Raj Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray : भोजपुरी नृत्य अन् सीएम शिंदेंवर निशाणा, ...तर राज ठाकरेंनी स्पेस गमावली नसती!

Raj Thackeray Comments on Dance at Shinde's Rally: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यायच्या आधी त्यांच्या सभेच्या स्टेजवर भोजपुरी नृत्यावर महिलेचे नृत्य झाले. यावर राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. धरसोड वृत्तीला थारा न देता सत्ताधाऱ्यांवर असेच प्रहार केले असते तर त्यांना मोठी स्पेस मिळाली असती.

अय्यूब कादरी

MNS News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबतीत, त्यांच्या भूमिकांबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीत सत्ताधाऱ्यांची लक्तरे वेशीवर टांगण्याची त्यांची पद्धत अफलातून आहे. त्यामुळेच आजही राज ठाकरे यांची क्रेझ आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर सभेसाठी यायच्या आधी त्यांच्या स्टेजवर भोजपुरी गीतावर महिलेने नृत्य केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहेत. राज ठाकरे यांनी यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडी आणि काही राजकीय नेत्यांच्या वाचाळपणामुळे महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय संस्कृती लयाला गेली आहे. त्यात वरचेवर भर पडत आहे. नेत्यांच्या सभांना गर्दी जमवणे आणि जमलेली गर्दी उठून जाऊ नये, यासाठी कसरत करण्याची वेळ आता राजकीय पक्षांवर आली आहे.

लोकांना खिळवून ठेवण्याचे, त्यासाठी त्यांचे मनोरंजन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच भोजपुरी गाण्यावर महिलेला नृत्य करायला लावण्यात आले. उत्तरेकडील काही राज्यांत नेहमी पाहायला मिळणारा हा प्रकार महाराष्ट्रात बहुधा पहिल्यांदाच घडला.

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेशी विसंगत असा हा प्रकार आहे. त्यावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी जवळीक असल्याप्रमाणे वागणारे राज ठाकरे या प्रकरणावरून भडकले आहेत.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर आहेत. भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी भाजपची अपेक्षा होती.

सदा सरवणकर हेच महायुतीचे उमेदवार आहेत, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. आम्ही सरवणकर यांच्यासाठीच काम करणार, असेही राणे यांनी जाहीर केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली होती.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले होते. त्यामुळे राणे यांची भूमिका राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या लोकांना खूप जपतात. त्यामुळे इच्छा असूनही त्यांनी सरवणकर यांना माघार घ्यायला सांगितले नसणार.

गेल्या पाच वर्षांतील पक्षांची फोडाफोडी, नेत्यांच्या पक्षांतरांना ऊत आला होता. या काळात राज ठाकरे यांना मोठी संधी होती, मात्र येथेही त्यांची धरसोड वृत्ती आडवी आली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्याच्या सहा महिन्यांनंतर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.

महाविकास आघाडीचे सरकार असताना राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेले. महायुतीचे सरकार आल्यानंतर राज ठाकरेंचे ते आंदोलन थंडबस्त्यात गेले. अशा भूमिकांमुळे लोकांमध्ये आपली विश्वासार्हता राहील किंवा नाही, याचा विचार राज ठाकरे यांनी केलेला दिसत नाही.

धरसोड वृत्तीची राज ठाकरे यांची भूमिका जुनीच आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात न उतरवता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात राज्यभरात सभा घेतल्या होत्या. भाजपच्या यशावर त्याचा काहीही परिणाम झाला नव्हता.

भाजपच्या 23 आणि शिवसेनेच्या 18 अशा युतीला एकूण 41 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतरच्या म्हणजे 2024 निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी अशा धरसोड वृत्तीचे प्रदर्शन केले नसते तर सत्ताधाऱ्यांना ते सक्षम पर्याय म्हणून उभे राहिले असते.

सभेच्या व्यासपीठावर भोजपुरी नृत्यावरून राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना नक्कीच घाम फुटलेला असणार. विरोधी पक्षनेतेच सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असतानाच्या, विरोधी पक्षनेते सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळत असतानाच्या काळाच राज ठाकरे यांनी अशी भूमिका घेऊन ती कायम ठेवली असती तर.... काय झाले असते, असा प्रश्न नक्कीच लोकांच्या मनात निर्माण होत असणार. सदा सरवणकर यांनी माघार घेतली असती तर राज ठाकरे यांनी भोजपुरी नृत्य प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदे यांना असेच सुनावले असते का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT