Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

मोठी बातमी : महापालिका, ZP निवडणुका आता 2023 मध्येच!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : Shinde-Fadnavis Govt राज्यातील 23 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठीचा मुहूर्त आता 2023 मध्येच लागण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने महापालिकांसाठी प्रभागरचना बदलली आहे तर जिल्हा परिषदांमधील वाढीव गट आणि गण यांच्या संख्येत घट केली आहे. (Shinde-Fadnavis Govt changes delimitation for corporation election) ही सारी प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. कितीही काम वेगाने केले तरी चार महिने आवश्यक आहेत. त्यामुळेच या निवडणुकांसाठी 2023 हेच वर्ष उजाडू शकते, असा अंदाज प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदा आणि अनेक महापालिका यांची मुदत मार्च 2022 मध्ये संपली. त्या आधी कोरोनामुळे कोल्हापूर, नवी मुंबई, औरंगाबाद या शहरांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोना संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. या साऱ्या गडबडीत आधीच्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेचा निवडणूक आयोगाकडील अधिकार आपल्याकडे घेतला. त्यासाठी कायद्यात बदलही केला. त्याच कायद्याचा आधार घेत आता नवीन सरकारने प्रभागरचना आणि गण-गट यांच्यातील बदल सत्तेवर आल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला.

कायद्यानुसार आता निवडणूक आयोगाला राज्य सरकारचे म्हणणे मान्य करावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेणे कायद्यानुसार आवश्यक आहे. नव्या सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात कोणी न्यायालयात गेले तर तेथेच काहीतरी या प्रकरणावर सोक्षमोक्ष लागू शकतो. अन्यथा या निवडणुका पुढील चार महिन्यानंतरच होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने आज होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित केली. त्याचबरोबर अन्य 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा-भाईंदर या 9 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत काढण्यात येणार होती. ती आता काढण्यात येणार नाही.

बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 14 महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT