Rohit Pawar Criticizes NCP Leaders: जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्याची जबाबदारी विरोधी पक्षांवर आहे. मात्र, ती खरोखरच पार पाडली जाते का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच विरोधक लढत नसल्याने जनता नाराज असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आमदार रोहित पवार यांनी करत स्वपक्षातील नेत्यांसह घटक पक्षांनाच ‘घरचा आहेर’ दिला. त्यांच्या या वक्तव्याकडे केवळ पक्षांतर्गत वाद म्हणून न पाहता त्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे.
अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनापासून सरकारने तर पळ काढला आहे. शक्तिपीठ महामार्ग थांबविण्याच्या घोषणेचा त्यांना विसर पडला असून, शेतकऱ्यांचा विरोध डावलून हा महामार्ग पूर्ण करण्याचा सरकारने घाट घातला आहे.
खोट्या पीकविम्यातून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. अनेक प्रकरणे समोर येत असताना आणि विधानसभेच्या अधिवेशनात सरकारची कोंडी करणे शक्य असताना विरोधकांकडून ‘नरो वा कुंजरो वा’ असा प्रकार सुरू आहे.
राज्यात महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले आहे. या बहुमताने विरोधकांची झोप उडवली आहे. राज्यात सर्व काही सुरळीत आणि आनंदीआनंद आहे म्हणून जनतेने महायुतीला निवडून दिलेले नाही. जिंकण्यासाठी आवश्यक डावपेच सत्तेचा वापर करून केले गेले.
यात राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता अनेक योजना जाहीर करून मतदारांना भुरळ घातली गेली. या ‘रेवडी योजना’ दणका देतील, याचा विरोधकांनाही अंदाज आला नाही. त्यामुळे मतदार मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले.
महायुतीला प्रचंड बहुमत मिळून विरोधक भुईसपाट झाले. जनतेचा कौल विरोधात गेला, सत्ता मिळाली नाही म्हणून लढणे सोडून द्यायचे नसते. मात्र, विरोधक लढण्याची हिंमतच हरवून बसले आहेत. त्यावर फुंकर घालण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केला.
एक वेळ अशी होती की पूर्वीच्या एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची फळी पाहून विरोधकांनाही धडकी भरायची. आर. आर. पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड यांनी एक काळ गाजवला.
मात्र, त्यानंतर नवीन नेतृत्व घडले नाही. आता पुन्हा एकदा आव्हाड हे आक्रमक भूमिका घेत पक्षाची बाजू लावून धरत आहेत. तसेच रोहित पवार यांच्यासह संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, अभिजित पाटील अधिवेशनात चांगले मुद्दे उपस्थित करून नेतृत्वाची चुणूक दाखवत आहेत. पक्षानेही आता तरुणांचा विचार करून, त्यांना संघटनेत सक्रिय करणे आवश्यक आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार, आमदारांची दोन दिवसांची बैठक पार पडली. तत्पूर्वी, ‘राष्ट्रवादी’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही बैठक पार पडली. यात प्रदेशाध्यक्ष आणि संघटनात्मक बदल करण्याची मागणी करण्यात आली.
तरीही पक्षाने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. अशा पद्धतीने युवकांना डावलले जाणार असेल तर संघटनावाढीवर परिणाम होऊ शकतो. कदाचित संघटनात्मक बदल न झाल्यानेच रोहित पवार यांनी सर्वच विरोधी पक्षांना सुनावले असले तरी, मूळ लक्ष्य हा ‘राष्ट्रवादी’तील नेतृत्वावर असल्याची चर्चा आहे. काही अंशी त्यांनी केलेल्या टीकेत तथ्यही असल्याचे दिसत आहे.
सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी अधिवेशनात अनेक मुद्दे आहेत. तरीही महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते सावध भूमिका घेताना दिसत आहेत. आपल्या भूमिकेने महायुती आणि त्यातही भाजप नाराज होणार नाही, याची ते खबरदारी घेत आहेत. मुळात यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे सहकारी साखर कारखाने, सूत गिरणी, बँक आणि शिक्षण संस्था आहेत.
त्यामुळे सरकार विरोध भूमिका घेऊन करून संस्थांना अडचण होणार नाही याची ते पुरेपूर काळजी घेत आहेत. त्या उलट आव्हाड आणि रोहित पवार यांनी सातत्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर हल्लाबोल केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा झालेला निर्घृण खून असो, की सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीतील मृत्यू, धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम आव्हाड, पवार, क्षीरसागर यांनी केले. अन्य नेते मूग गिळून गप्प असताना या दोन्ही नेत्यांनी त्यातही आव्हाड यांनी घेतलेली आक्रमक भूमिका लक्षणीय आहे. पक्षानेही त्याची दखल घेणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका खोट्या कागदपत्रांच्या आधारे घेतल्याचा आरोप कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे. अशा या कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्याची थट्टा करणारे वक्तव्य केले. मात्र, त्यावरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी सोयीचीच भूमिका घेतली. अशा नेत्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी आहे. अशाने पक्ष वाढणार कसा, असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ला अच्छे दिन आणण्यासाठी पक्षातील तरुणांना सोबत घेऊन काम करावे लागेल.
मूठभर असले तरी, सरकारला सळो की पळो करून सोडण्याची ताकद विरोधकांत हवी. सध्या ती महाविकास आघाडीत दिसत नाही. विरोधकांकडे ‘स्ट्रॅटेजी’ असणे आवश्यक असते, ती सध्या पाहायला मिळत नाही. त्यामुळेच रोहित पवार यांनी, ‘विरोधक लढत नाहीत. त्यामुळे जनता नाराज आहे’ असे वक्तव्य केले. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी हे वक्तव्य जयंत पाटील यांच्याबाबत केले असल्याचा तर्कही काहींनी मांडला. मात्र, अधिवेशनाचे कामकाज व विरोधी नेत्यांची भाषणे ऐकले की रोहित पवार यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे हे स्पष्ट होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.