Mahadev Jankar Politics : भाजपची 2014 नंतर प्रचंड वेगानं विस्तारणारा पक्ष म्हणून अशी ओळख निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत विराजमान असलेल्या भाजपचं राजकारण हे नेहमीच दूरदृष्टी आणि धोरणात्मक,आक्रमक राहिलं आहे. साम,दाम,दंड ,भेद अशा सगळ्या सूत्रींचा वापर करुन भाजपनं देशासह महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशाही बदलली. भाजपनं महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे बलाढ्य पक्ष फोडलेच, शिवाय पर्यायी नेतृत्व तयार करत प्रादेशिक पक्षसंघटना, मातब्बर नेत्यांचं राजकारणही मोडीत काढलं. यातलंच एक नाव म्हणजे महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणता येईल.
भाजपनेच 2014 पासून राष्ट्रीय समाज पक्षाला ताकद देताना महादेव जानकरांचं धनगरांचे नेते म्हणून नेतृत्व पुढं आणलं. पण एकीकडे भाजपनं जानकरांचं राजकारण वाढवतानाच दुसरीकडे समांतर पध्दतीनं धनगर समाजातील नवं नवं आक्रमक नेतृत्व शोधण्याचाही प्रयत्न सुरु केला. पण ते शोधताना हे नेतृत्व इतर कुठल्या पक्षापेक्षा ते भाजपमधलंच असेल याची पुरेपूर काळजी घेतली. त्यात राम शिंदेंचा सुशिक्षित चेहरा आणि देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) जवळचे नेते म्हणून ओळख असलेल्या राम शिंदेंना पुढे आणण्यात आलं.
याचवेळी फडणवीसांना 2019 विधानसभा निवडणुकीआधी गोपीचंद पडळकरांसारखं आक्रमक चेहरा मिळाला. भाजपमध्ये आधी जपून, तोलून मापून बोलण्याची परंपरा मोडीत काढत टीकाकाराला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याच्या दृष्टीनं पडळकर भाजपसाठी परफेक्ट नाणं आहे हे फडणवीसांसारख्या चाणाक्ष नेत्यानं त्याक्षणी हेरलं. याच एकतर फडणवीसांच्या ऐकण्यातला आणि त्यात भाजपच्या चिन्हावर लढणारा धनगरांचा नेता म्हणून पडळकरांना प्रचंड ताकद दिली. तर दुसरीकडे भाजपनं महादेव जानकरांचं राजकारण आणि महत्व कमी केलं.
एकीकडे राज्यसभेसह विधान परिषदेचीही उमेदवारीसाठी पत्ता कट करत भाजपनं महादेव जानकरांंच्या राजकारणालाच खिळ घातली. तर दुसरीकडे भाजपनं राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेची संधी तर दिलीच, शिवाय विधानसभा निवडणुकीच्या मैदानातही उतरवलं. विशेष म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा खेचूनही आणलं. तर दुसरीकडे राम शिंदेंना निसटता पराभव स्विकारावा लागला. पण भाजपनं या दोन्ही नेत्यांवर तितका विश्वास दाखवला हे काय थोडं आहे.
लोकसभा निवडणुकीआधी अचानक महायुतीतून बाहेर पडण्याचा तडकाफडकी निर्णय रासपच्या महादेव जानकरांनी घेतला. त्यानंतर त्यांनी शरद पवारांशी जवळीकही वाढवली. माढा मतदारसंघातून तिकीट देण्याची महाविकास आघाडी आणि पवारांची तयारी सुरू असतानाच जानकरांनी एका रात्रीत पुन्हा महायुतीत एन्ट्री मारली. आणि परभणीची जागा पदरात पाडून घेतली. पण महायुतीनं तिथं प्रचंड ताकद लावून आणि महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेऊनही जानकरांना परभणीत पराभव झाला.यानंतर जानकर चांगलेच बॅकफूटला गेले.
महाराष्ट विधानसभा निवडणुकीतही महादेव जानकरांना महायुती, महाविकास आघाडी आणि तिसरी आघाडी असे सर्व पर्याय नाकारत थेट स्वबळावर निवडणूक लढवण्याचं धारिष्ट्य दाखवलं. पण रासपचा एकमेव आमदार निवडून आला. आणि जानकरांसह रासपचं राजकारणंही धोक्यात आलं. आता जानकरांची महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्तित्व टिकवण्यासाठी मोठी धडपड सुरू आहे.
पण महायुती किंवा भाजपकडं सध्या प्रचंड बहुमत असताना जानकरांना महत्त्व देण्याची त्यांना गरज नाही. आणि तसेही भाजपनं गोपीचंद पडळकर आणि राम शिंदेंच्या नेतृत्वाला धनगर समाजात रुजवण्यात बर्यापैकी यश मिळवलं आहे. जानकरांपेक्षा सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून शिंदे,पडळकर यांच्याकडचा धनगर समाजाचा ओढा आगामी काळात वाढताच राहणार आहे.
महादेव जानकर यांनी कांशीराम यांच्या नेतृत्वातील बहुजन समाज पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यानंतर ते यशवंत सेना या सांस्कृतिक संघटनेचेही प्रमुख होते. जानकर यांनी 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. 2009 मध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.
तसेच 2014 मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा जरी पराभव झाला असला तरी ते त्यांनी शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात सुळेंसारख्या मातब्बर नेत्यांना दिलेली टफ लढत राज्यात चर्चेचा विषय ठरली होती.
यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची चर्चा होऊ लागली. त्यानंतर भाजपनं त्यांना महाराष्ट्रात धनगर समाजाचं नेतृत्व म्हणून ताकद पुरवली. दोन्ही निवडणुकीत पराभव झाल्यावर 2014 मध्ये भाजपनं शिवसेनेसोबत सरकार स्थापन केल्यानंतर जानकरांना विधानपरिषदेची संधी दिली. तसेच त्यांना राज्य मंत्रिमंडळातही घेतलं. त्यांना पशुपालन,दुग्धविकास आणि मत्स्य पालन विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट घेत महायुतीविरोधात दबावतंत्राचा वापर केला होता. जानकरांना महाविकास आघाडीसोबत घेऊन तिकीट देण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या.
पण देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार घडवित महादेव जानकरांना एका रात्रीत महायुतीत आणले होते. मात्र, परभणी मतदारसंघात पराभव झाल्यानंतर जानकरांनी महायुतीची साथ सोडत स्वबळाचा नारा दिला. पण आता त्यांच्या एकमेव आमदारानं मोठा निर्णय घेत थेट जानकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
महादेव जानकर यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासपचे नवनियुक्त व एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपण महायुतीसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आमदार गुट्टे यांनी थेट महायुतीलाच जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महादेव जानकर हे सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे. ते सध्या महायुती किंवा महाविकास आघाडी अशी दोन्ही युती व आघाडींपासून चार हात लांब आहेत. पण भाजपनं गेल्या दहा वर्षांत गोपीचंद पडळकर आणि राम शिंदेंना ताकद देत महादेव जानकरांची राजकीय कोंडी केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महादेव जानकर व रासपसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे यात शंका नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.