Mahavikas Aghadi Vs Mahayuti  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Assembly Election : ...म्हणून कार्यकर्त्यांनो, तुम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचला!

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi : आपण प्रस्थापित राहायलाच हवे, ही नेत्यांची मानसिकता, निवडून येण्याची क्षमता, हा राजकीय पक्षांचा निकष यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रमाण वाढले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले काही नेते पक्षांतर करून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात संबंधित नेत्यांसह पक्षांचाही स्वार्थ आहे. फरफट मात्र कार्यकर्त्यांची होत आहे.

अय्यूब कादरी

Maharashtra Politics : महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रत्येकी तीन पक्ष सामावलेले आहेत. त्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची संख्या 4 वरून 6 झाली आहे. यातूनच उमेदवारीसाठी ऐनवेळी पक्ष बदलण्याचे प्रकार घडून लागले आहेत. उमेदवारी याद्या जाहीर होण्यापूर्वी अशा घडामोडींना वेग आला आहे. सर्वकाही मलाच हवे, असा काही नेत्यांचा अट्टाहास पक्षांच्या वाढलेल्या संख्येमुळे पूर्णत्वास जात आहे.

गेल्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्र देशभरात चर्चेत राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. त्याची दखल जगातील 33 देशांनी घेतली होती, असे शिंदे त्यावेळी म्हणाले होते. अनपेक्षित, धक्कादायक राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला सुरूंगच लागला. राज्याचे, लोकांचे हित राहिले बाजूलाच, वैयक्तिक आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नेते कोणत्याही थराला जाऊ लागले. तसाच प्रकार आता विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुतीसाठी (Mahayuti) धक्कादायक होते. महायुतीच्या काही दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यात भाजपचे संजयकाका पाटील सांगलीतून आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेड मतदारसंघातून पराभूत झाले. सांगलीत तिरंगी लढत होती. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या जागेवरून बिनसले होते.

हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला आणि चंद्रहार पाटील यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तिरंगी लढतीत भाजपचे संजयकाका पाटील विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र विशाल पाटील यांनी धक्का देत विजय मिळवला.

काँग्रेसकडून दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे या मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात होता. हा अंदाज खोटा ठरला. मतदारांनी अशोक चव्हाण यांना धक्का दिला आणि त्याचा फटका भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना बसला. ते पराभूत झाले. काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण विजयी झाले. वसंत चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले आहे. काँग्रेसने पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

संजयकाका पाटील आणि प्रतापराव पाटील चिखलीकर हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांनी ज्या पक्षातून निवडणूक लढवली होती, ते पक्ष या दोघांनीही आता गुंडाळून ठेवले आहेत. या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजितदादा पवार यांनी संजयकाका पाटील यांना कवठे महंकाळ, तर चिखलीकर यांना लोहा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. लोकसभेत प्रवेश मिळाला नाही म्हणून काय झाले, आपल्याला विधानसभेत प्रवेश मिळालाच पाहिजे, अशी या नेत्यांची भूमिका आहे.

संजयकाका आणि चिखलीकर हे लोकसभेला पराभात झालेले नेते. त्यांच्याशिवाय समरजितसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, हिरामण खोसकर, सुलभा घोडके, झिशान सिद्दीकी.... अशी पक्षांतर केलेल्या नेत्यांची यादी लांबतच जाणार आहे. कोणता नेता कुठल्या पक्षात आहे आणि किती दिवस तो त्या पक्षात राहील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का, असा उद्विग्न प्रश्न सर्वच पक्षांचे कार्यकर्ते अधूनमधून उपस्थित करतात. गेल्या पाच वर्षांत हा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आला आहे. नेते आपल्या सोयीनुसार पक्ष बदलतात. नितीमत्ता वगैरे सर्व बाबी कधीच कालबाह्य झाल्या आहेत. या पाच वर्षांत त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे.

राजकारणात एखादा नेता प्रस्थापित झाला की त्याला ते स्थान सोडवत नाही. ते स्थान टिकवण्यासाठी पक्ष, निष्ठा बदलणे या किरकोळ बाबी असतात. आम्ही आय़ुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का, ही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची खंत, उद्विगनता यांना काहीही अर्थ राहिलेला नाही. ही बाब कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेली नाही, असे म्हणता येणार नाही. सतरंज्याच उचलायच्या का, असा प्रश्न उपस्थित करणारे कार्यकर्ते नेत्यांच्या मागे जातात किंवा नव्याने आलेल्या नेत्याच्या तरी कामाला लागतात.

उमेदवारी देताना सर्वच पक्ष एकमेव निकष पाहतात, तो म्हणजे निवडून येण्याची क्षमता. त्यामुळे अन्य बाबी कमी महत्वाचा ठरतात. निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार आपल्या पक्षात येत असेल तर तो कोणाला नको असतो? बाकी राजकीय नितीमत्ता, पक्षनिष्ठा, तत्वांचे राजकारण या बाबी चर्चेपुरत्या मर्यादित राहिलेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत राज्याने अनेक धक्कादायक घडामोडी पाहिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराची लाट, हा त्याच्याच पुढचा भाग आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT