आहे. शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. हा समाज येथे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहत आहे. सुपीक जमीन, बारमाही वाहणाऱ्या पंचगंगा नदीमुळे या परिसरात उसाचे उत्पादन आहे. तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. शिवाय कर्नाटकातील साखर कारखान्यांनाही ऊस जातो. येथे अनेक कृषिपूरक व्यवसायही अनेक आहेत. त्यामुळे बाजारपेठा, मोठ्या शिक्षण संस्थांमुळे शिरोळ तालुका प्रगत आणि सधन बनला आहे. नांदणी या गावात स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी मठ असून त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील सुमारे ७४३ गावे जोडली आहेत.
जैन धर्माच्या रक्षणासाठी सुमारे तेराशे वर्षांपूर्वी या मठाची स्थापना झाली, असे येथील लोक सांगतात. या मठामध्ये जैन धर्मीयांचे सर्व उत्सव, समारंभ, धार्मिक विधी होतात. दक्षिण भारतात जे प्रमुख १४ मठ आहेत त्यातील एक हा नांदणीचा मठ असल्याचा दावा स्थानिक करतात. या मठामध्ये हत्ती पाळण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. जैन धर्मीयांच्या पंचकल्याण उत्सवामध्ये यजमान असणाऱ्यांना हत्तीवरून आणले जाते. बाहुबली, भरत हे यापूर्वीचे हत्ती येथे होते. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यानंतर कर्नाटकातील जंगलातून ६ वर्षांची एक हत्तीण या मठात आणली गेली.
तिचे नाव ‘महादेवी’. काही जण तिचा उल्लेख माधुरी असाही करतात. मात्र ‘महादेवी’ हे नाव सर्वपरिचित आहे. तिचे सध्याचे वय ३२ ते ३५ वर्षे असावे. माहुताच्या सोबत गावातून फेरफटका मारणे, मठात येणाऱ्यांच्या हातून फळे, चारा खाणे, पंचगंगेत डुंबणे हा या महादेवीचा नित्यक्रम आहे. नांदणीसह पंचक्रोशीमधील लोकांना महादेवीचा लळा लागला असून, मुले ती गावात आली की तिच्या मागून फिरतात. तिलाही हा परिसर येथील लोक आणि मठातील सर्व कर्मचारी, स्वामी यांची सवय झाली आहे.
महादेवीचा वावर नांदणी परिसरात सुरू होता. २०१७ मध्ये एक प्रसंग घडला. ज्यामुळे ‘पेटा’ (पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल) संस्थेचे लक्ष्य महादेवीकडे गेले. या प्रकरणी ‘पेटा’ने अधिकृत भूमिका मांडली आहे. ‘पेटा’च्या संचालक खुशबू गुप्ता यांनी याबाबतची माहिती दिली. यांच्या मते २०१७ मध्ये मठातील एका व्यक्तीवर महादेवीने हल्ला केल्याने त्या व्यक्तीचे निधन झाले. कारण मठाकडे माहूत नव्हता. त्यामुळे महादेवीला बरेच दिवस साखळदंडाने बांधून ठेवले होते. पर्यायाने तिची मानसिक स्थिती बिघडली होती. यातूनच तिने हा हल्ला केला. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी आणि मठाने वन विभागाला पत्र लिहून महादेवी हत्तिणीला काही दिवस प्राणी संग्रहालयात ठेवण्याची विनंती केली होती.
महादेवी हत्तिणीचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी होत होता. तो कायद्याच्या विरोधात आहे. २०१२ ते २०२३ या कालावधीत १३ वेळा महादेवी हत्तिणीला परराज्यात मिरवणूक, धार्मिक सोहळ्यासाठी नेले. २०२३ मध्ये तमिळनाडू येथील एका मिरवणुकीत तेथील प्रशासनाने महादेवी हत्तिणीला परराज्यात नेण्यासाठी आवश्यक परवाना नसल्याने वन विभागाकडे सोपविले होते. त्यावेळी वन विभागाने निगा राखण्यासाठी केवळ पालकत्वाच्या भूमिकेतून त्यांनी महादेवी हत्तिणीचा ताबा पुन्हा मठाकडे दिला.
त्यामुळे सध्या महादेवी हत्तिणीची मालकी ही कोल्हापूरच्या वन विभागाची आहे. न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने महादेवी हत्तीची तपासणी केली. महादेवीला चौथ्या स्टेजचा संधिवात आहे. तिच्या पायाला इजा झाली आहे. साखळदंडांनी बांधल्यामुळे तिची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळेच तिला ‘वनतारा’ येथे उपचारांसाठी न्यायालयाच्या आदेशाने नेले होते.
‘पेटा’च्या भूमिकेबद्दल नांदणी मठाच्या सागर शंभुशेटे म्हणाले, ‘‘महादेवीने कधीच कोणावर हल्ला केलेला नाही. महादेवीच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाल्याची कोणतीही नोंद नाही. आम्ही महादेवीची पूर्ण काळजी घेतली आहे. तिचा कोणताही व्यावसायिक वापर होत नव्हता. केवळ धार्मिक कार्यक्रमांसाठीच तिला पाठवले जायचे. त्याचे कोणतेही पैसे घेतले जात नव्हते. तमिळनाडूमध्येही आम्ही सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केली होती. शासनाच्या काही तांत्रिक त्रुटीमुळे तेथील अधिकाऱ्यांचा गैरसमज झाला. मात्र, कोणताही कारवाई केली नाही.
पेटा संस्थेच्या आरोपात तथ्य नाही. महादेवीचे संगोपन चांगल्या पद्धतीने मठाने केले आहे.’’ पत्राबाबत राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. ‘‘ज्यावेळी पत्र लिहिले तेव्हा मठामध्ये माहूत नव्हता. माहूत मिळेपर्यंतच महादेवीला प्राणी संग्रहालयात ठेवावे, अशी आमची भूमिका होती. माहुत मिळाल्यावर पुन्हा तिला मठात आणावे, असे आम्ही सुचवले होते. मठानेही हीच भूमिका त्यांच्या वन विभागाला पाठवलेल्या पत्राबाबत घेतली आहे,’’ असे ते म्हणाले.
‘पेटा’ आणि नांदणी मठ यांच्या न्यायालयीन खटल्याच्या निकालात महादेवी या हत्तिणीला ‘वनतारा’ या संस्थेकडे सोपवावे असे म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही महादेवीला ‘वनतारा’मध्ये आणले. महादेवीला ‘वनतारा’कडे सोपवावे, अशी मागणी आम्ही कधीही केलेली नव्हती. ‘पेटा’ने उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने एक उच्चाधिकार समिती स्थापन केली. त्यांनी महादेवी हत्तिणीची तपासणी केली. ती आजारी असल्याचे दिसले. तिला उभे राहता येत नव्हते. मग उच्चाधिकार समितीने मठाला तीन महिन्यांचा कालावधी दिला.
या कालावधीत त्यांनी महादेवी हत्तिणीला उपचार करून सुदृढ करावे, असे सांगितले. तीन महिन्यांनंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. या तपासणीबाबत दोन मतप्रवाह आहेत. वन विभागाचे स्थानिक अधिकारी सांगतात की महादेवीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. ती आता चालू शकत होती. तर ‘पेटा’च्या म्हणण्यानुसार, न्यायालयात असा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महादेवीच्या दुसऱ्या तपासणीबाबत संभ्रम आहे. मठानेही तपासणीबाबत न्यायालयाकडे धाव घेतली. अखेर उच्च न्यायालयाने या महादेवीला ‘वनतारा’ या केंद्रात पाठवावे असा निर्णय दिला. त्याला मठाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला.
या प्रकरणाला अवघ्या काही दिवसांतच राजकीय रंग आला. उद्योजक अंबानी यांनी आपली महादेवी हत्तीण नेली असे वृत्त समाजात पसरले. त्यामुळे महादेवी हत्तीण परत करण्याच्या मागणीला जोर आला. राजू शेट्टी यांनी पदयात्रा काढणार असल्याचे सांगितले. तर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवली. विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरल्यावर सत्ताधाऱ्यांनीही या प्रकरणात उडी घेतली. त्यांनी ‘वनतारा’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कोल्हापुरात पाचारण केले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, आमदार अशोक माने, नांदणी मठाचे स्वामींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीमधून स्वामीजी निघून गेले. त्याबद्दलही अनेक चर्चा रंगल्या. ‘वनतारा’ या संस्थेचा यामध्ये कोणताही सहभाग नसून न्यायालयाच्या आदेशावरून महादेवीला तेथे नेण्यात आले आहे. शासन महादेवी हत्तिणीला कायदेशीर मार्गाने परत नांदणी मठात आणणार आहे. यामध्ये ‘वनतारा’ सकारात्मक आहे, असे प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
राजू शेट्टी यांनी भाजपवर केलेल्या टीकेमुळे त्यांचा हत्तिणीच्या निमित्ताने विरोधकांवर असणारा रोख स्पष्ट होतो. शेट्टींचा दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांचे सहकारी स्वाभिमानी पक्ष सोडून गेले होते.
गेल्या आठवड्यात त्यांच्या जवळचे समजले जाणारे सावकर मादनाईक भाजपमध्ये गेले. त्याचबरोबर आणखी काही जणांनी पक्षांतर केले. त्यामुळे मरगळ आलेल्या स्वाभिमानी पक्षाला या निमित्ताने पुन्हा एकदा उभारी देण्याची संधी शेट्टी यांनी घेतली. ४५ किलोमीटरच्या पदयात्रेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. हा लढा राजकीय नसल्याचे म्हटले जात असले तरी यामध्ये कुरघोड्या स्पष्ट दिसून येत आहेत. महादेवीच्या निमित्ताने जैनधर्मीयांत भाजपबद्दल नाराजी निर्माण करणे ही खेळी शेट्टी यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाली. आता हा मुद्दा विरोधकांना बळ देणार की सत्ताधारी हा चक्रव्यूह भेदणार हे स्पष्ट होईल.
महादेवी हत्तिणीच्या मुद्द्यावरून समाजमाध्यमांवरून लाट उसळली. जिल्ह्यातील ‘इन्फ्ल्युएन्सर’नी हा मुद्दा जनमानसात पोहोचवला. महादेवीच्या प्रेमापोटी हजारो जण या लढ्यात सहभागी झाले. सोशल मीडिया हा पुन्हा एकदा यामध्ये निर्णायक ठरला.
प्रश्न 1: महादेवी हत्तीणीचे प्रकरण नेमके कशाबद्दल आहे?
उत्तर: नांदणी मठातील महादेवी हत्तीणीच्या संगोपन, वापर आणि आरोग्याबाबत वाद आहे.
प्रश्न 2: ‘पेटा’ने कोणते आरोप केले आहेत?
उत्तर: ‘पेटा’ने महादेवीचा व्यावसायिक वापर झाल्याचा आणि तिच्यावर गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे.
प्रश्न 3: न्यायालयाने काय निर्णय दिला?
उत्तर: उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने महादेवीला ‘वनतारा’ संस्थेकडे उपचारासाठी ठेवण्याचा आदेश दिला.
प्रश्न 4: या प्रकरणाचा राजकीय संदर्भ काय आहे?
उत्तर: विरोधकांनी या मुद्द्यावर भाजपवर टीका केली असून, राजू शेट्टींनी पदयात्रा काढून राजकीय संदेश दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.