Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा संघर्ष पेटला असताना मनोज जरांगे पाटील यांना थेट निवडणुकीत उभे न करता त्यांच्यासोबत सामाजिक युती करत प्रकाश आंबेडकर यांनी आज नवी खेळी खेळली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत अप्रत्यक्ष तिसरी आघाडी स्थापन करत प्रकाश आंबेडकर यांनी केवळ महाविकास आघाडीला कोंडीत पकडले नाही, तर थेट महायुतीलादेखील अडचणीत आणले आहे.
प्रकाश आंबेडकर यांची ही चाल महाराष्ट्रात विशेषतः गरीब आणि वंचित मराठा, ओबीसी आणि मुस्लिमांना सोबत घेऊन जाणारी ठरेल. इतकेच नाही तर आंबेडकर यांनी जैन समाजालादेखील तिकीट देण्याचे घोषित केले. त्याचबरोबर सांगलीतून प्रकाश शेंडगे यांना त्याचबरोबर नागपूर येथून काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा घोषित केला. तत्पूर्वी काँग्रेसचे उमेदवार असलेले छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूर येथे पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या दोन उमेदवारांना वंचितने पाठिंबा दिला आहे. त्या आधारे वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील त्यांची जागा आज सुनिश्चित केली. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस उमेदवार घोषित होण्याची शक्यता मावळली आहे. थेट वंचित नेते प्रकाश आंबेडकर आणि भाजप उमेदवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नागपूर, कोल्हापूर येथे काँग्रेस उमेदवाराला वंचितने पाठिंबा घोषित केल्याने काँग्रेस सोबत वंचितने जुळवून घेतल्याचे चित्र आहे, तर राज्यातील इतर पाच ठिकाणी वंचितचा पाठिंबा मात्र गुपित ठेवला आहे. त्या ठिकाणी वंचित काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यातून अप्रत्यक्षपणे काँग्रेसचा अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. यात निवडणूक आयोगाने पाच टप्प्यांत घेतलेल्या निवडणुकीचा फायदा वंचित प्रत्येक टप्प्यावर स्वतःच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही. इतक्यावरच वंचित थांबली नाही तर त्यांनी थेट भाजपचे दिग्गज उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देत वंचित भाजपची बी टीम आहे ही होणारी ओरड आज संपवून टाकली.
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय जिवंत ठेवत. त्या विषयाला राजकीय व्यासपीठ प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. यातून वंचितच्या मतदारांमध्ये आता गरीब मराठा सहभागी झाल्यास आश्चर्य वाटू नये, अशीच चाल आज आंबेडकर यांनी खेळली आहे. याचा सर्वाधिक फटका हा राज्यातील महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच्या उमेदवारांना बसणार आहे. वंचितच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला दिलासा मिळाला असला तरी आंबेडकर यांनी केवळ पहिल्या दोन टप्प्यांतील जागांची घोषणा केली आहे. अजून पुढील तीन टप्प्यांचा प्रवास अद्याप बाकी आहे. महाविकास आघाडी सोबत वंचितची आघाडी झाली नाही तर या ठिकाणचे उमेदवार निवडणूक लढवतील, असा प्रत्यक्ष इशारा आंबेडकर यांनी दिला.
महाविकास आघाडीसोबत सन्मानपूर्वक आघाडी झाली तर वंचितचे उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज त्या त्या लोकसभा मतदारसंघातून मागे घेतील, अशीच काय ती व्यवस्था आज निर्माण केल्या गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील पाच टप्प्यांतील निवडणूक प्रक्रिया वंचितच्या पथ्यावर पाडण्यात आंबेडकर हळूहळू चाली खेळत राहतील. याचाच एक भाग म्हणून आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी पत्रकारांच्या एकाही प्रश्नांना उत्तर दिले नाहीत. वंचितचे महाविकास आघाडीसोबत फिस्कटले काय, वंचित स्वतंत्र लढणार काय, काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देणार असल्याचे वंचितने घोषित केले, त्यापैकी कोल्हापूर, नागपूरच्या जागेवर थेट पाठिंबा वंचित ने का घोषित केला. अशा सर्व परिस्थितीत महाविकास आघाडीसोबतचे अनेक प्रश्न वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज टाळले. त्यांनी टाळलेल्या प्रश्नांची शृंखला आणि त्याची उत्तरे हळूहळू लोकसभा निवडणुकीत टप्प्यानिहाय समोर येतील.
उमेदवार जाहिहीर करताना वंचितने अगदी थेट उमेदवार कोणत्या जातीचा आहे हेदेखील सांगून टाकले. त्यामुळे ज्या ज्या जातीचा उमेदवार घोषित केला. त्यांना आपलेसे करण्यात, त्यांना जवळ ओढण्यात वंचितने आज बाजी मारली आहे. आज सकाळी 'सरकारनामा' ने दिलेल्या बातमीनुसार वंचितने महाविकास आघाडीसोबतची युती तोडल्याचे कुठेही घोषित केले नाही. त्याचबरोबर स्वतःचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार घोषित करत शिवसेनेला यवतमाळ - वाशीम मतदारसंघात अडचणीत आणले आहे. यवतमाळ - वाशीम मतदारसंघात वंचितने बंजारा समाजातील उमेदवार खेमसिंग प्रतापराव पवार यांना उमेदवारी घोषित केली, तर रामटेकचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे.
वंचित आणि मनोज जरांगे पाटील यांची आघाडी
श्रीमंत मराठा विरोधात गरीब मराठा हा विषय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून आधीच गाजत आहे. त्यात वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात आणले आहे. मनोज जरांगे पाटील हे जरी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही तरीदेखील गरीब मराठ्यांना आता आंबेडकर त्यांचे नेते वाटू शकतात. हेच सामाजिक आघाडीचे मोठे यश ठरू शकते. ओबीसींबरोबर आंबेडकर यांनी वंचितच्या सोबत मराठा जोडण्याची प्रक्रिया मराठा आरक्षणास पाठिंबा देत सुरू केली होती. मराठा आरक्षणास श्रीमंत मराठा विरोधक असल्याचे चित्र आंबेडकर यांनी निर्माण केले होते. ओबीसी आणि मुस्लिम समाजाला वंचित प्राधान्य देणार आहे. अल्पसंख्याक जैन समाजाला उमेदवारी देण्याची घोषणा आंबेडकर यांनी केली, तर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक असलेल्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचे उमेदवार घोषित केले. 30 मार्चपर्यंत मनोज जरांगे पाटील हे त्यांचा निर्णय घोषित करणार आहेत. आंबेडकर यांच्या सोबत जरांगे पाटील यांची हातमिळवणी लोकसभा निवडणुकीत कायम राहिली तर महायुतीला सर्वाधिक डोकेदुखी असेल. केवळ लोकसभाच नाही तर विधानसभेत अडचणी वाढतील. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 2 एप्रिलपर्यंत चर्चा करण्यात येईल. दिनांक 4 एप्रिलपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येईल. मनोज जरांगे पाटील यांचा घटक दुर्लक्षित करता येणार नाही, असे म्हणत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आणले आहे हेच त्यांचे राजकीय कौशल्य आज दिसून आले. जे इतर कुठल्याही राजकीय पक्षांना करता आले नाही.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.