Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule Raosaheb Danve Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Assembly Election 2024 : सरंजामी वृत्तीचे ओंगाळवाणे प्रदर्शन; 'या' नेत्याचा भाजपसाठी 'सेल्फ गोल'

Raosaheb Danve Viral Video : निवडणुकीच्या काळात नेत्यांना जपून वागावे लागते. आपला असला नसला थाट बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना जपावे लागते. अशा नाजूक प्रसंगी भाजपचे नेते रावसाहेब दानवे हे आपल्याच कार्यकर्त्याला लाथ मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दानवेंचे हे कृत्य भाजपसाठी 'सेल्फ गोल' ठरणारे आहे.

अय्यूब कादरी

Mumbai News: वादग्रस्त विधाने, वादग्रस्त कृत्ये आणि काही नेत्यांचे अतूट नाते असते. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा त्यात समावेश होतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले दानवे त्यापूर्वी जालना मतदारसंघातून सलग पाचवेळा विजयी झाले होते.

त्यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना सरंजामी थाटाचे ओंगाळवाणे प्रदर्शन करणाऱ्या दानवे यांच्या या कृत्याची चर्चा सुरू झाली आहे. रावसाहेब दानवे यांचा स्वभाव अघळपघळ आहे, मात्र त्याला सत्तेतून येणाऱ्या निष्काळजीपणाची किनारही आहे. त्यामुळेच स्वतःला अडचणीत आणणारी विधाने, कृत्ये त्यांच्या हातून घडतात.

लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. असे असले तर मराठा (Maratha) चेहरा म्हणून पक्षाने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली. त्यांनी मरठावाडा पिंजून काढला आहे. जालन्यातील (jalna) शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला दानवे उपस्थित होते. यावेळी फोटो काढत असताना मध्येच येणाऱ्या कार्यकर्त्याला दानवे यांनी लाथ मारली. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

काही वर्षांपूर्वी दानवे यांनी त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे स्वतःला आणि भाजपला (BJP) एका मोठ्या संकटात लोटले होते. त्यावेळी ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी तुरीची हमीभावाने खरेदी करण्यास सरकारकडून विलंब झाला होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांनी भाजपला साथ दिली होती. असे असतानाही दानवे यांनी शेतकऱ्यांसाठी 'साले' हा शब्द वापरला होता.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या असंतोषात भर पडली होती. शेतकऱ्यांसाठी दानवे यांनी वापरलेल्या 'साले' या शब्दाने भाजपचा अजूनही पिच्छा सोडलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी लागू केली त्यावेळीही दानवे यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर संशय निर्माण झाला होता.

नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या होत्या, एटीएएममधून पैसे काढण्यासाठीही देशभरात रांगा लागल्या होत्या. लोक त्रस्त झाले होते आणि असा प्रसंगी दानवे म्हणाले होते, तुमच्याकडे नोटा असतील तर माझ्याकडे द्या, मी त्या बदलून देतो. पक्ष सत्तेत असला की दानवे यांची जीभ अनेकदा अशी सैल सुटल्याचे दिसून आले आहे.

रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यात गाढ मैत्री आहे, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांना मदत केल्याची कबुली जाहीरपणे दिली. त्यावेळेपासून दानवे आणि सत्तार यांच्यात अंतर निर्माण झाले आहे. सिल्लोड हा सत्तार यांचा विधानसभा मतदारसंघ आहे.

दानवे यांनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केला. सत्तार यांचा उल्लेख औरंगजेब असा केला. असे करत असताना दानवे यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली. त्यावरूनही त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.

ताज्या प्रकरणामुळे दानवे अडचणीत सापडले आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू झालेला आहे. अशा काळात कार्यकर्त्यांना जोपासावे लागते, त्यांची काळजी घ्यावी लागते. कार्यकर्ते नाराज झाले की पक्षाची आणि उमेदवारी अडचण होते. अशा नाजूक प्रसंगात मंत्री राहिलेला माणूस इतक्या बेजबाबदारीने कसा वागू शकतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर दानवे आणि खोतकर फोटो काढत होते.

त्यावेळी एक कार्यकर्ता त्यांची शेजारी उभा असल्याचे दिसत आहे. त्याने बाजूला व्हावे, यासाठी रावसाहेब दानवे यांनी कॅमेऱ्याच्या समोरच त्याला लाथ घातली. त्या कार्यकर्त्याशी बोलून त्याला बाजूला हो, असे सांगणे दानवे यांच्यासाठी सहजशक्य होते. तरीही त्यांनी त्या कार्यकर्त्याला लाथ का मारली असेल, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. काही राजकीय नेत्यांच्या अंगी सरंजामी वृत्ती भिनलेली आहे.

दानवे त्यापैकीच एक. ते सतत या सरंजामी वृत्तीचे ओंगाळवाणे प्रदर्शन करत असतात. विधानसभेची निवडणूक भरात असताना दानवे यांनी आपल्या या कृत्याद्वारे विरोधकांच्या हाती मुद्दा दिला आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. हा मुद्दा दानवे यांच्यासह भाजप आणि महायुतीला जड जाईल, ही शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT