लोकसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानीनंतर पिछाडीवर गेलेल्या भाजपमध्ये कार्यकर्त्यांमधील संभ्रम आणि नेत्यांमधील स्पर्धा अजूनही कमी झाल्याचे दिसत नाही. ‘फेक नरेटिव्ह’च्या लढाईत हरलो, अशी मांडणी महाराष्ट्र भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालानंतर केली. कार्यकर्त्यांना वेळोवेळी जोमाने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. संघटना ही भाजपची ताकद आहे. त्यामुळे, विधानसभेच्या तयारीत संघटनात्मक ताकदीवर काम सुरू झाल्याचे दिसते आहे.
भाजपच्या (BJP) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची सूत्रे केंद्रीय पक्षाने नेमून दिलेल्या प्रभारींच्या हातात आहेत. त्यांच्या नियोजनाचा भर कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून संघटनेला सक्रिय करण्यावर आहे. त्यासाठीच्या प्रवासाचे आणि स्थानिक बैठकांचे नियोजन भाजप करत आहे. भरपूर पदे, मोठमोठ्या नावाचे उपक्रम किंवा यात्रा यांचा समावेश टाळून ''मंडल प्रमुख'' आणि त्यावर आधारित बूथ रचनेला भक्कम करण्याकडे पक्षाने लक्ष दिले आहे. प्राथमिक स्तरावर मतदार याद्यांवरही बरेचसे काम झाल्याचे दिसते आहे. राज्य भाजपच्या निर्णय प्रक्रियेतही सांघिक नेतृत्वावर भर देऊन जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केंद्रीय पातळीवरून होतो आहे. रचनेत सर्व नेत्यांना सामावून घेताना डिजिटल माध्यमातून होणाऱ्या तर्कवितर्कांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम वाढतो, याची दखल पक्षाला घ्यावी लागणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) समन्वयावर काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे. राष्ट्रहिताच्या विचाराने प्रेरित, संघ परिवाराच्या विचार आणि रचनेतून तयार झालेल्या भाजपने देशात २०१४ ते २०१९ या काळात आपला विस्तार वाढवत नेत पक्षाला जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून नावारूपाला आणले. आता संघाच्या सामाजिक समरसतेच्या उद्दिष्टाची कसोटीच विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात होणार आहे, असे आजचे सामाजिक प्रश्न आणि मुद्दे बघता दिसते. कारण, रचनेचा पाया ‘कार्यकर्ता’ राहिलेल्या कार्यकर्ताधिष्ठित भाजपचा महाराष्ट्रातील प्रवास संभ्रमित कार्यकर्ता संघटनेकडे सुरू झाल्याचे सध्याचे चित्र आहे. ‘
‘परिवार में जिस तरह माँ होती है। उसी तरह हमारे लिए हमारी पार्टी है।’’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नुकतेच म्हणाले. प्रत्यक्षात, केंद्रीय आणि राज्य पातळीवर केलेल्या राजकीय तडजोडी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात पक्ष कमी पडल्याचे लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) दिसले होते. शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणूका, महामंडळ आणि इतर लाभाच्या रखडलेल्या नियुक्त्या यामुळे सत्तेत सहभागी असूनही सत्तेच्या लाभापासून कार्यकर्ता वंचित राहिला. स्थानिक इच्छुकांची संख्या वाढत गेली. त्याचेही परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही समोर आले.
महाराष्ट्रात भाजप रुजली, वाढली याचे कारण फक्त तत्कालीन सत्तेतील काँग्रेसबद्दलच्या नाराजीत नाही तर भाजपच्या रचनात्मक नियोजनातही आहे. जनसंघापासून महाराष्ट्रातले अस्तित्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ, मध्यमवर्ग आणि इतर सामाजिक घटकांसोबत सामाजिक समरसतेचा उपक्रम, माधवम सारखे सामाजिक अभियांत्रिकीचे प्रयोग यामुळे भाजपचा महाराष्ट्रात स्वतंत्र जनाधार तयार झाला. महाराष्ट्रात २०१४ नंतर भाजपचा स्वतंत्र नवीन अध्याय सुरु झाला. याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षातल्या सर्व रचनेवर त्यांचा प्रभाव आणि पकड आहे.
या काळात वाढलेल्या भाजपमध्ये सत्तेसोबत सहभागी होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे; मात्र भाजपच्या जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मात्र पीछेहाट झालेली दिसते. शिवाय, स्थानिक पातळीवर नवे, व्यापक जनाधार निर्माण करू शकणारे नवे चेहरेही उभे करण्यातही पक्षाला मर्यादा आल्याचे दिसते. याचे कारण, स्थानिक पातळीवर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आपले राजकीय आणि त्यावर आधारित संस्थात्मक अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक सहकारसम्राटांनी २०१९ विधानसभेला भाजपसोबत येणे पसंत केले. त्यामुळे, पक्षातील कार्यकर्त्यांच्या संधी आकुंचन पावल्या. आता, बदललेल्या राजकीय परिस्थितीत मर्यादित झालेल्या संधींमध्ये या नेत्यांची घरवापसी अनेक ठिकाणी होते आहे. आता, त्यांना सोबत ठेवण्यात फडवणीस किती यशस्वी ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. विधानसभेची २०२४ची निवडणूक अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. अशावेळी व्यक्तिगत राजकीय स्वार्थ की पक्षाचे हित हा निर्णय प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला घ्यावा लागणार आहे.
अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - 9881598815
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.