ajit pawar, Shard pawar, devendra fadanvis, uddhav thckeray, eknath shinde, nana patole  Sarakrnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 News : महायुती, महाविकास आघाडीतील इच्छुक, समर्थकांची धडधड वाढली

Political News : लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे इच्छुकांमध्ये स्पर्धा वाढली असून, उमेदवारी मिळेल की नाही या विचाराने त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

अय्यूब कादरी

Election News : लोकसभा निवडणुकीचे पडघम एव्हाना वाजू लागले असून मार्च महिना पुढे सरकेल तसा त्याचा आवाज आणखी वाढू लागला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची स्पर्धा तीव्र झाली आहे. जागावाटप, उमेदवारी याबाबत क्षणाक्षणाला धडकणाऱ्या नव्या बातम्या, नव्या अपडेट्समुळे इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागला आहे.

केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. याशिव नरेंद्र मोदी यांची यांचा करिश्मा यावेळीही चालणार, असे इच्छुकांना वाटते आणि त्यात आपले जहाज किनाऱ्याला लागेल, असा विश्वास त्यांना आहे. त्यामुळे महायुतीमध्ये तुलनेने इच्छुकांची संख्या अधिक आहे. महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर खलबते सुरू आहेत. (Lok Sabha Election 2024 News)

गेल्या अनेक दिवसांपासून हा पेच सुटलेला नाही. त्यामुळे काही जागांवरून नाराजीनाट्यही सुरू झाले आहे. लोकसभेला पडती बाजू घ्या, विधानसभेला भरपाई केली जाईल, अशी भूमिका भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर मांडल्याचे सांगितले जात आहे. इच्छा नसली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपची ही भूमिका मान्य करावी लागू शकते, अशी शक्यता आहे.

शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देऊन उर्वरित 32 जागा भाजप लढवणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. ही केवळ चर्चा आहे, त्याला कुणीही दुजोरा दिलेला नाही, असे असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. इच्छुकांचा आणि त्यांच्या समर्थकांचा हिरमोड झाला आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये ठिणगी पडली आहे. यावरून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला सुनावले देखील आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपसोबत आलो आहेत. त्यामुळे केसाने आमचा गळा कापू नका, विश्वासघात करू नका, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांनी राज्यातील भाजप नेत्यांना समज द्यावी, असेही कदम म्हणाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येत्या चार दिवसांत महायुतीच्या जागावाटपाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. मार्च पुढे सरकेल तसा उकाडा वाढत असून राजकीय वातावरणही तापू लागले आहे. महायुतीने कोणताही उमेदवार दिला तर त्याला विजयी करण्यासाठी प्रयत्न करू म्हणणारे आता नाराजी व्यक्त करत असून, अनेक ठिकाणी उमेदवारीसाठी अडून बसल्याचे चित्र आहे. इच्छुकांनी नव्याने जोर लावायला सुरुवात केली आहे. आगामी चार-पाच दिवस इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांसाठी धावपळीचे असतील. जागावाटपाचा काय तो एकदा निकाल लागला की पुन्हा नव्याने धावपळ सुरू होणारच आहे.

तिढा कधी सुटणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष

महाविकास आघाडीतही सर्वकाही आलबेल आहे, असे चित्र नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. जागावाटपावरून हे घोडे अडले आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. त्यामुळे 'वंचित'ला सहभागी करून घेण्यासाठी प्रसंगी महाविकास आघाडी दोन पावले मागे घेण्याची शक्यता आहे. हा तिढा कधी सुटणार याकडे महाविकास आघाडीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपला (Bjp) मदत होईल, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत, असा विश्वास शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी व्यक्त केला आहे. येत्या चार दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीच्याही जागावाटपाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची घालमेल सुरूच राहणार आहे.

(Edited By: Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT