Pune Lok Sabha Election: पक्षांतर्गत गटबाजी काँग्रेसला घातक; नाराजी दूर करण्याचे धंगेकरांसमोर आव्हान!

Ravindra Dhangekar Vs Aba bagul: पुणे लोकसभेसाठी भाजपने मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिले आहे, तर काँग्रेसने आमदार धंगेकरांना उमेदवारी दिली आहे. धंगेकरांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune Lok Sabha Election 2024: एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना या निवडणुकीत रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोहोळ विरुद्ध धंगेकर असा सामना पाहायला मिळणार आहे.

कसबा मतदारसंघाच्या (Kasba Constituency) आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) निवडून आले. या पोट निवडणुकीत काँग्रेसने धंगेकर यांना तिकीट दिल्यानंतर भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना तिकीट दिले होते. टिळक यांच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला तिकीट भाजपने दिले नाही, तर ब्राह्मण समाजाच्या उमेदवारालाही त्यावेळी डावलण्यात आल्याने त्याचे पडसाद निवडणुकीच्या मतदानामध्ये उमटले होते. तसेच या पोटनिवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीत (MVA) सहभागी असलेल्या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर यांचा जोरदार प्रचार केला होता. सर्वांनी एकी दाखवत निवडणुकीत काम केल्याने अगदी सहजपणे धंगेकर विजयी झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कसबा म्हणजे भाजप आणि भाजप (BJP) म्हणजे कसबा, असे समीकरण वर्षानुवर्षे होते. मात्र, कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे हे समीकरण बदलले गेले. महाविकास आघाडीतील नेत्यांची एकी हेच या विजयाचे सूत्र होते. पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Lok Sabha Constituency) म्हणजे काँग्रेस अशी ओळख असलेल्या या मतदारसंघाची काही वर्षांपूर्वी होती. एक ते दोन अपवाद वगळता आत्तापर्यंत काँग्रेसचेच खासदार या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा खासदार विजयी होत आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे पुण्याचे खासदार झाले, तर 2019 च्या निवडणुकीत गिरीश बापट (Girish Bapat) हे पुण्याचे खासदार झाले. बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती. मात्र, ती झालीच नाही.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना तिकीट दिले आहे, तर काँग्रेसने आमदार धंगेकर यांना निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील निष्ठावांतांना डावलून बाहेरून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप पुण्यातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे धंगेकर यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांचा मिळून लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे केवळ एका मतदारसंघात वर्चस्व असले म्हणून इतरही मतदारसंघात आपल्याला मताधिक्य मिळेल असे नाही, त्यातच पक्षातीलच काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो.

Ravindra Dhangekar
Pune Congress News : 'काँग्रेसमध्ये निष्ठेची हत्या'; धंगेकरांच्या विरोधात बागुलांची मोहीम...

धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) चांगलेच नाराज झाले आहेत. "मी कोणाच्याही चपला उचलणार नाही." काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात, मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही? असा सवाल बागुल यांनी उपस्थित केला आहे. इतर पक्षातून अनेकदा विचारणा झालेली असतानाही केवळ पक्षनिष्ठा जपण्यासाठी आम्ही काँग्रेसमध्ये राहिलो ही आमची चूक झाली का, असा प्रश्नही बागुल यांनी उपस्थित केला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचा इशारादेखील त्यांनी दिलेला आहे.

Ravindra Dhangekar
Congress News : रविभाऊ, आता कुठच्या Ex स्टॅडिंग चेअरमनला पाडायला निघालात, आधी आबा बागुलांना सांभाळा!

माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासह माजी राज्यमंत्री रमेश बागवे, अभय छाजेड, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, यांच्यासह सुमारे 20 जण काँग्रेसमधून लोकसभेसाठी इच्छुक होते. पक्षाने या सर्वांमधून आमदार धंगेकर यांना उमेदवारी दिली. पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने हे वरिष्ठ पदाधिकारी नाराज झाले आहेत. पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी असेल तर त्याचा मोठा फटका निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांना बसू शकतो, हे टाळण्यासाठी पक्ष एकसंघ असणे आवश्यक आहे. महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एक दिलाने निवडणुकीत काम केले तर त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो. त्यामुळे धंगेकर यांना निवडणुकीत मताधिक्य मिळवायचे असेल तर सर्वांशी चर्चा करून त्यांच्यातील समज-गैरसमज दूर करावे लागणार आहेत.

Ravindra Dhangekar
Pune Lok Sabha Election : 'जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा'; धंगेकरांनी घेतला बापट यांचा आधार...

भाजपने मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमधील काही इच्छुकदेखील नाराज झाले होते. मात्र, मोहोळ यांनी त्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करून नाराजी दूर केली आहे. हेच आता महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांना करावे लागणार आहे. पक्षात असलेली नाराजी दूर करण्याबरोबरच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रचाराचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान धंगेकर यांच्यासमोर असणार आहे. पक्षांमध्ये असलेली अंतर्गत नाराजी दूर न केल्यास धंगेकर यांच्या समोरील आव्हान अधिक वाढणार आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com