समकालीन राजकीय चळवळी: नवहिंदुत्व व जातसंघटना’ या प्रकाश पवारलिखित पुस्तकात महाराष्ट्रातील जागतिकीकरण व प्रस्थापित राजकारणाला छेद देण्याच्या मुद्यावरून जे राजकीय व सामाजिक ताणतणाव निर्माण झाले, तसेच त्यातून निर्माण झालेले नवहिंदुत्व व जातसंघटनांच्या चळवळींचा चिकित्सक वेध घेण्यात आला आहे.
या पुस्तकाचे तीन भाग पडतात. पहिला भाग सोशल इंजिनिअरिंगच्या राजकीय प्रक्रिया व चळवळीवर आहे. यात नवहिंदुत्व या घटकाच्या आधारे कृतिसज्जता कशी घडली, या मुद्द्यांवर मांडणी करण्यात आली आहे. दुसरा भाग हिंदू राजकीय अस्मितेचा विस्तार व तिच्या मर्यादा काय आहेत, यावर आधारित आहे. तर तिसरा भाग हा या नवहिंदुत्ववादी घटकातील ठळक अशा जातसंघटनाची चळवळ कशी निर्माण झाली हा मुद्दा स्पष्ट करणारा आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक प्रवासाच्या टप्प्यात सुरुवातीच्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील व शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित मात्र मराठा समाजाच्या नेत्यांनी किंवा त्या विचारधारेचे नेतृत्व करणारी राजकीय सत्ता उदयाला आली. सत्तरच्या दशकात या सत्तेतून काही मूठभरांनाच फायदा व सर्वसामान्य लोकांच्या हाती काही लागू शकले नाही, अशी भूमिका मांडत विविध वैचारिक संघटनांनी बंड केलेल्या विविध विचारसरणीतील तरूणांच्या संघटना पुढे आल्या. त्यातून आपल्याच जातीतील प्रस्थापित नेत्यांना विरोध करणारी चळवळ उभी राहिली.
यातूनही भ्रमनिरास झाल्यानंतर किंवा त्याचवेळी दुसऱ्या बाजूला मुख्य हिंदुत्ववादी पक्षांना सातत्याने पराभव पत्करावे लागत होते. त्यातून प्रस्थापित कॉँग्रेस व मराठा नेतृत्वाविरोधात कुणबी मराठा तसेच नवबौद्ध वगळून मागासवर्गीय व इतर मागासलेल्या जातींची मोट या नवहिंदुत्ववादी चळवळींनी बांधली. व वेगळी राजकीय व राजकीय समीकरणे उदयास आली. मराठा समाजामध्ये कॉँग्रेसविरोध, सहकार चळवळविरोध, उच्च जातीविरोध, ओबीसी विरोध, अभिजन विरोध असा आर्थिक, राजकीय असंतोष धुमसतो आहे. त्याचे विश्लेषण पुस्तकात आहे.
नव्वदीच्या राजकारणाचे जातींच्या संघटना हे वैशिष्ट्य ठरले आहे. ओबीसी, दलित समाजातील जात संघटनांचे गेल्या तीन दशकात केले गेलेले राजकीय दावे, भौतिक हितसंबधांची चर्चा आणि अस्मितांचे राजकारण, तसेच याच काळातील ओबीसी व दलित राजकारणाचे अर्थ स्पष्ट करण्यात आले आहेत. नवहिंदुत्व चळवळीतील सत्तासंघर्ष व सत्ता संपादनाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रकल्प व हिंदू राष्ट्र निर्मितीची चळवळ जात संघटनांच्या चळवळीतील इतर मागासवर्ग व अभिजनांमधील सत्तासंघर्षदेखील लेखकाने मांडला आहे.
महाराष्ट्रात मराठा वर्चस्वाचे चव्हाण प्रारुप व हिंदुत्व वर्चस्वाचे नवहिंदुत्वादी प्रारुप अशी दोन प्रारुपे साधारणपणे घडली आहेत. या दोन्ही प्रारुपांपैकी कोणत्या प्रारुपाचा स्वीकार करावा असा प्रश्न मराठा, इतर मागास व नवबौद्ध जातींपुढे प्रश्न होता. यात मराठा ही जात या दोन्ही प्रारुपांचा सोयीनुसार वापर करत आहे. ब्राह्मण विरोधाच्या मुद्द्यावर मराठ्यांसह दलित व इतर मागासवर्गीयांचे संघटन केले जाते.
नवहिंदुत्ववादी वर्चस्वाचे प्रारुप हे एक बहुविविधता व लोकशाहीला आव्हान देते. कारण या प्रारुपात निर्णायक राजकीय सत्ता ही ब्राह्मण जातीकडे जाते. त्यामुळे लोकशाहीच्या तत्वानुसार उच्च जातींकडून कनिष्ठ जातींकडे सत्ता जाण्यास अडथळा निर्माण होतो. दुसरे म्हणजे हे प्रारुप मराठा, इतर मागास जाती, चर्मकार, मातंग, आदिवासी असा बहुजातीय चेहरामोहरा तयार करते. या प्रारुपातून पुढे आलेला मध्यमवर्ग वर्ग हा भांडवली पध्दतीचा व सवंग हिंदुकरणाचा समर्थक आहे. त्यामुळे नवभांडवलशाही व नवहिंदुत्ववाद यांची समान हिताच्या मुद्द्यांवर युती होते. त्यामुळे नवहिंदुत्ववाद हे लोकशाहीपुढील गंभीर आव्हान आहे असे लेखक मानतो.
पुस्तकात पुढे नवहिंदुत्वाचा आरंभ म्हणून पुण्यातून सुरू झालेल्या पतितपावन संघटनेच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला आहे. या संघटनेतील राजकीय घडामोडी नवहिंदुत्व या घटकांबरोबरच जात या मुद्द्द्यांच्या आधारे घडल्या. त्याचबरोबर अखिल भारतीय हिंदू सेना, हिंदू एकता आंदोलन, सामाजिक समरसता मंच या प्रकरणांत या संघटनांनी ओबीसी तरूणांचा सहभाग वाढवत नेत आपल्या संघटनांच्या कार्याचा आढावा घेत या संघटना नवहिंदुत्वाचा प्रसार कशा करत होत्या, हे मांडण्यात आले आहे.
त्याशिवाय वनवासी कल्याण आश्रम या संस्थेच्या माध्यमातून हिदुत्ववादी विचारसरणीने आदिवासींमध्ये कसा शिरकाव केला व तिथे आधी काम करत असलेल्या ख्रिश्चन मिशनरींच्या कार्यास प्रतिक्रिया किंवा विरोध म्हणून हे काम मंचाने कसे सुरू केले.त्यांच्या एकूण कार्यपद्धतीचा आढावा यात आहे.
पुस्तकाच्या दुसऱ्या विभागात हिंदू राजकीय अस्मितेचा विस्तार व मर्यादा काय आहेत याचे विश्लेषण करण्यात आले आहे. इतर मागास वर्ग व अभिजन वर्गाबरोबरचा सत्तासंघर्ष यात स्पष्ट केलेला आहे. येथील मराठा समाजाचा इतिहासाचा वारसा हा स्वराज्य, वारकरी, सत्यशोधक, ब्राह्मणेतर, समाजवादी, साम्यवादी, सहकार आदी चळवळींतून समृद्ध झाला आहे. या समृद्ध व प्रगल्भ वारशावर सत्तासंघर्ष व सत्तासंपादनात हिंदुत्ववादी चळवळीने कशी मात केली याचा विश्लेषण यात आहे. या भागात शिवसेना, हिंदुत्वः महिलांचे राजकीय संघटन, मराठा महासंघ जात व हिंदुत्व या प्रकरणांचा समावेश आहे.
तिसरा विभाग नवहिंदुत्ववादी जातसंघटनांची चळवळ हा आहे. यात जातसंघटनांच्या माध्यमातून इतर मागासवर्ग हा जनसमूह आणि मराठा अभिजनवर्ग यांच्यातील सत्तासंघर्ष मांडण्यात आला आहे. यात कुणबी जातसंघटना, माळी समाजातील जातसंघटनांचे जातकेंद्रित व ओबीसीवादी राजकीय संघटन, धनगर समाजातील जातसंघटना, तेली संघटनांच्या चळवळीची सत्ता, अधिकार व प्रतिष्ठेचा प्रवास, दलित जातसंघटनांच्या दोन अस्मिताः हिंदू दलित व नवबौद्ध दलित, निष्कर्षः जातसंघटनांचे आधुनिक स्वरूप या प्रकरणांचा समावेश आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखक हे राजकीय व सामाजिक क्षेत्रातील प्राध्यापक, अभ्यासक असल्याने त्यांनी प्रत्येक प्रकरणांनंतर त्याविषयाशी संबधित संदर्भसूची दिलेली आहे. त्यामुळे हा विषय मांडण्यामागचा त्यांचा व्यासंग स्पष्ट होते. तसेच पुस्तकाला रावसाहेब कसबे यांच्यासारख्या राजकीय अभ्यासक व विचारवंतांची प्रस्तावना लाभलेली आहे. एकूण पाहिले असता हे पुस्तक राज्यशास्त्राचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार विविध राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते यांच्या अभ्यासासाठी महत्वाचा दस्तावेज ठरावे असे आहे.
पुस्तक - समकालिन राजकीय चळवळीः नवहिंदुत्व व जातसंघटना
लेखक - प्रकाश पवार
प्रकाशक - डायमंड पब्लिकेशन्स
किंमत - ३९५ रुपये पृष्ठे - ३१६
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.