Maharashtra Assembly Elections 2024 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था. संघाने मातृसंस्थेच्या जबाबदारीने भाजपला सत्ता मिळविण्यासाठीचे बळ दिले. भाजपनेही सत्तेत आल्यावर कलम 370 हटविणे, राम मंदिराची उभारणी असे निर्णय मार्गी लावले.
मात्र सत्तेचे जसे फायदे तसेच तोटेही. एकीकडे विचार परिवाराच्या मागण्यांना न्याय देत असताना राजकीय अपरिहार्यतेच्या नावाखाली भाजपने अनेक सामाजिक संकेतांकडे दुर्लक्षही केले. जनमताचा रेटा दुर्लक्षित केला, तर निवडणुकांमध्ये फटका अटळ. याचा प्रत्यय भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी आला.
परिणामी मातृसंस्था म्हणून जबाबदारी घेणाऱ्या संघाने प्रलंबित मणिपूर प्रश्न, बांगलादेशमधील हिंदूंवर (Hindu) झालेले अत्याचार, जातीनिहाय जनगणना, अशा अनेक मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली आणि अधिकाराने भाजपला खडसावलेही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी भाजपने ज्या पद्धतीने स्वतःच्या संघटनेवर लक्ष दिले तसेच संघ आणि भाजप यांच्या मधल्या समन्वयावरही तितकाच भर दिला आहे.
स्वयंसेवकांची भूमिका आणि विचारधारेला अनुसरून ध्येय- धोरणांची आखणी हे सूत्र संघाने पुन्हा अधोरेखित केलेले दिसते. ‘हिंदुत्व’ या विचाराला बळकट करण्यासाठी संघ आणि भाजपच्या (BJP) समन्वयाची वीण पुन्हा नव्याने घट्ट केली जात आहे. यासाठी संवाद, रचनात्मक पायाभरणी आणि समन्वय यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न सध्या दिसतो आहे. संघ राजकीय भूमिका घेत नाही. पण विधानसभेसाठी विचारावर आधारित प्रबोधन मंच संघाकडून राबवले जातील. ज्यात राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करणाऱ्या उमेदवाराला पाठींबा देण्याची विनंती करण्यात येईल. संघाच्या निकषांवर पात्र ठरण्याची कसोटी उमेदवारांची असेल.
तडजोड ही राजकारणातील अपरिहार्यता. पण महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय तडजोडीचा अतिरेक झाला. राजकीय मोडतोड करून भाजपने जनतेचा रोष ओढवून घेतला. यावर संघ परिवारातर्फे वेळोवेळी नाराजी व्यक्त झाली. ज्या तडजोडी केल्या, त्यांचा वैचारिक आधार काय याबद्दल मांडणी करताना अजूनही भाजप चाचपडताना दिसतो. वैचारिक तडजोड होऊ नये याबाबत संघाने आग्रही भूमिका मांडली. संघ व्यक्ती केंद्रित रचनेला प्राधान्य देत नाही, संघटनेवर आधारित समाजातील सज्जनशक्ती एकवटावी या उद्देशाने संघ रचना कार्यरत असते. या रचनेचा पाया राष्ट्र प्रथम आणि हिंदुत्व या विचारांचा आहे. संघटन सर्वोच्च असावे व विचारांसाठी काम व्हावे हा संघाचा आग्रह असतो.
विचारधारेवर आधारित पक्ष बळकट करत जाण्याचे काम भलतेच अवघड आहे याची जाणीव महाराष्ट्रातील सत्तेत साडे सात वर्षे राहिलेल्या भाजपला पहिल्यांदा होते आहे. सत्ता या विचारधारेभोवती जमलेले नेते पक्ष सोडून संभाव्य सत्तेसाठी अन्यत्र जातात तेव्हा ही जाणीव अधिक ठळक होते आहे. विचारधारा सोडून फार काही साध्य होताना राजकारणात दिसत नाही. काँग्रेसने ''सॉफ्ट हिंदुत्व'' स्वीकारले म्हणून हिंदुत्ववादी मतदार काँग्रेसच्या बाजूने पूर्ण वळला, असेही नाही. पण राष्ट्र आणि धर्म या लढाईत न्यातींचे (जातींचे) महत्त्व वाढले, तर त्यातून भाजपची पीछेहाट होते हे लोकसभेला दिसले. त्यामुळे जातीनिहाय जनगणनेवर संघाने स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे. संघ राजकीय भूमिकांपासून दूर राहात असला, तरी हिंदुत्ववादी विचारधारेकडे राज्याची सूत्रे असावीत यासाठी विधानसभेला संघ पूर्ण क्षमतेने भाजपच्या पाठीशी असेल, हे ही तितकेच खरे आहे.
विधानसभेला भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना विशेष प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि लोकप्रियतेचा भाजपला नक्की फायदा होईल. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे अशा अनुभवी नेत्यांची फौज भाजप विधानसभेच्या प्रचारात उतरवत आहे. सत्तेशिवाय कार्यकर्ते संघटित ठेवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्या कौशल्याचा विधानसभा निवडणुकीत वापर करण्याचे भाजपचे इरादे आहेत. भाजपसमोर आव्हानांची जंत्री आहे. संघाशी समन्वय, सत्तेसाठीचे राजकारण, बेरीज करताना विचारधारा सांभाळणे, केंद्र-राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थींना मतदारांमध्ये बदलविणे, कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे अशा अनेक स्तरांवर भाजपला काम करावे लागणार आहे. अनुभवी नेत्यांची टीम ही आव्हाने कशी पेलते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.