Maharashtra Legislative Assembly Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Assembly clash : मुख्यमंत्र्यांच्या दालनात राडा! आता महाराष्ट्राने एवढंच पाहायचं राहिलंय...

Supporters of Awhad and Padalkar Clash Inside Maharashtra Assembly : जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी झाली. ही धक्कादायक घटना लोकशाहीच्या मंदिरात घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Rajanand More

Maharashtra’s Political Legacy : महाराष्ट्राची राजकीय संस्कृती किती विकृत होत चालली आहे, याचे भडक उदाहरण संपूर्ण जगानं गुरूवारी पाहिलं. सतत बिहारच्या नावाने खडे फोडणारे नेते आणि कार्यकर्त्यांना लाज आणणारी घटना विधानभवनात घडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळात घडलेल्या घटनेने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला काळीमा फासला.

मागील काही वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण किती असंस्कृत झाले आहे, याचे दर्शन पावलोपावली होताना दिसत आहे. नेत्यांकडूनही ही कबुली दिली जाते. त्यासाठी यशवंतराव चव्हाण, शरद पवार, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे आदी नेत्यांची नावे घेत त्यांच्या काळातील राजकीय परंपरेची अनेकजण आठवण काढून आताच्या राजकारणाला दोषही दिला जातो. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, आंदोलने तर तेव्हाही होतच होती. पण त्यांची भाषा, या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील दिलदारपणा, विधिमंडळातील भाषणांना मिळणारी दाद हे राजकीय विरोधकांमधील मनांची श्रीमंती दाखविणारी होती.

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणात सध्याचे नेते पाया पडण्यायोग्य नसल्याचे विधान केले होते. अजित पवारांचे हे विधान नेमके कोणत्या नेत्यांसाठी होते, हे माहिती नाही, पण महाराष्ट्रात सध्या असे अनेक नेते आहेत, त्यांना निश्चितच लागू होते, हे राज्यातील लोक नाकारणार नाहीत. रस्ता असो की शासकीय कार्यालयांमधील बैठकांमध्ये नेते हमरीतुमरीवर आल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. पण आता हे लोण विधिमंडळातही पोहचल्याने महाराष्ट्राची नाचक्की होताना पाहावे लागत आहे.

मंत्री शंभुराजे देसाई आणि आमदार अनिल परब यांच्यात विधान परिषदेत झालेली शाब्दिक चकमक आणि त्यातील शब्द काय दर्शवितात? त्याचप्रमाणे भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी परबांविषयी केलेले विधान असो की विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविषयी करण्यात आलेली शेरेबाजी, आदित्य ठाकरे आणि नितीश राणे यांच्याकडून एकमेकांची होणारी टिंगल, आमदार संजय गायकवाड यांची टॉवेल, बनियनवरील कॅन्टीमधील मारहाण... अशी अनेक उदाहरणे देता येतील.

जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपूर्वी विधानभवनातच मंगळसूत्र चोर असे म्हटल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये बुधवारी विधानभवनाबाहेर शाब्दिक चकमक उडाली होती. त्यातील अर्वाच्य भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नव्हती. त्याचे पडसाद गुरूवारी विधानभवनात उमटले. पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते विधानभवनातच भिडले. आव्हाडांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे.

कुणाच्या कार्यकर्त्याला कुणी मारहाण केली, हे महत्वाचे नाही. विधिमंडळाच्या आवारात हा राडा झाला, हे महाराष्ट्राला शोभणारे नव्हते. रस्त्यावरील वाद विधिमंडळात पोहचला आहे. हा वाद कधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, मंत्री यांच्या दालनापर्यंत पोहचले, हे समजणारही नाही. अनेक नेत्यांची भाषा आणि कृती असभ्यतेच्या सीमा ओलांडत आहेत. त्यात मंत्रीही मागे नाहीत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तंबी देतही असतील, पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न, अशी स्थिती असते. पक्षाचे प्रमुख नेते आपल्या आमदारांना चांगले वागण्याचे, बोलण्याचे धडे देतही असतील, पण पुन्हा फिरून भोपळे चौकात, या पुणेरी उक्तीचा अनुभव येताना दिसतो. त्यामुळे मंत्र्यांच्या दालनातही हाणामारी, अशी दृश्ये पाहायला मिळू नयेत, अशीच अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तमाम नेत्यांकडून करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT