Vijay Vaddetiwar, Nana Patole  Sarkarnama
विश्लेषण

Congress News : पराभवाच्या भीतीने पटोले, वडेट्टीवार निवडणूक रिंगणाबाहेर !

Sachin Deshpande

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक ही देशाची निवडणूक असताना राहुल गांधी यांना महाराष्ट्रातून खंबीर साथ देण्याची गरज होती. दोनदा भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली. तरीदेखील काँग्रेस नेत्यांमध्ये लोकसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला नाही. हे यात्रेचे यश म्हणावे की अपयश हे काँग्रेसने ठरवावे. अशाने तर काँग्रेस नेत्यांच्या विजयासाठी राहुल गांधी यांना मतदारसंघनिहाय 'महाराष्ट्र जोडो यात्रा' काढावी लागेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.

काँग्रेसचा यंदा महाराष्ट्रावर सर्वाधिक विश्वास आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मोठा भाऊ, मोठ्या संख्येत आमदार न फुटलेला पक्ष असा परिचय काँग्रेसचा आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा महाविकास आघाडीत प्राप्त होतील. त्यात पूर्व विदर्भातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येतात. भंडारा- गोंदिया मतदारसंघात नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष व स्थानिक नेते म्हणून निवडणूक लढविण्याची गरज होती. पण, त्यांनी तिकीट नाकारत मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भंडारा - गोंदिया या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिलेले डॉ. प्रशांत पडोळे हे सहकार नेते यादवराव पडोळे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पत्नी भंडारा जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. डॉ. पडोळे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून साकोली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचे डिपाॅझिट जप्त झाले होते. ज्या उमेदवाराचे विधानसभेत डिपाॅझिट जप्त झाले त्या उमेदवाराला काँग्रेसने लोकसभेची जागा दिली. यावरूनच काँग्रेसची लोकसभा निवडणूक लढविण्याची रणनीती समजून येते. निवडणुकीत पडण्याच्या भीतीने पटोले यांनी तिकीट नाकारल्याची ओरड विरोधकांनी सुरू केली आहे. ही जागा काँग्रेस हरली तर विरोधकांच्या दावा खरा ठरणार आहे.

त्याचबरोबर विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राहुल गांधींचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले विजय वडेट्टीवार हेदेखील पूर्व विदर्भातील आहे. चंद्रपूर मतदारसंघात वडेट्टीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट न देता मुलीला तिकीट मागितले. विजय वडेट्टीवार हे स्वतः या मतदारसंघात लढण्यास इच्छुक का नव्हते, हा प्रश्नच आहे. दिग्गज नेत्यांना निवडणुकीत लढण्याची भीती वाटते की, पडण्याची असा प्रश्न यानिमित्त कायम आहे. निवडणुकीत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत दोन हात झाले असते. राज्याचे नाही तर देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. पण, मतदारसंघ बांधण्यात हे दोन्ही नेते गाफील राहिल्याने त्यांनी ही रिस्क टाळल्याची माहिती आहे.

अशोक चव्हाण, राजू पारवे यांनी काँग्रेस सोडणे हे अपयश प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्याबरोबर विरोधी पक्षनेता म्हणून वडेट्टीवार यांचेदेखील आहे. या दोन्ही नेत्यांना सांभाळून ठेवण्यात महाराष्ट्रातील नेत्यांना अपयश आले. भाजप तर त्यांना सोयीचे नेते फोडणारच आहे. पण तसे होऊ नये, याची खबरदारीदेखील काँग्रेस नेते राहुल गांधी घेतील काय ?, अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील नेत्यांकडे पक्षाच्या जबाबदारीचे काय ?, असे विविध प्रश्न उपस्थित होतात. 'मी जिल्ह्याचा नेता नाही महाराष्ट्राचा नेता आहे', असे विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर 'दिल्लीचे तख्त हलविण्यासाठी महाराष्ट्र मदतीला धावेल' असा ही विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण, चंद्रपुरातून मुलीचे तिकीट कापल्याचे शल्य वडेट्टीवार यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एकच जागा महाराष्ट्रात जिंकली. चंद्रपूर येथून बाळू धानोरकर हे विजयी झाले होते. त्यांचे मध्यंतरी निधन झाले. यंदा काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट देत वडेट्टीवार यांना तिकीट नाकारले. प्रतिभा धानोरकर यांना स्वतः हा मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. त्याचबरोबर थेट सुधीर मुनगंटीवार यांच्याशी एकट्याने लढा द्यावा लागणार आहे. मुलीचे तिकीट कापल्यानंतर वडेट्टीवार यांची कितपत मदत प्रतिभा धानोरकर यांना होते हेदेखील निवडणुकीत पाहण्यासारखे ठरेल.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राला लीड करताना खासदारकीसाठी लढण्याची गरज होती. या दोन्ही नेत्यांना विजयाची खात्री नव्हती की, काँग्रेस नेतृत्वाचा यांच्यावर विश्वास नव्हता, असा प्रश्न आहे. राज्यातील निवडणुकीसाठी, प्रचारासाठी वेळ देता आला नसता असा या नेत्यांचा दावा साफ खोटा आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणूक आहे. पहिल्या टप्प्यात निवडणुकीत 19 एप्रिल रोजी मतदानानंतर या नेत्यांना राज्यात दौरा करता आला असता. अगदी त्यांचे मतदारसंघ सांभाळत राज्यभर दौऱ्याचे नियोजन करता आले असते.

भाजप नेते आशिष देशमुख यांनी या नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर तोंडसुख घेत पराभवाच्या भीतीने या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतून पळ काढल्याचा आरोप केला आहे. त्यांचा हा आरोप कितपत खोटा ठरतो हे निकालावरून स्पष्ट होईल. पण, निवडणुकीत न लढणे हादेखील काँग्रेस नेत्यांचा पराभव आहे, असे काँग्रेस कार्यकर्तेच सांगतात. नेतेच लढणार नाहीत आणि डिपाॅझिट जप्त झालेल्यांना उमेदवारी दिली जात असेल तर राहुल गांधी यांनी कितीही भारत जोडो यात्रा काढल्या तरी काँग्रेसला अपेक्षित 'अच्छे दिन' येण्याची शक्यता नसल्याची ओरड काँग्रेसमध्ये आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्रातून विजयी झालेले राज्यसभेचे खासदार महाराष्ट्रात ढुंकून पाहत नाही, काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार लोकांमध्ये मिसळत नाहीत. काँग्रेसने साठ नेत्यांची प्रचार समिती घोषित केली. यापैकी प्रत्येक तीन नेत्यांना एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी काँग्रेस निश्चित करण्याची गरज आहे. त्या-त्या मतदारसंघात काँग्रेसला अपेक्षित यश आले नाही तर त्यांना व्यक्तीशः जबाबदार धरावे, असे मत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. केवळ नेतेगिरी करणे, काँग्रेसचा दुपट्टा गळ्यात घालून फिरणे, स्टेजवर समोर समोर करणे, देशातील नेत्यांसोबत फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर टाकून काँग्रेसला कुठेही विजयश्री खेचता येणार नाही. याची जाणीव नेत्यांना नसल्याची ओरड कट्टर काँग्रेसी कार्यकर्ते करत आहेत. त्यात अनेक प्रकरणात तथ्य असून, या लोकसभा निवडणुकीत 'काँग्रेसला काँग्रेस हरविते', हे काँग्रेस नेत्यांचे ब्रीद वाक्य खरे ठरते की, खोटे हे मतमोजणीलाच समजेल.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT