Thackeray Group To Contest 25 Seat In Mumbai Sarkarnama
विश्लेषण

Video Thackeray Group: बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुंबईत हव्यात आहेत इतक्या जागा

Mangesh Mahale

आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. जागांच्या वाटाघाटीमध्ये ऐनवेळी नेमक्या किती जागा लढायच्या याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने (Thackeray Group) रणनिती आखली आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही आहे.महाराष्ट्रात शिवसेनेची ठाकरे गट) ताकद असलेल्या मुंबईत 36 पैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे राहाव्यात यासाठी उद्धव ठाकरे आघाडीच्या बैठकांमध्ये प्रयत्न करीत आहेत. 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या, त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत.तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जात आहे.

मुंबईतील ज्या ठिकाणी ठाकरेंची ताकद आहे तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचा नियोजन करीत आहे. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला, 2024 च्या लोकसभा निवडणूक सुद्धा ठाकरेंनी आपल्या चारपैकी तीन जागा निवडून आणल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असल्याची माहिती आहे.

वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार आहे.

महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे.

राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागा,नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला आघाडी मिळाली आहे, त्या जागांचा आग्रह महाविकास आघाडीत धरावा लागेल.

आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असल्याने जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या. मात्र, वेळ पडल्यास 288 विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जागा लढविण्याचीही तयारी ठेवायची अशाप्रकारची रणनिती ठाकरे गटाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT