Sandipan Bhumre-Raosaheb Danve Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election Result Analysis : 'जरांगे फॅक्टर'ने दानवेंना पाडले तर भुमरेंना दिल्लीला धाडले !

सरकारनामा ब्युरो

Lok Sabha Result : मराठवाडा हे मराठा आरक्षण लढ्याचे केंद्रबिंदू होते. त्यामुळे या ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनाचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात पडला होता. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत उपोषण केले. त्या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात या आंदोलनाचा अंडरकरंट जाणवला.

मनोज जरांगे यांनी निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पराभूत करा, असा संदेश दिला होता. त्याचा मोठा परिणाम मराठवाड्यात जाणवला आहे. याठिकाणी या अंडरकरंटचा फटका महायुती व परिणामी भाजपला (Bjp) बसला आहे. या ठिकाणी भाजपच्या चार जागा गेल्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या. या चारही जागा जवळपास भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. याचा मोठा फटका भाजपला बसला आहे.

मराठा आरक्षण लढ्याचे जालना जिल्हा हा केंद्रबिंदू होता. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मोठे आंदोलन झाले. त्यामुळे हे गाव चर्चेत आले होते. जालना लोकसभा मतदारसंघातील मराठा फॅक्टरचा फटका रावसाहेब दानवे यांना बसला. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे हे मराठा उमेदवार होते. त्यामुळे मतदार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे चित्र आहे.

त्याशिवाय मराठा आरक्षण लढ्याच्या आंदोलनात स्वतःची नवी कोरी कार जाळून अन् ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील घरासमोर जाऊन त्यांची अलिशान गाडी फोडल्यामुळे प्रकाश झोतात आलेल्या मंगेश साबळे यांनी तब्बल 93 हजार 545 मते घेत सर्वांना धक्का दिला.

साबळे यांना जितकी अधिक मते मिळाली ती मते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना मिळाली असती तर त्यांना फायदा झाला असता. मात्र, साबळे यांनी घेतलेली मते कल्याण काळे यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहेत. त्यामुळे साबळे यांच्या उमेदवारीचा फटका दानवे यांनाच बसला आहे.

केंद्रीय मंत्री दानवे ``यांच्या विरोधात मतदारसंघात सुप्त लाट होती. काँग्रेसने या लाटेचा फायदा उचलण्यासाठी काळे हे जुनेच अस्त्र बाहेर काढले. शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी याचाही फायदा काळे यांना झाला आहे. दुसरीकडे दानवे यांना महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाली नाही.

दुसरीकडे मराठा आरक्षण अंडरकरंटचा फायदा नांदेडमध्ये काँग्रेसचे (Congress) वसंत चव्हाण, लातूरमध्ये शिवाजी काळंगे, परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव, धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांना फायदा झाला.

दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या अंडर करंटचा फायदा छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उतरलेल्या संदीपान भुमारे यांना झाला. भुमरे हे शिंदे गटाकडून लोकसभेच्या मैदानात उतरले होते. नेहमीच राज्य सरकार व मनोज जरांगे यांच्या आंदोलनात मध्यस्थाची भूमिका बजावत त्यांनी शिष्टाई केली होती. त्यामुळे याठिकाणी केवळ महायुतीतील शिंदे गटाचे भुमरे हे विक्रमी मतांनी विजयी झाले.

SCROLL FOR NEXT