Parliament Winter Session : लोकसभेमध्ये दोन तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुरक्षा यंत्रणांचा चोख बंदोबस्त असतानाही घुसखोरी कशी झाली, यावरून राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर सद्या सर्वसामान्य नागरिकांना आत प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना संसदेत प्रवेशासाठी विविध टप्प्यांतून जावे लागते. त्यासाठी लोकसभा व राज्यसभेचे नियम असून त्या नियमांचे पालन करूनच नागरिकांना प्रवेश मिळतो. हे नियम नेमके काय आहेत, सुरक्षेची काळजी कशी घेतली जाते, याबाबतची सविस्तर माहिती...
संसदेतील नागरिकांसाठी कुठला नियम?
नागरिकांना प्रवेश देणे, त्यांना प्रवेश नाकारणे या विषयी 'लोकसभेतील कार्यपद्धती आणि आचरण' या विषयीचे नियम 386, 387, आणि 387 अ द्वारे नियमन केले गेले आहे. सदस्यांच्या वापरासाठी राखीव नसलेल्या सभागृहाच्या त्या भागांमध्ये (गॅलरी ) अनोळखी व्यक्तींचा प्रवेश सभापतींनी दिलेल्या आदेश व नियमानुसार सुनिश्चित केला जातो.
या नियमानुसार सभापती सभागृहाच्या कोणत्याही भागातून अनोळखी व्यक्तींना बाहेर जाण्याचे आदेश देऊ शकतात. इतकेच नाही तर अशा व्यक्तींना संसदेतील (Parliament) तैनात कर्मचारी किंवा सुरक्षा रक्षक त्या व्यक्तीला परिसरातून बाहेर काढू शकतो. गैरवर्तणूक किंवा जाणूनबुजून नियमांचे उल्लंघन करणार्या व्यक्तीला ताब्यात घेण्याचे अधिकार आहे. (Lok Sabha Rules)
नागरिकांना प्रवेश कसा दिला जातो?
एखादा संसद सदस्य केवळ त्यांच्यासाठीच कार्ड (Visitor Card) जारी करण्यासाठी अर्ज करू शकतो. जे त्यांना वैयक्तिकरित्या परिचित आहेत अशाच व्यक्तींना ते देणे अपेक्षित आहे. खासदाराने हे प्रमाणित करणे आवश्यक आहे की, संबंधित व्यक्ती 'माझा नातेवाईक, वैयक्तिक मित्र, मी वैयक्तिकरित्या ओळखतो आणि मी त्याची किंवा तिची संपूर्ण जबाबदारी घेतो'. यात संबंधित व्यक्तींची पूर्ण नावे देणे आवश्यक आहे.
केवळ आद्याक्षरांसह नावे देता येत नाही. वडिलांचे, महिला असेल तर वडील किंवा पतीचे नाव देखील पूर्णपणे दिले पाहिजे. प्रवेशपत्राचे अर्ज सेंट्रलाइज्ड पास इश्यू सेल द्वारा वितरित केले जातात. एका विशिष्ट दिवसासाठी सदस्याला चार पेक्षा जास्त 'सेम-डे' कार्ड दिले जात नाहीत. हे प्रवेश पत्र सदस्याने वैयक्तिकरित्या गोळा करणे आवश्यक आहे. कार्ड ज्या विशिष्ट वेळेसाठी वैध आहे ते कार्डवर नमुद केलेले असते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दोन गॅलरीत मिळू शकतो प्रवेश
सार्वजनिक गॅलरी आणि स्पीकर गॅलरी असे लोकसभेत दोन प्रकारच्या गॅलरी आहेत. खासदार सार्वजनिक गॅलरीत दररोज चार लोकांच्या प्रवेशाची सोय करू शकतो, तो/ती स्पीकरच्या गॅलरीत दोन लोकांच्या प्रवेशाची सोय करू शकतात. नंतर या सर्वांची नावे सभापती कार्यालयाद्वारे तपासली जातात. सर्व नागरिकांना फोटो ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रवेशासाठी राज्यसभेचे स्वतःचे नियम आहेत, जे समान आहेत.
गॅलरीत सुरक्षा व्यवस्था कशी असते?
सार्वजनिक गॅलरीत संसदेचे सुरक्षा कर्मचारी असतात. नागरिकांवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवण्याचे त्यांचे कर्तव्य असते. नागरिकांनी शांतता राखली पाहिजे आणि घोषणाबाजी करणे, पत्रके, माहितीपत्रिका फेकण्याचा प्रयत्न करणे, इतर कोणतीही आक्षेपार्ह वस्तू किंवा चेंबरमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न यासारख्या कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा गडबड होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी ही या सुरक्षा रक्षकांवर असते. गॅलरीमधील सुरक्षा रक्षक नागरिकांच्या बसण्याच्या व्यवस्थेची काळजी घेतात.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.