Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदेंची वाढती कोंडी

Maharashtra Politics Eknath Shinde News update: महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची आणि एकूणच त्यांच्या आमदारांची कोंडी करण्याचेच प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहेत का, या शंकेला वाव मिळावा अशी परिस्थिती सध्या दिसत
Eknath Shinde News update
Eknath Shinde News updateSarkarnama
Published on
Updated on

महायुतीतील घटक पक्षांत सध्या अस्वस्थता आहे. आपापल्या विस्तारासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. मात्र, मित्रपक्षांच्या मतदारसंघातील आमदार किंवा नेत्यांच्या मतदारसंघात विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपकडून बळ देण्यात येत आहे. विशेषतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बाबतीत हा प्रकार सुरू असल्याच्या शंकेला वाव मिळावा अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. त्याविषयी.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले खरे. मात्र, प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. वास्तविक पक्षवाढीसाठी प्रयत्न करण्यात आक्षेपार्ह काहीच नाही. मात्र जेव्हा आपल्याच मित्रपक्षाला आपल्या पक्षवाढीमुळे अस्वस्थता वाटत असेल तर मात्र असले पक्षाचे वाढणे हे महायुतीला घातक ठरू शकते, हे मात्र खरे.

असाच काहीसा प्रकार सध्या महायुतीमध्ये सुरू आहे. महायुतीमधील मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष आपल्याच मित्रपक्षांच्या आमदार किंवा नेत्यांच्या मतदार संघात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बळ देत असेल तर महायुतीच्या दृष्टीने घातक ठरू शकते. असाच काहीसा प्रकार शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत सध्या महायुतीमध्ये सुरू आहे. शिंदे यांच्या पक्षाची आणि एकूणच त्यांच्या पक्षातील आमदारांची कोंडी करण्याचेच प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहेत का, या शंकेला वाव मिळावा अशी परिस्थिती सध्या दिसत मात्र आहे.

शिंदेंची कोंडी पूर्वनियोजित?

अजित पवार यांचे काही मंत्री वादात सापडले. मात्र, अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात सुरू झालेला जनक्षोभ लक्षात घेऊन त्यांच्याकडून राजीनामा घेतला. मुंडे यांचे प्रकरण तापविण्यात भाजपच्याच आमदार सुरेश धस यांचा हात होता. अखेर मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मुंडे यांच्याविषयीचे प्रकरण शांत झाले. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्ये आणि सभागृहात ऑनलाईन पत्त्यांचा डाव मांडल्याने वादात सापडलेले माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करून अजित पवार यांनी शिताफीने हाही डाव उलटवून लावला.

एकनाथ शिंदेंच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष आणि वादग्रस्त ठरलेले मंत्री चांगलेच अडचणीत येतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या हॉटेलच्या खोलीत पैशाची बॅग असल्याचा ‘व्हिडिओ’ समाजमाध्यमांतून सर्वदूर पसरणे, त्यानंतर विधिमंडळातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या बारचे प्रकरण येणे. त्यापूर्वी झालेले शिरसाट यांच्या मुलाचा छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेलच्या लिलावात असलेल्या सहभागामुळे उडालेले वादंग. या सर्व गोष्टी अगदी घडवून आणल्यासारख्या घडत आहेत. त्यामुळेच महायुतीमध्ये शिंदे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

Eknath Shinde News update
Maharashtra Congress : घराणेशाही पुन्हा वरचढ; नवख्यांचीही ‘घुसखोरी’

नेत्यांचे पक्षबदल

त्यातच, भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्य पक्षांतील नेत्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांचा पक्षप्रवेश होत असला, तरी या नेत्यांमुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेत्यांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये अडचण निर्माण होणार आहे हे नक्की. जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या समर्थकांसह नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधात जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

गोरंट्याल यांच्याबरोबर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांबरोबरच माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनीही मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) परांडा (धाराशिव) मतदारसंघातील नेते राहुल मोटे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मोटे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती.

Eknath Shinde News update
Marathwada Congress: मराठवाड्यात काँग्रेसचा ‘हात’ दुबळा; आगामी निवडणुकीत नेतृत्व कोण करणार?

भाजपच्या चालींनी अडचण महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिंदे यांचे ज्या मतदारसंघात आमदार आहेत, त्याच ठिकाणी विरोधी पक्षातील नेत्यांना आपापल्या पक्षात घेऊन बळ देत असल्याचा आरोप शिंदे यांच्या पक्षाकडून केला जात आहे. काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. वरपुडकर यांनी पाथरी (परभणी) विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार राजेश विटेकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.

वरपुडकर यांच्यासोबत परभणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती धोंडीराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम वाघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रेरणा वरपुडकर, समाजकल्याण समितीच्या माजी सभापती द्वारकाबाई कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अजय चव्हाण, जिल्हा परिषद माजी सदस्य तुळशीराम सामाले, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामेश्वर कटिंग, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर लाड, दिलीपराव साबळे आदींनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षासमोरसुद्धा भाजप एकप्रकारे आव्हान उभे करीत आहेत. मात्र सध्या भाजपच्या एकूण चाली या एकनाथ शिंदे यांनाच कोंडीत पकडणाऱ्या आहेत.

महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिंदेंच्या शिवसेनेचे ज्या मतदारसंघांत आमदार आहेत, त्याच ठिकाणी विरोधी पक्षातील नेत्यांना आपापल्या पक्षात घेऊन बळ देत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. मागील निवडणुकीत निवडून आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नगरसेवक शिंदे यांच्या सोबत आलेच होते. त्यानंतरही त्यांनी नगरसेवक आपल्यासोबत आणण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. अन्य पक्षातील माजी नगरसेवकसुद्धा त्यांनी आपल्या सोबत घेतलेले आहेत. मात्र, या सगळ्याचा मुंबई महापालिका निवडणुकीत कितपत फायदा होईल याचा याचा दृश्य परिणाम निवडणुकीत नक्कीच दिसणार आहे.

केवळ नगरसेवक आपल्या पक्षात घेताना पक्षाचा तळागाळातील कार्यकर्ता कुठे आहे याचेही भान असायला हवे. अन्यथा केवळ नेते पक्षात आले मात्र कार्यकर्ते मूळ पक्षांमध्येच राहिले तर महापालिका निवडणुकांमध्ये त्याचा विशेष फायदा होईल असे नाही. मुंबई महापालिकेचे जवळपास १२४ माजी नगरसेवक शिंदे यांनी आपल्याकडे घेण्यात यश मिळवले आहे. ही गोष्ट वाखाणण्यासारखी असली तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे माजी नगरसेवक कशी कामगिरी करतात हेही निवडणुकीच्या यशात महत्त्वाचे आहे.

शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे येथील अनेक माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेतल्याने विरोधी पक्षातील नव्या नेतृत्वाला संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात असलेल्या रोषाचा सामना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र, मित्रपक्षांच्या कृत्यांमुळे त्यांचा पक्ष कमकुवत तर होत नाही ना याकडेही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

महत्त्वाच्या बाबी महायुतीतील अस्वस्थता अन् अंतर्गत संघर्ष

  • महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आपापल्या पक्षवाढीसाठी स्वतंत्र हालचाली करत आहेत.

  • भाजपकडून मित्रपक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघात विरोधी नेत्यांना सामावून घेतले जात आहे.

  • यामुळे शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी होत असल्याचा आरोप.

एकनाथ शिंदेंचे मंत्री वादात

  • संजय शिरसाट यांच्या खोलीमध्ये पैशांची बॅग असलेला ‘व्हिडिओ’ व्हायरल

  • योगेश कदम यांच्या आईच्या नावावरील मद्यालयाचा मुद्दा विधिमंडळात चर्चेत

  • शिरसाट यांचा मुलगा हॉटेल लिलावात सहभागी असल्याने वाद

  • ही प्रकरणे एकामागोमाग येत असल्याने पूर्वनियोजित राजकीय डावपेचाचा संशय.

भाजपकडून नेत्यांचे पक्षप्रवेश

शिंदेंची वाढती अडचण

मुंबई महापालिकेवर शिंदेंचे लक्ष

  • ठाकरे गट आणि अन्य पक्षांतील १२४ माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल

  • मुंबई आणि ठाणे महापालिकांवर लक्ष केंद्रित; नव्या नेतृत्वाला संधी

  • फक्त नेते पक्षात घेऊन उपयोग नाही. खरा परिणाम कार्यकर्त्यांवर अवलंबून.

  • प्रस्थापितांविरोधातील नाराजीचा फटका शिंदेंना बसण्याची शक्यता.

  • भाजप व अजित पवार गट यांच्याकडून शिंदे गटाला कमकुवत करण्याचा प्रयत्न?

  • स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता.

  • महापालिका निवडणुकांत याचे पडसाद उमटण्याची शक्यता.

  • शिंदेंसमोर स्थानिक संघटना, कार्यकर्ता पातळीवर पुन्हा नवे बळ मिळवण्याचे आव्हान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com